हास्यात रंगली कविता
By admin | Published: March 12, 2017 01:18 AM2017-03-12T01:18:05+5:302017-03-12T01:18:05+5:30
काही वर्षांपूर्वी ‘सुमनताई फडके’ या कवयित्रींना भेटायला गेलो होतो. त्या मला म्हणे, ‘विसुभाऊ, मी रावणावर कविता लिहिलेय... आणि त्यांनी मला रावण कविता ऐकवली... दिली...
- प्रा. विसुभाऊ बापट
काही वर्षांपूर्वी ‘सुमनताई फडके’ या कवयित्रींना भेटायला गेलो होतो. त्या मला म्हणे, ‘विसुभाऊ, मी रावणावर कविता लिहिलेय... आणि त्यांनी मला रावण कविता ऐकवली... दिली...
रावणाकडे जेव्हा यायचे पाहुणे
दहा तोंडांनी ‘या या’ म्हणे
या कवितेत त्या शेवटी म्हणतात...
स्वत:च्याच सावलीला रावण भ्यायचा
‘राम राम’ मंत्र मनात म्हणायचा.
रावणाला ‘भित्रा’ म्हणणाऱ्या सुमनतार्इंचा रावणाकडे पाहण्याचा विनोदी दृष्टीकोन मला खूपच आवडला... पण खरं सांगतो ही कविता ऐकली नव्हती तोपर्यंत असंच वाटत होतं. ‘रावण’.. हा काय कवितेचा विषय आहे.
त्यानंतर रावण कविता माझ्या मागेच लागल्या...
‘रावण’ लहान असताना काय काय गमतीजमती घडल्या असतील? मग त्याला झोपायला डोक्याकडे रुंद नि पायाकडे अरुंद असलेला पाळणा (त्रिकोणी आकाराचा) बनवावा लागला असेल. त्याला सर्दी झाली तर...? दहावं नाक पुसायला दासीच ठेवावी लागली असेल. किंवा खेळताना एखादं तरी डोकं दिसेल नि हा पकडला जाईल. म्हणून कुणीच याला खेळायला घेत नसेल. अशा कल्पनांवर ‘रावणबाळ’ नावाचं कवितांचं पुस्तक माधुरी माटे या कवयित्रीनं लिहिलं.
आणखी एक मजेशीर घटना- ‘रावणा’संबंधीच नाशिक मुक्कामात मला अनुभवायला मिळाली. ‘कालिदास’चा प्रयोग संपल्यावर माझा मित्र सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांच्या घरी गप्पा मारत बसलो होतो. ‘कुटुंब रंगलंय काव्यात’मार्फत मी कवितांच्या स्पर्धा घेतो.. एक एक कविता मला कशा मिळत गेल्या हे ऐकल्यावर ज्ञानेशनं सांगितलं... विसुभाऊ कविता आणि चित्र यांना विषयाचं बंधन नाही... एकदा मी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली नि विषय ठेवला रावण. आपल्या कल्पनेप्रमाणं प्रत्येक स्पर्धकानं रावणाचं चित्र काढलं... दहा तोंडांचा... अगडबंब देहाचा रावण... पण एका मुलानं मात्र मडक्यांची उतरंड रचतात त्याप्रमाणात रावणाच्या दहा डोक्यांची एकावर एक अशी उतरंड रचली नि अगडबंब देहाचा रावण चितारला... त्याची कल्पनाशक्ती मला आवडली. वैज्ञानिकदृष्ट्यादेखील ही गोष्ट बरोबर वाटली... त्याला मी पहिला क्रमांक दिला..!
...नंतर ज्ञानेश सोनारांनी स्वत: चितारलेली रावणचित्रं मला दाखवली. त्यातल्या एक एक कल्पना पाहून तर मला हसू आवरत नव्हतं. पैकी मला आवडलेलं एक चित्र सांगतो. दहा डोक्यांचा रावण गाडी (कार) चालवत रस्त्यानं चाललाय... दहापैकी पाच डोकी खिडकीबाहेर आहेत... समोरून एक स्कूटरवाला येतोय... ती पाच डोकी पाहून तो घाबरलाय नि अॅक्सिडंट टाळण्यासाठी खाली वाकून स्कूटर चालवतोय.
...रावणावरचे हे विनोद हास्यनिर्मिती करत असले तरीसुद्धा रावण नुसता शब्द उच्चारला तरी अगडबंब देहाचा, देहाला साजेसं मोठं डोकं... मोठी मिशी... मोठे डोळे असलेला किंवा अशाच दहा तोंडांची (रामायण, सिनेमा, रावणचरित्र आदीपासून आपल्या मनात ठसलेली... वा काल्पनिक) एक आकृती आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते... मग आठवतं त्यांचं पहाडी आवाजातलं बोलणं नि गडगडाटी हसणं.... रावण होता राकट! कितीही झालं तरी राक्षसांचा ‘राजा’ तो! राक्षसी वृत्ती असणारच त्याच्या अंगी... जरी तो कितीही बुद्धिमान असला... आदर्श शासनकर्ता, चौदा विद्या, चौसष्ट कलांमध्ये पारंगत असला तरी ‘रावण’ तो रावणच. त्याच्या दुष्ट नि विकृत प्रवृत्तींनी त्याच्या सगळ्या चांगल्या गुणांवर मात केली होती... म्हणूनच तर त्या प्रकारच्या व्यक्तीला... मग भले ती राज्यकर्ती व्यक्ती असो, मंत्री असो वा आमदार खासदार असो... ‘रावण’ ही उपाधी आपण बिनबोभाट बहाल करून टाकतो.
अर्थात त्याला कारणंही तशीच असतात. त्यासाठी पाहू या आमचे नागपूरचे मित्र ज्ञानेश वाकूडकर यांनी कवितेत साकारलेला रावण...
रावण
ताजमहाल हॉटेलचा कमरा नंबर बावन
परवाच मला अचानक भेटला तिथं रावण!
म्हणाला, हॅलो, मी नुकताच नरकातून पृथ्वीवरती आलो...
इथली सुव्यवस्था पाहून भयानक प्रभावित झालो!
अरे, आमच्या वेळची सामाजिक परिस्थिती...
जर एवढी बिघडली असती... तर...
सीतेसाठी लढाई करण्याची, माझ्यावर वेळच आली नसती!
मी म्हणालो, रावणा..चाय पियेंगे...आओ ना!
रावण हसला... खुशीत येऊन खांद्यावरती हात टाकून बसला!!
म्हणाला, वास्तविक, या सीताप्रकरणात मी जगामध्ये खूपच बदनाम झालो.
त्यानंतर पहिल्यांदाच भारतामध्ये दौऱ्यावरती आलो.
जिकडे तिकडे माझा सत्कार अगदी खास होतो आहे.
मी कुणी महात्मा असल्याचा भास होतो आहे..
वेळ बदलल्यावर मी केव्हढा ग्रेट झालो आहे?
वाईट एवढंच वाटतं, थोडासा ‘लेट’ झालो आहे.
मी यापूर्वीच जर भारतामध्ये दौऱ्यावरती आलो असतो..
तर... एव्हाना भारताचा पंतप्रधान झालो असतो!!
(लेखक कुटुंब रंगलंय काव्यात कार्यक्रम सादर करतात.)