‘परभणी शक्ती’ची श्रीमंती
By गजानन दिवाण | Published: July 16, 2018 11:18 PM2018-07-16T23:18:30+5:302018-07-16T23:18:35+5:30
ज्वारी हे तसे गरिबांचे अन्न. आज ती श्रीमंताच्या ताटात दिसत आहे आणि म्हणूनच गव्हापेक्षाही जास्त भाव खाऊन जात आहे.
ज्वारी हे तसे गरिबांचे अन्न. आज ती श्रीमंताच्या ताटात दिसत आहे आणि म्हणूनच गव्हापेक्षाही जास्त भाव खाऊन जात आहे. आरोग्याच्या दृष्टीने ज्वारीचे महत्त्व गव्हापेक्षा कितीतरी अधिक आहे आणि दिवसेंदिवस ते वाढतेच आहे. ज्वारीत प्रथिनांचे प्रमाण साधारण १० ते १२ टक्के असते. यामुळे पोट साफ राहते. मधुमेहींसाठी ती अधिक उपयोगी असते. शरिरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी ती उपयोगाची समजली जाते. थोडक्यात तुम्हाला ‘फिट’ ठेवण्यासाठी ज्वारी उपयोगी ठरते. म्हणूनच अलिकडच्या काळात ज्वारीची ‘श्रीमंती’ वाढलेली दिसते. हे मूळ पीक आफ्रिकेचे. द्वारका येथे झालेल्या उत्खननात, सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीच्या एका जात्याच्या भागात सापडलेल्या पुराव्यावरून ज्वारीची शेती भारतात प्राचिन काळापासून अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या जगभरात ज्वारीचे क्षेत्र भारतात पहिल्या क्रमांकाचे आहे. त्यातही ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. रबी हंगामातील शाळू जातीची ज्वारी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घेतली जाते. तिलाच राज्यातील सर्वोत्तम दर्जा प्राप्त झाला आहे. अशाच उत्तम दर्जाच्या ज्वारीत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हैदराबाद येथील इक्रिसॅट संस्थेच्या सहकार्यातून ‘परभणी शक्ती’ची भर घातली आहे. नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, या उद्देशाने ‘अन्न हेच औषध’ ही संकल्पना समोर ठेवून हे जैवसमृद्ध वाण विकसित करण्यात आले आहे. विद्यापीठाने या वाणाच्या सात वर्षांत तब्बल १२५ चाचण्या घेतल्या. देशात कुपोषण, गरोदर मातांच्या समस्या, रक्तक्षय, महिलांमधील लोहाचे प्रमाण अशा आरोग्याच्या प्रश्नांवर हे वाण उपयुक्त आहे. जस्त आणि लोह अधिक देणारे ‘परभणी शक्ती’ हे ज्वारीचे वाण विद्यापीठाने विकसित केले. पारंपारिक ज्वारीच्या तुलनेत जस्ताचे प्रमाण ४२ ते ४६ मिलीग्रॅम प्रतिकिलो आणि लोहाचे प्रमाण ३० ते ३७ मिलीग्रॅम प्रतिकिलो ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले. केवळ जस्त आणि लोह वाढविणे एवढ्यापुरते मर्यादित न ठेवता हे वाण आरोग्यवर्धक ठरण्याबरोबरच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसा कसा मिळवून देईल, या दृष्टीनेही जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. यातून कडबा १० टक्के अधिक येतो़ या कडब्याचे वजन सरासरी ११० किलो एवढे भरते़ याशिवाय हवामानाचा परिणाम या वाणावर होऊ नये तसेच किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासही सक्षम असलेले हे वाण विकसित करण्यात विद्यापीठाला यश आले आहे. ज्वारीला मागणी वाढत असली तरी गेल्या काही वर्षांत मराठवाड्यात ज्वारीचे पीक झपाट्याने कमी का होत आहे, हे कळायला मार्ग नाही. मात्र, या जैवसमृद्ध वाणामुळे ज्वारीचे क्षेत्र घटण्याची चिंताही दूर होईल, असा आशावाद आहे. गरज आहे ती या वाणाचा प्रचार आणि प्रसार होण्याची. तो कसा होतो, यावरच त्याची बाजारातील ‘श्रीमंती’ अवलंबून असणार आहे.