‘पोक्सो’तील जाचक कलमांचा फेरविचार जरुरीचा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 03:29 AM2020-02-21T03:29:23+5:302020-02-21T03:29:40+5:30
सतीश व सुजाता दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी.
अॅड. धनंजय माने ।
१७ वर्षे वयाच्या सुजाताची सतीशबरोबर मैत्री. मैत्रीतून प्रेमप्रकरण. दोघांची जात वेगवेगळी. हे प्रकरण तिच्या घरच्यांच्या कानावर गेले. तिच्यावर बंधने आली. तिच्या घरच्यांनी तिचे लग्न करायचे ठरवले. मोबाइल जरी काढून घेतला तरी तिने तिच्या मैत्रिणीकडून सतीशला या सर्व बाबी कळविल्या. आपण पळून जाऊ, असा निरोप सतीशला दिला. तिला बघायला पाहुणे आले. त्या मुलाने तिच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. बंगल्याच्या वरील मजल्यावर दोघे गेले. तिने त्या मुलाला स्पष्टपणे सांगितले की, माझे प्रेमप्रकरण आहे. माझ्या इच्छेविरुद्ध माझे लग्न करायचे, असे घरच्यांनी ठरवले आहे. तो मुलगा खाली आला. आई-वडिलांबरोबर निघून गेला. पुढच्याच आठवड्यात तिने सतीशला निरोप पाठवला, ‘पुढील बुधवारी आमच्या नातेवाईकाच्या लग्नाचा स्वागत सोहळा आहे. तू ‘रिसेप्शन हॉल’च्या बाहेर येऊन थांब. आपण पळून जाऊ. तू आला नाहीस, तर मी विष पिऊन आत्महत्या करीन’. तिच्या इच्छेप्रमाणे तो ‘रिसेप्शन हॉल’बाहेर येऊन थांबला. ठरल्याप्रमाणे ती बाहेर आली. सतीशने तिला खूप समजावले. ती काही ऐकायला तयार नव्हती. ‘तू आला नाहीस, तर मी विष पिऊन जीव देणार’, असे बजावले. नाइलाजाने सतीशने गाडीला किक मारली.
प्रेमीयुगुल आठ दिवस ठिकठिकाणी फिरले. मुक्कामाच्या ठिकाणी प्रेमसंबंध झाले. दोष त्यांचा नाही. त्या वयाचा होता. इकडे तिच्या वडिलांनी पोलिसांकडे मुलगी हरविल्याची तक्रार दाखल केली. आठ दिवसांनी पोलिसांनी या प्रेमीयुगुलाला पकडले. तिने आई-वडिलांकडे जाण्यास स्पष्ट नकार दिला. पोलिसांनी तपासादरम्यान तिची वैद्यकीय तपासणी केली. तपासणाऱ्या डॉक्टरांना तिने स्पष्टपणे सांगितले की, तिच्या संमतीने शरीरसंबंध झाला. पोलिसांनी तिचा जन्मदाखला आणि शाळेचा दाखला मिळविला. सतीशविरोधात न्यायालयात सुनावणी झाली. सतीशला सात वर्षे कारावासाची शिक्षा झाली. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिचे लग्न करून दिले. ती आता नवºयाच्या घरी नांदत आहे. सतीश जेलमध्ये आहे. आता खेड्यातील उदाहरण बघा. सुनंदाच्या वडिलांचे शेत नांगरण्यासाठी ट्रॅक्टर लावण्यात आलेला होता. सुनंदा १६ वर्षांची, ट्रॅक्टरचालक सुनील १८ वर्षांचा. दोघांचे प्रेम जुळले. सुनंदाचे वडील बागायतदार, तर सुनीलचे वडील शेतमजूर. तिचे वडील कडक स्वभावाचे. तिच्या घरच्यांच्या कानावर प्रेमप्रकरण गेले. वडिलांनी तिला चांगले झोडपले. सुनीललासुद्धा ठोकून काढायचा कट रचला. त्या दिवशी शाळेत गेलेली सुनंदा परत आलीच नाही. ती सुनीलकडे गेली. तिच्या इच्छेनुसार दोघेही घरातून पळून गेले. पुण्याजवळील एका शेतात शेतमजूर म्हणून राहू लागले. चांगले तीन महिने नवरा-बायको म्हणून राहिले. इकडे तिच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिलीच होती. सुनील पोलिसांच्या सापळ्यात सापडला. सुनंदा १८ वर्षांच्या आतील असल्याने सुनीलला कारावासाची शिक्षा झाली. सुनील शिक्षा भोगत आहे आणि सुनंदा लग्न करून सासरी सुखाने नांदत आहे.
पोक्सो कायदा (लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा) १८ वर्षांखालील व्यक्तीस बालक समजले जाते. मात्र, बदल करून वय कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. मोबाइल युगातील ही पिढी. सध्या मुली व मुलांचे परिपक्व होण्याचे वय कमी झालेले आहे. दहावी-अकरावीपासूनच मुले-मुली एकमेकांशी मुक्तपणे बोलतात. त्यांच्यात मैत्री होते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. निसर्ग कोणासाठी थांबत नाही. पुढे घडायचे ते घडून जाते.
पोक्सो कायदा येण्यापूर्वी अशा प्रकारच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने १९६५ साली वरदराजन विरुद्ध भारत सरकार खटल्यात दिलेल्या निवाड्याचा आधार घेऊन निकाल दिला जात असे. त्या प्रकरणात मुलगी १६ वर्षांची होती. तिने प्रेमप्रकरण असल्यामुळे सर्व बाबींचा विचार करून स्वत:हून घर सोडले होते. सर्वोच्च न्यायालयाने आरोपी वरदराजन याची शिक्षा रद्द केली होती. या कायद्यातील कलम २९ व ३० (निर्दोष सिद्ध होईपर्यंत दोषी मानण्याचे) फारच जाचक आणि भयानक आहे. सध्या अनेक तरुण पोक्सो कायद्याच्या जाचक तरतुदीमुळे जेलमध्ये खितपत आहेत. ज्या प्रकरणात खरोखरच बालकांवर अत्याचार झाला आहे, अशा खटल्यांतील आरोपींना जन्मठेप किंवा फाशी ही शिक्षा योग्य आहे; परंतु उघड-उघड प्रेमप्रकरण आहे, तरुण मुलगी स्वत:हून प्रियकराबरोबर निघून गेलेली आहे. अशा तरुणांना न्याय मिळण्यासाठी पोक्सो कायद्यातील जाचक कलमांमध्ये बदल होणे न्यायाच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.
(लेखक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत )