राष्ट्रप्रेमाची भावनाच घडवेल क्रांती

By admin | Published: August 9, 2015 01:40 AM2015-08-09T01:40:11+5:302015-08-09T01:40:11+5:30

औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवायची असेल तर भारताला सर्वप्रथम पेट्रोलियम पदार्थांच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवावी लागेल. आज आपला देश ९ लाख कोटी रुपयांचे क्रुड आॅइल (कच्चे तेल) आयात करतो.

Revolution will revolutionize patriotism | राष्ट्रप्रेमाची भावनाच घडवेल क्रांती

राष्ट्रप्रेमाची भावनाच घडवेल क्रांती

Next

- सत्यनारायण नुवाल

औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवायची असेल तर भारताला सर्वप्रथम पेट्रोलियम पदार्थांच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवावी लागेल. आज आपला देश ९ लाख कोटी रुपयांचे क्रुड आॅइल (कच्चे तेल) आयात करतो. हा आपल्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा बोजा आहे. आपल्या देशात कोलबेड मिथेन (सीबीएम), शेलगॅस आणि गॅस हायड्रेड्सचे भरपूर साठे आहेत. पण अजून आपण त्या साठ्यांचा उपयोगही करायला सुरुवात केलेली नाही. अमेरिकेमध्ये एकट्या शेलगॅसपासून इंधनाची ८० टक्के गरज भागविली जाते. पाकिस्तानसारख्या देशातही शेलगॅसपासून इंधन बनविणे सुरू झाले आहे. भारतातही हे घडायला हवे. आपल्याला क्रुड आॅइलसाठी मध्य-पूर्वेतील देशांवर अवलंबून राहावे लागत असल्याने आपली अर्थव्यवस्था पांगळी झाली आहे. त्यामुळे इंधनाच्या बाबतीत आपल्याला स्वयंपूर्ण होणे अत्यावश्यक आहे.
गेल्या वर्षीपासून आपण ‘मेक इन इंडिया’चा उद्घोष करतो आहोत. पण ‘मेक इन इंडिया’ची खरी गरज देशाच्या संरक्षणासाठी आहे. सैन्याला जी शस्त्रे, दारूगोळा लागतो त्या सामग्रीमध्ये स्वयंपूर्णता मिळविण्यासाठी त्याचा वापर व्हायला पाहिजे. आपले दोन शेजारी पाकिस्तान आणि चीन हे भारताचे मोठे शत्रू आहेत, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आज जवळपास सगळी संरक्षण उत्पादने आयात केली जात असून, त्यावर हजारो कोटी रुपये खर्च होतो.
तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे शेती आणि उद्योग या क्षेत्रांत गतिमानता आणण्यासाठी आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. आपल्या देशात मुबलक पाणी आहे. सुपीक जमीन आहे, सूर्यप्रकाश आहे आणि मनुष्यबळही आहे. इतर देशांच्या तुलनेत ही भारतासाठी खूप मोठी पर्वणी आहे. कारण कोणत्याच देशाजवळ शेतीसाठी एवढी आदर्श परिस्थिती नाही. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण नद्या जोडण्याची गोष्ट करीत आहोत, पण अजूनही ही योजना कागदावरच राहिली आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे आमच्या नेत्यांमध्ये असलेला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हे आहे.
नद्यांना जोडण्याचे एक काम आपण करू शकलो तरी देशात एकाच वेळी कृषी आणि औद्योगिक क्रांती घडवून आणता येईल. विशेष म्हणजे त्यानंतर आपल्याला युनोच्या दारात उभे राहण्याची गरज भासणार नाही. उलट सर्व जग भारताकडे खाद्यान्न, क्रुड आॅइल, नैसर्गिक वायू, प्रशिक्षित मनुष्यबळ, संरक्षण सामग्रीसाठी आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे आध्यात्मिकता यासाठी आशेने पाहू लागेल.
विदर्भात रेंगाळलेले सर्व सिंचन प्रकल्प प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. पश्चिम महाराष्ट्र, पंजाब या प्रदेशांमध्ये कृषी क्रांती केवळ सिंचनामुळे झाली. ती विदर्भातही व्हायला हवी. याचबरोबर औद्योगिक क्रांतीसाठी विदर्भात सवलतीच्या दरात वीज देणे आवश्यक आहे. विदर्भात जमीन, जंगल, खनिजसंपदा मुबलक प्रमाणात आहे. स्वस्त वीज मिळाली तर त्यातून औद्योगिक क्रांती घडू शकेल. हवेतर विदर्भासाठी वेगळी वीज वितरण कंपनी करण्याची तयारी सरकारने ठेवली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपूरच्या ‘मिहान’मध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आपण उभ्या केल्या, पण अद्याप त्याचा उपयोगच झाला नाही. परिणामी हा एवढा मोठा प्रकल्प निरुपयोगी ठरला.

(लेखक हे संरक्षण सामग्री क्षेत्रातील उद्योगपती आहेत.)

Web Title: Revolution will revolutionize patriotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.