क्रांतिकारी फडणवीस, वैयक्तिक उंची निश्चितच मोठी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:33 AM2017-10-03T02:33:44+5:302017-10-03T02:33:56+5:30

‘भारताचे संविधान हे कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणेही राष्ट्रदोह ठरेल‘ असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदाचे सांगून टाकले. हे एका अर्थाने बरे झाले. फडणवीस यांनी हे विधान ज्या ठिकाणी केले, त्या स्थळाला भारताच्या इतिहासात ऐतिहासिक महत्त्व आहे.

Revolutionary Fadnavis, personal height will definitely be big | क्रांतिकारी फडणवीस, वैयक्तिक उंची निश्चितच मोठी होणार

क्रांतिकारी फडणवीस, वैयक्तिक उंची निश्चितच मोठी होणार

Next

‘भारताचे संविधान हे कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणेही राष्ट्रदोह ठरेल‘ असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदाचे सांगून टाकले. हे एका अर्थाने बरे झाले. फडणवीस यांनी हे विधान ज्या ठिकाणी केले, त्या स्थळाला भारताच्या इतिहासात ऐतिहासिक महत्त्व आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा आपल्या लाखो अनुयायांसह याच दीक्षाभूमीवर घेतली. भारताची राज्यघटना लिहित असताना बाबासाहेबांनी या देशातील दलित, शोषित, वंचितांच्या कल्याणाचा विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता. हा देश समताधिष्ठित राहावा, सर्वधर्मसमभाव हा देशाचा गाभा आहे, ही जाणीव बाबासाहेबांना होती. म्हणूनच राज्यघटना लिहिताना त्यांनी हा देश एकसंघ कसा राहील, याकडे कटाक्षाने लक्ष दिले. परंतु, या देशातील काही संकुचित मनोवृत्तीच्या लोकांना या राज्यघटनेतील काही मूल्ये सतत खुपत असतात. त्यामुळे ही राज्यघटना बदलविण्यात यावी, असा सूर या मंडळींकडून अधूनमधून व्यक्त होत असतो. राज्यघटना बदलविण्याची मागणी करणारे लोक प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांच्या वैचारिक परिवारातील म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असतात. याच मंडळींना राज्यघटनेबद्दल आक्षेप असतो. तत्कालीन सरसंघचालक सुदर्शन यांनी तर ‘ही राज्यघटना कचºयाच्या टोपलीत टाकण्याच्या लायकीची आहे’ असे निर्लज्ज विधान केले होते. त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घनिष्ठ नाते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा असे आश्वासक आणि लोकशाहीला मजबूत करणारे विधान करतात तेव्हा त्यांचे स्वागतच करायला हवे. फडणवीसांचा पिंड हा तसा झापडबंद स्वयंसेवकाचा नाही. ते सुधारणावादी आहेत, संघपरिवाराच्या अनेक गोष्टींना न बोलता आपल्या कृतीतून ते विरोधही करीत असतात. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ‘देशद्रोह’ या शब्दामुळे संघ परिवार आणि हिंदुत्ववादी संघटनांमधील काही कट्टर प्रवृत्ती दुखावणे स्वाभाविक आहे. कारण त्यांनी यापुढे राज्यघटना बदलविण्याची मागणी केली तर फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे ते ‘देशद्रोही’ ठरण्याची शक्यता राहील. दीक्षाभूमीवरील फडणवीसांच्या क्रांतिकारी भाषणामुळे संघ परिवारात चलबिचल होणे स्वाभाविक आहे. फडणवीस स्वतंत्र विचारांचे आहेत. हरियाणाचे मनोहरलाल खट्टर किंवा उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ या मुख्यमंत्र्यांसारखे बुरसटलेल्या मनोवृत्तीचे नाहीत. त्यामुळे त्यांचे हे विचार संघ परिवाराला आवडो ना आवडो पण, फडणवीसांची वैयक्तिक उंची यामुळे निश्चितच मोठी होणार आहे

Web Title: Revolutionary Fadnavis, personal height will definitely be big

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.