रिबेरोंची व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 03:36 AM2018-06-04T03:36:53+5:302018-06-04T03:36:53+5:30
ज्युलिओ रिबेरो हे देशाचे एक मानांकित सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत. सरकारसमोरची संकटे दूर करायला त्यांनी वेळोवेळी आपली बुद्धिमत्ता, कार्यक्षमता व संरक्षण कौशल्य पणाला लावले आहे.
ज्युलिओ रिबेरो हे देशाचे एक मानांकित सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत. सरकारसमोरची संकटे दूर करायला त्यांनी वेळोवेळी आपली बुद्धिमत्ता, कार्यक्षमता व संरक्षण कौशल्य पणाला लावले आहे. पंजाबात भिंद्रानवाल्याचे थैमान सुरू असतानाच केंद्राने त्यांना बोलावले. मुंबईतील दंगलीही त्यांनीच आटोक्यात आणल्या. लोकांच्या आदराला पात्र असलेल्या या अधिकाऱ्याला आज मात्र देशातील धार्मिक आतंकाच्या व धर्मविद्वेषी राजकारणाच्या कळांनी व्यथित केले आहे. रिबेरो हे त्यांच्या धर्मनिरपेक्ष व सर्वधर्मसमभावी वृत्तीसाठी देशात सर्वमान्य आहे. आताच्या बहुसंख्याकवादाने व्यथित झालेल्या रिबेरोंना ‘मी देशभक्त ख्रिश्चन आहे’ हे जाहीररीत्या पण कमालीच्या व्यथित मनाने देशाला सांगावे लागले आहे. सारेच अल्पसंख्य देशविरोधी आहे हा सध्याचा संघ परिवाराचा प्रचार देशातील २० टक्क्याहून अधिक लोकांना देशविरोधी ठरवू लागला आहे. दिल्लीचे आर्चबिशप अनिल क्युटो यांनी या धर्मांधतेविरुद्ध शांततामय प्रार्थना करण्याचे व त्यासाठी शुक्रवारी उपवास करण्याचे आवाहन देशातील रोमन कॅथलिकांना केले. त्यावर सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी कमालीची विषारी टीका केली. तिला उत्तर देताना ‘तुम्ही भारताला भगवे पाकिस्तान करण्याचा प्रयत्न करीत आहात’ हे उद्गार रिबेरो यांनी काढले आहेत. तशा आशयाचा लेख त्यांनी एका राष्ट्रीय दैनिकात लिहिलाही आहे. जोसेफ मॅझिनी हा इटलीच्या स्वातंत्र्यलढ्याचा नेता राष्ट्र या संकल्पनेची व्याख्या करताना १९ व्या शतकात म्हणाला ‘एक धर्म, एक वंश, एक भाषा, एक संस्कृती व एक भूप्रदेश ज्यात आहे ते म्हणजे राष्ट्र’. मॅझिनीला जाऊन शतके लोटली आणि त्याच्या काळातील एकसंघ राष्ट्रे आता कुठेही उरली नाहीत. त्याची व्याख्या आज अमलात आणायचे ठरविले तर जगातला एकही देश त्याचे तुकडे झाल्याखेरीज राहणार नाही. जगातला कोणताही देश आज एकधर्मी वा एकभाषी नाही. सगळे देश बहुवंशी व सांस्कृतिकबहुल बनले आहेत. शिवाय जगातले काही देश तर शेकडो बेटांनी एकत्र येऊन घडविले आहेत. याला अमेरिका अपवाद नाही, इंग्लंड नाही, मध्यपूर्वेतले देश नाहीत, रशिया नाही, चीन नाही आणि भारतही नाही. भारतात हिंदी भाषेचीच चार राज्ये आहेत. शिवाय भारतातल्या अल्पसंख्याकांची संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येएवढी आहे. वास्तव हे की एक कोटीहून कमी लोकसंख्या असलेले शंभराहून अधिक देश जगात आहेत आणि भारतातील अल्पसंख्याकांची संख्या, मुसलमान १७ कोटी, शीख २ कोटी, ख्रिश्चन ५० लाख तर जैन व बुद्ध काही लाखांएवढे आहेत. असा देश एकत्र राखायचा तर त्यात भाषिक वा सांस्कृतिक विवाद उरणार नाहीत याचीच काळजी राज्यकर्त्यांच्या वर्गांना घ्यावी लागणार आहे. गांधीजी सर्वधर्मसमभाव आणि नेहरू सेक्युलॅरिजमची भाषा उगाच बोलत नव्हते. देश संघटित राखायचा तर तसे करणे आवश्यक आहे म्हणून ते बोलत होते. आताचे राज्यकर्ते बहुसंख्याकवादाचे कंकण हाताला बांधूनच सत्तेवर आले आहे. त्यांना सारे मुसलमानविरोधी आणि सगळे ख्रिश्चन धर्मपरिवर्तनवादी वाटत आहेत. त्यांना जमेल तेवढे अडचणीचे ठरणारे कायदे करायचे आणि प्रसंगी हाती कायदा घेऊन त्यांच्यावर हल्ले करायचे हा त्यांच्यातील काहींचा कार्यक्रम आहे. गोवंश हत्याबंदीचा कायदा त्यातून झाला. सुधारणांचे लक्ष्य अल्पसंख्याकांना बनविले गेले. त्यातून ओरिसातील चर्चेसची जाळपोळ, गुजरातेमधील मशिदीचा विध्वंस याही गोष्टी झाल्या. अल्पसंख्याकांची हत्याकांडे त्यातून झाली. पुढे दलितही त्यांचे लक्ष्य बनले. एवढी अत्याचारी माणसे कायद्याच्या कक्षेबाहेर राहिलेली पाहून इतर गुंडांनाही चेव आला. त्यातून बलात्कार वाढले, अल्पवयीन मुलींवर अत्याचारात वाढ झाली आणि दलितांवरचा राग शमवून घ्यायला जागोजागी हल्लेखोर संघटित झाले. ज्युलिओ रिबेरो या शूर शिपायाची व्यथा यातून आली आहे. एकेकाळी मुसलमानांनी हिरवा पाकिस्तान बनविला आता तुम्ही भारतात भगवा पाकिस्तान बनवीत आहात हे त्यांनी चिडून लिहिलेले विधान हा त्याचा परिणाम आहे. रिबेरोंची व्यथा त्याचमुळे साºया संवेदनशीलांनी समजून घेतली पाहिजे.