शौर्य, धैर्य आणि औदार्याचा प्रगल्भ इतिहास... शिवाजी महाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 05:31 PM2021-02-19T17:31:07+5:302021-02-19T17:32:00+5:30

छत्रपती शिवाजीराजांच्या वैश्विक विचारधारेचे दाखले समकालीन देशी-विदेशी अभ्यासकांनी दिले आहेत, त्याबद्दल आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने...

A rich history of bravery, courage and generosity of shivaji maharaj | शौर्य, धैर्य आणि औदार्याचा प्रगल्भ इतिहास... शिवाजी महाराज

शौर्य, धैर्य आणि औदार्याचा प्रगल्भ इतिहास... शिवाजी महाराज

googlenewsNext
ठळक मुद्देमि. डेल्लन हा राजांचा समकालीन आहे. शिवाजीराजे हयात असतानाच त्यांच्या कार्याची व विचारांची कीर्ती जगभर पसरलेली होती. डेल्लन सांगतो, शिवाजी महाराज आणि त्यांची प्रजा मूर्तिपूजक होती

श्रीमंत कोकाटे

शिवाजीराजांचा इतिहास जसा शौर्याचा धैर्याचा आहे, तसाच तो औदार्याचादेखील आहे. शिवरायांनी तलवार चालविली, रणांगण गाजविले तसेच त्यांनी रयतेवर प्रेमदेखील केले. शिवाजीराजे जसे कर्तव्यकठोर होते तसेच ते कनवाळू होते, असे लालजी पेंडसे म्हणतात. राजांनी जसे स्वराज्यातील रयतेवर प्रेम केले तसेच परराज्यातील रयतेवरदेखील प्रेम केले. शिवाजीराजांचे विचार लोककल्याणकारी होते, प्रगल्भ होते. ते एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या किंवा राष्ट्राच्या चौकटीत बंदिस्त करण्याएवढे लहान नव्हते. शिवाजीराजांच्या वैश्विक आणि प्रगल्भ विचारधारेचा दाखला (संदर्भ) शिवकालीन पोर्तुगीज अधिकारी मि. डेल्लन पुढीलप्रमाणे देतो, ‘..त्यांचे (शिवरायांचे) सर्व किल्ले डोंगरावर बांधलेले आहेत. त्यांची प्रजा त्यांचेसारखी मूर्तिपूजक आहे. तथापि ते (शिवाजीराजे) सर्व धर्मांना नांदू देतात. ह्या भागातील (भारतातील) अत्यंत धोरणी व राजकारणी पुरुष म्हणून त्यांची ख्याती आहे.’

मि. डेल्लन हा राजांचा समकालीन आहे. शिवाजीराजे हयात असतानाच त्यांच्या कार्याची व विचारांची कीर्ती जगभर पसरलेली होती. डेल्लन सांगतो, शिवाजी महाराज आणि त्यांची प्रजा मूर्तिपूजक होती, परंतु मूर्तिपूजा न करणाऱ्या परधर्मीयांचा किंवा इतर पंथीयांचा त्यांनी कधीही द्वेष केला नाही. ज्याचा त्याचा अधिकार ज्याला त्याला मिळायला हवा, ही त्यांची व्यापक-प्रगल्भ विचारधारा होती. इतरांच्या धार्मिक हक्कावर त्यांनी अतिक्रमण केले नाही, त्यांना आपल्या परंपरेचा अभिमान होता, परंतु बळाच्या जोरावर इतरांचा हक्क-अधिकार शिवरायांनी हिरावून घेतला नाही. पुण्याजवळ भल उरुळी आणि फुरसुंगी येथील मशिदीच्या व्यवस्थानाबाबत खेडबोर येथील मोकदम चांदखान ढवळाढवळ करतो, अशी तक्रार काझी कासमने शिवरायांकडे केली होती, तेव्हा शिवाजीराजांनी दि. २२ मार्च १६७१ रोजी हवालदाराला पत्र पाठवून चांदखानास ताकीद देण्याची आज्ञा केली, ‘ज्याचा त्याचा अधिकार त्याला मिळायला हवा!’ - ही शिवाजी महाराजांची प्रगल्भ विचारधारा होती.

शिवाजी महाराज  दक्षिण दिग्विजयास निघाले असताना गोवळकोंड्याजवळ आले, त्या वेळेस गोवळकोंड्याच्या बादशहाने चारपाच गावे पुढे येऊन शिवरायांच्या स्वागताची इच्छा व्यक्त केली. शिवाजीराजे बादशहाला म्हणतात, ‘आपण मोठा भाऊ, मी धाकटा भाऊ, आपण भेटीस न यावे, मीच आपल्या भेटीस येत आहे.’ - ही घटना समकालीन सभासदाने नोंदलेली आहे. लढायांच्या धुमश्चक्रीत द्वेषाचे-आकसाचे राजकारण शिवरायांनी केले नाही. ते गोवळकोंड्याच्या बादशहाला मोठा भाऊ म्हणून संबोधतात, ही त्यांची उच्च कोटीची वैचारिक प्रगल्भता होती. दक्षिणेत तामिळनाडूत असताना डच व्यापारी शिवरायांकडे व्यापारी करार करण्यासाठी आले तेव्हा शिवाजीराजे त्यांना म्हणाले, ‘माझ्या स्वराज्यात स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी - विक्री करता येणार नाही.’ यावरून शिवाजीराजे गुलामगिरीच्या विरोधात होते. ज्या काळात इंग्रज, डच, फ्रेंच, मोगल, पोर्तुगीज स्री-पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी-विक्री करत होते, त्या वेळेस शिवरायांनी या अमानुष प्रथेला स्वराज्यात पायबंद घातला.

आदिलशाहीबरोबर शिवाजीराजांचा राजकीय संघर्ष सुरू असतानाच तेथे दुष्काळ पडला, तेव्हा शिवरायांनी आदिलशहाला ज्वारीची पोती मदत म्हणून पाठवलेली होती. हे त्यांच्या मानवतावादी अर्थात प्रगल्भ विचारधारेचे द्योतक आहे. स्त्री ही शत्रूपक्षातील असली तरी तिचा आदर, सन्मान आणि संरक्षण केले पाहिजे ही महाराजांची स्पष्ट भूमिका होती, त्याचे त्यांनी पदोपदी पालन केले. शिवरायांच्या या उदात्त विचारांची नोंद मोगल इतिहासकार खाफीखान यानेदेखील केलेली आहे. तो म्हणतो, ‘भाऊ जसा बहिणीशी वागतो आणि मुलगा जसा आईशी वागतो, तसे शिवाजीराजे शत्रूंच्या-विरोधकांच्या स्रियांशीदेखील वागायचे.’  महिलांचा आदर, सन्मान करणे ही उच्चकोटीची विचारधारा आहे, ती शिवरायांकडे होती.

शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, विनामोबदला त्यांचेकडून काही घेऊ नका, त्यांना संकटसमयी मदत करणे हेच पुण्य आहे. शेतकऱ्यांना दुष्काळात मदत करा- या सूचना शिवरायांनी दिल्या. त्यांनी रयतेला शून्य टक्के व्याजदराने रक्कम दिली. आज्ञापत्रात शिवाजीराजे वृक्षांबाबत सांगतात, ‘झाडांची कत्तल करू नका. ती रयतेने मुलांप्रमाणे सांभाळलेली असतात. झाड कापणे म्हणजे मुलांची गर्दन कापल्यासारखे आहे. शेतकऱ्यांवर अत्याचार (बलात्कार) करू नका.’ - अशी प्रगल्भ, उदात्त, मानवतावादी विचारधारा शिवरायांची होती. राजांच्या त्या विचारधारेची आज सर्व जगाला गरज आहे.

(लेखक शिवचरित्राचे अभ्यासक आहेत )

Web Title: A rich history of bravery, courage and generosity of shivaji maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.