जपानी सुपरमार्केट्समधून तांदूळ गायब!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 08:09 AM2024-09-03T08:09:45+5:302024-09-03T08:13:54+5:30
Japan News: जपानमध्ये तांदुळाची मागणी दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यात वादळांची शक्यता निर्माण झाल्यानं लोक हवालदिल झाले आहेत. तांदुळाच्या पुरवण्यासाठी लोकांनी रस्त्यावर येऊन आंदोलनं आणि प्रदर्शन सुरू केली आहेत. एरवी जपानी समाज अतिशय शिस्तप्रिय आणि शांतताप्रिय मानला जातो; पण तांदुळाच्या मागणीसाठी काही ठिकाणी ही आंदोलनं हिंसकही झाली.
भूकंप, चक्रीवादळं, वादळं... या गोष्टी जपानला नवीन नाहीत. त्यामुळे आजवर त्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे; पण याच नैसर्गिक रुद्रावतारात कमीतकमी नुकसान होईल, अशा पर्यायी गोष्टीही त्यांनी आधुनिक विज्ञानाच्या साहाय्यानं विकसित करून ठेवल्या आहेत. त्यामुळे या नैसर्गिक प्रकोपात जपानमध्ये कमी नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं. तरीही अशी आपत्ती आल्यावर सामान्यांच्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होतोच.
जपानमध्ये वर्षभर काही ना काही नैसर्गिक आपत्ती सुरूच असतात. त्यातही मे ते नोव्हेंबर हा कालावधी जपानमध्ये अतिशय धोकादायक मानला जातो. या काळात लहान-मोठी सुमारे वीस-पंचवीस वादळं येतात. त्यामुळे त्याला ‘टायफून सीझन’ असंही मानलं जातं. अतिवृष्टी, भूस्खलन, नद्यांना पूर येणं... अशा अनेक गोष्टी या काळात घडतात. त्यातही ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात जपानमध्ये सर्वाधिक वादळं येतात. यंदाही या वादळांचं प्रमाण मोठं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जपान सरकारनं नागरिकांना आधीच सावधानतेचा इशारा दिला आहे. अशावेळी जगात कुठेही सर्वसामान्य माणसाची जी मानसिक स्थिती होते, तीच जपानी नागरिकांचीही झाली आहे. या वादळाच्या काळात आपल्याला किती काळ घरात डांबून राहावं लागेल याची भीती जपानी नागरिकांना वाटते आहे. त्यामुळे किमान खाण्यापिण्याचे तरी हाल होऊ नयेत म्हणून जपानी नागरिकांनी घरांत तांदुळाचा साठा करून ठेवण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे जपानमध्ये तांदुळाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
जपानमध्ये ‘ओबोन फेस्टिव्हल’ अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हा महोत्सव तिथे नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या काळात जपानी लोक आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करतात. त्यांच्या स्मृती जागवतात. या काळात अनेक जपानी नागरिक सुट्टीवरही असतात. त्यामुळे या कालावधीत तांदुळाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढते. यंदाही ती तशी वाढली.
याशिवाय यंदा जपानमध्ये विदेशी पर्यटक खूप मोठ्या संख्येने आले. जपानच्या ‘नॅशनल टुरिझम ऑर्गनायझेशन’च्या अहवालानुसार यावर्षी केवळ जून महिन्यापर्यंतच ३१ लाखांपेक्षाही अधिक विदेशी पर्यटकांनी जपानला भेट दिली. त्यामुळेही तांदुळाची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या ‘फॉरिन ॲग्रिकल्चर सर्व्हिस’च्या अहवालानुसार जपानमध्ये २०२३ ते २०२४ या काळात आतापर्यंत तांदुळाचं एकूण उत्पादन ७.३ दशलक्ष टन झालं; पण त्यांची मागणी त्यापेक्षा कितीतरी अधिक होती. या काळात तांदुळाची एकूण विक्री ८.१ दशलक्ष टन झाली.
जपानमध्ये तांदुळाची मागणी दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यात वादळांची शक्यता निर्माण झाल्यानं लोक हवालदिल झाले आहेत. तांदुळाच्या पुरवण्यासाठी लोकांनी रस्त्यावर येऊन आंदोलनं आणि प्रदर्शन सुरू केली आहेत. एरवी जपानी समाज अतिशय शिस्तप्रिय आणि शांतताप्रिय मानला जातो; पण तांदुळाच्या मागणीसाठी काही ठिकाणी ही आंदोलनं हिंसकही झाली. निदर्शनांदरम्यान आंदोलकांनी काही ठिकाणी तांदुळाची स्टोअर्स, दुकाने जाळली. याशिवाय अनेक ठिकाणी जाळपोळ आणि लूटमारही झाली.
जपानी नागरिक सहसा हिंसक होत नाहीत; पण त्यांच्या या कृतीनं सरकारही अस्वस्थ झालं आहे. नागरिकांनी शांत राहावं, संयम राखावा, सरकार त्यासाठी पूर्ण प्रयत्न करीत आहे आणि लवकरच तांदुळाचा पुरवठा पूर्ववत केला जाईल, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे; पण नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत.
खबरदारीचा उपाय म्हणून जपान सरकारने आता तांदुळाचे रेशनिंग सुरू केले आहे. जपानमधील सुपरमार्केट्समध्ये ‘प्रत्येक व्यक्तीनं तांदुळाची जास्तीत जास्त एकच बॅग खरेदी करावी’, असे फलक लावण्यात आले आहेत. ज्या थोड्या सुपरमार्केट्समध्ये तांदूळ शिल्लक आहे, तिथून नागरिकांनी केवळ गरजेपुरताच तांदूळ खरेदी करावा, असं आवाहन केलं जात आहे. जून १९९९नंतर जपानमध्ये पहिल्यांदाच अशी स्थिती ओढवली आहे.
पंतप्रधानांनी दिला होता राजीनामा!
जुलै १९१८ मध्येही जपानमध्ये तांदुळाची कमतरता आणि दरवाढीमुळे मोठं आंदोलन झालं होतं. शेतकरी आणि सर्वसामान्य जनता रस्त्यावर आली होती. हा प्रश्न लवकर न सुटल्यानं शांततेत सुरू झालेलं हे आंदोलन लवकरच तीव्र झालं होतं. अनेक ठिकाणी जाळपोळ, लुटालूट झाली. सरकारी कार्यालयांवर हल्ले झाले. याप्रकरणी तब्बल २५ हजार आंदोलकांना अटक करण्यात आली होती. इतकंच काय, या आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान तेराउची मसाताके यांना राजीनामाही द्यावा लागला होता.