मोठा वारसा आणि परंपरा असलेला काँग्रेस पक्ष चिखलफेकीत मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 03:43 AM2017-08-29T03:43:19+5:302017-08-29T03:45:22+5:30
सोलापुरात काँग्रेस पक्षाच्यावतीने माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा कार्यक्रम रविवारी घेण्यात आला. त्यासाठी राज्यभरातून नेतेमंडळी आली होती
सोलापुरात काँग्रेस पक्षाच्यावतीने माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा कार्यक्रम रविवारी घेण्यात आला. त्यासाठी राज्यभरातून नेतेमंडळी आली होती. माजी राष्टÑपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह चार माजी मुख्यमंत्री उपस्थित होते. अपवाद फक्त नारायण राणे यांचा. पण त्या चर्चेला कोणी तोंडच फोडले नाही किंबहुना कोणाला विषय वाढवण्याची संधी दिली नाही. मुळात हा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हाच हा काँग्रेसचा मेळावा असेल असे अनेकांनी गृहित धरले. पण काँग्रेसने तसे होऊ दिले नाही. माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्री यांची उंची गाठणारा कार्यक्रम त्यांनी केला. स्व. इंदिराजी या ‘आयर्न लेडी’ म्हणून सा-या जगाला माहीत होत्या. या कणखर नेतृत्वाचा ऊहापोह सबंध कार्यक्रमात केला गेला. परमाणू ऊर्जा, सागरी संपत्ती, सौर ऊर्जा या क्षेत्रात भरीव प्रगती झाली असली तरी याची बिजे इंदिरा गांधी यांनी रोवली होती याची उजळणी नव्या पिढीसाठी महत्त्वाची होती. पाणी अडवा पाणी जिरवा, पाणलोट विकास या कल्पना स्व. वसंतदादा यांच्या होत्या. वोरोनोको प्रशालेच्या प्रांगणात भर पावसातही या कार्यक्रमाला झालेली खचाखच गर्दी पाहता हा एक सुनियोजित आणि पक्षविरहित समारंभ वाटला. याला पक्षीय वास येणार नाही याची काळजी घेतली गेली. त्यामुळे दिवंगत नेत्यांची असलेली उंची कायम ठेवण्यात पक्षाला यश आले. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सरकार आणि भाजपावर ताशेरे ओढले पण शताब्दी कार्यक्रमात मात्र भालचंद्र मुणगेकर वगळता कोणीच पक्ष किंवा सरकारवर टीका केली नाही. यामुळे या दिवंगत माजी नेत्यांच्या कार्यक्रमाला आलेल्या श्रोत्यांना त्यांच्या उंचीचा चांगलाच उजाळा मिळाला. आपला पक्ष किती मोठा याबरोबरच आपल्या पक्षाचे नेते किती मोठ्या उंचीचे आहेत, त्यांनी घेतलेल्या निर्णयाची फळे आज देश कशी चाखतोय हे लोकांना पटवून देण्यात आणि लोकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात नेत्यांना यश आले. मुळात मोठा वारसा आणि परंपरा असलेला काँग्रेस पक्ष हा चिखलफेकीत मागे असतो आणि हीच काँग्रेसची परंपरा आहे हे पक्षातील नव्या नेत्यांनाही मनोमन पटले.