अन्वयार्थ: पाऊस वेड्यासारखा वागू लागतो, तेव्हा...
By वसंत भोसले | Published: July 21, 2021 07:35 AM2021-07-21T07:35:38+5:302021-07-21T07:36:15+5:30
अवेळी, सरासरीपेक्षा अधिक पाऊस कमी वेळेत होऊ लागला तर पीक, पाणी, हवामान, जंगल, जमीन यांची साखळीच संकटात येऊ शकेल.
मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी गावाच्या परिसरात गेल्या रविवारी दुपारी तीन वाजता पावसाला सुरुवात झाली. पाऊण तासात पंचावन्न मिलीमीटर पाऊस पडल्याने दाणादाण उडाली. हा वळीवाचा किंवा परतीचा पाऊस नव्हे. मान्सूनचा पाऊस आहे. तसा पाऊस तळ कोकण किंवा पश्चिम घाटमाथ्यावर पडतो. मराठवाड्यात नाही. गेल्या काही वर्षांत पाऊसमानात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येते आहे. महाराष्ट्रातील बहुतांश आणि देशभरातील सरासरी पन्नास टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. त्यानुसार पीक पद्धतीदेखील विकसित झाली आहे. पूर्वीचा भात किंवा भुईमूग पाच महिन्यांचा होता. खरीप हंगामाच्या काढणीवेळी पाऊस होत नसे. बियाणांच्या वाणात बदल करून उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यात आले. पिकांचा कालावधी कमी करण्यात आला; पण पावसाला असे काही करता येत नाही.
जागतिक तापमान बदलाची चर्चा सुरू झाली, त्याला वीस वर्षे होऊन गेली. प्रारंभी ही चर्चा गांभीर्याने घेतली गेली नाही. आता त्याचे धक्के बसू लागले आहेत. गतवर्षी जूनमध्ये सरासरीपेक्षा पंधरा टक्के अधिक पाऊस झाला. जुलैमध्ये सरासरीपेक्षा बावीस टक्के कमी झाला आणि पुन्हा ऑगस्टमध्ये अठ्ठावीस टक्के पाऊस अधिक झाला. गेली तीन-चार वर्षे जुलैमध्ये पाऊस ओढ देतो आहे. आताही तसाच पडेल, असा अंदाज होता; पण तो खोटा ठरतो आहे. शिवाय काही ठिकाणचा पाऊस हा खरंच मान्सूनचा आहे का, अशी शंका यावी, असा आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेशाच्या सीमेवर गेल्या आठवड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यात शंभर जण दगावले. उत्तराखंडमध्ये ढगफुटीचे प्रकार घडले. त्यात दोन डझन माणसे वाहून गेली.
महाराष्ट्राच्या पातळीवर पाहिले तर पश्चिम घाटात (सह्याद्री पर्वत रांगा) एकसारखा पाऊस पडतो. आंबोली, कोयनानगर, ताम्हिणी घाट, लोणावळा ते भंडारदरा परिसरात आणि नाशिक परिसरात जवळपास सरासरी सारखी असते. जुलैच्या तीन आठवड्यांत महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच कळसूबाई शिखर परिसरातच पाऊस कमी आहे. जवळपास नाहीच. नाशिकच्या पश्चिम भागातील आणि ठाणे जिल्ह्यातील धरणाचे पाणी मुंबई महानगराला पुरविले जाते. तेथेच पाऊस नव्हता. तो दोन दिवसांपूर्वी सुरू झाला. या आठवड्यात विदर्भाच्या काही जिल्ह्यांतून दुबार पेरणीच्या संकटाच्या बातम्या येत आहेत.
पावसाच्या प्रमाणामधील या बदलांचा महाराष्ट्राने सखोल अभ्यास नियमितपणे करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला हवे आहे. पाऊस लांबल्याने पेरण्यांचे नियोजन करता येत नाही. जून महिन्यात चांगला पाऊस होताच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने पुन्हा दडी मारताच चिंता व्यक्त करण्यात येऊ लागली. कारण गेल्या तीन-चार वर्षांतील पावसाचा पॅटर्न असा दिसतो की, जुलैचे पहिले तीन आठवडे कोरडेच जातात. हा पॅटर्न महाराष्ट्रात (दुष्काळी वर्षाचा अपवाद) नव्हता. महाराष्ट्रात विशेष करून कृष्णा-भीमा नद्यांच्या खोऱ्यात २०१९ मध्ये दुप्पट पाऊस पडला होता.
महाबळेश्वरची सरासरी साडेचार हजार मिलीमीटरची असताना साठेआठ हजार मिलीमीटर पाऊस झाला. त्यातील सुमारे तीन हजार मिलीमीटर ऑगस्टमध्येच झाला होता. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांच्या अतिवृष्टी प्रदेशात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला होता. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०८ टीएमसी असताना त्याहून अधिक पाणी सोडून द्यावे लागले होते. उद्याच्या काळात असा अवेळी, अवकाळी, सरासरीपेक्षा अधिक पाऊस कमी वेळेत होऊ लागला तर पीक, पाणी, हवामान, जंगल, जमीन यांची साखळीच संकटात येऊ शकेल. धरणे संकटात येऊ शकतील. ढगफुटीसारख्या संकटाचा सामना महाराष्ट्राला वारंवार करावा लागेल, असे वाटले नव्हते; पण सध्या ते कमी-अधिक प्रमाणात घडते आहे. या अनिश्चिततेचा सर्वाधिक फटका पीक साखळीला बसतो आहे. पीक पद्धती निश्चित करण्यासाठी बदलत्या हवामानाचा अभ्यास केला पाहिजे. रेन फोरकास्टिंग प्रणाली दीर्घ आणि लघू काळासाठी विकसित करावी लागेल. तरच या संकटाचा सामना करणे शक्य होईल.