हॉटेल्सच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या पोटात खड्डा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 08:47 AM2021-11-13T08:47:23+5:302021-11-13T08:47:32+5:30

वाढत्या महागाईमुळे हॉटेलांच्या दरात वाढ होणे स्वाभाविक असले तरी सर्वसामान्यांना या महागाईचे चटके बसणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी

Rising hotel prices pit the common man on his stomach! | हॉटेल्सच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या पोटात खड्डा!

हॉटेल्सच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या पोटात खड्डा!

googlenewsNext

- प्रसाद जोशी

गेल्या दोन महिन्यांपासून देशातील इंधनाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. इंधनाच्या दरवाढीचा फटका हा सर्वच क्षेत्रांना बसत असल्यामुळे सर्वच गोष्टींची दरवाढ झाली आहे. त्यातच आता हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने तीस टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याचे सूतोवाच केले आहे. आधीच मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना या दरवाढीमुळे मोठाच फटका बसणार आहे.

गेल्या सुमारे दीड वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधांमुळे सर्वांच्याच आयुष्यामध्ये अनेक बदल घडून आले आहेत. या निर्बंधांचा सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांमध्ये हॉटेल व्यवसाय हा अग्रस्थानी आहे. सुमारे पाऊण वर्ष या क्षेत्राला बंदचा सामना करावा लागला. त्यामुळे हॉटेल चालकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यातच आता वाढत असलेले इंधनाचे, विजेचे दर यामुळे हे क्षेत्र मोडकळीला आले, ही बाब सत्य असली तरी त्यासाठी ३० टक्क्यांपर्यंत दरवाढ ही खूपच जास्त आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही दरवाढ केली नसल्याचे हॉटेल चालकांच्या संघटनेचे म्हणणे असले तरी संघटना पातळीवर नसली तरी वैयक्तिक पातळीवर दरवाढ केली गेली आहे. त्याबाबत कोणीच तक्रारही केलेली नाही. मात्र आता एकदम मोठी दरवाढ करणे अन्यायकारक वाटते.

कोरोनाच्या निर्बंधांमुळे अनेकांचे रोजगार गेले. पगारदारांचे पगार कमी झाले आहेत. त्यामुळे त्यांचेही उत्पन्न घटलेच आहे. शिवाय अन्य ठिकाणी होत असलेली महागाईही सर्वांनाच सहनच करावी लागते आहे. आता हॉटेलांची दरवाढ झाल्यास सामान्यांना पोटाला चिमटा काढूनच रहावे लागेल, अशी स्थिती आहे. आज अनेक शहरांमध्ये हॉटेलमध्ये जेवणे हे अत्यावश्यक झाले आहे. नव्हे तर, बदललेल्या परिस्थितीमुळे ती काळाची गरज बनली आहे. अनेक जण नोकरी, व्यवसाय तसेच शिक्षणासाठी एकेकटे रहात असतात. त्यांना हॉटेल अथवा खानावळीत जेवण्याशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नसतो. मात्र मोठी दरवाढ झाल्यास आधीच मिळत असलेले तुटपुंजे उत्पन्न आणखी कमी होईल. त्याचा परिणाम अन्य गरजा कमी करणे व बचतीचे प्रमाण घटण्यामध्ये होऊ शकतो. त्यामधून मागणी कमी होऊन वस्तूंची विक्री काही प्रमाणात घटण्याची शक्यता दिसते. परिणामी अर्थव्यवस्थेच्या वाढीलाही खीळ बसू शकते.

हॉटेलांच्या दरवाढीला मुख्यत: कारणीभूत ठरत आहे ती, व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरची दरवाढ. याबाबत सरकारनेही आपला व्यावसायिक दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये दररोज बदल करण्याचा निर्णय घेताना त्यामुळे सामान्यांना एकदम दरवाढीची झळ बसणार नाही तसेच कंपन्यांनाही तोटा सहन करावा लागणार नाही, असे सांगितले गेले. हे खरे असले तरी त्याचा केवळ उत्तरार्धच खरा झाला आहे. सामान्यांच्या खिशाला लागायची ती कात्री लागतेच आहे. मात्र कंपन्यांना तोटा सहन करावा लागत नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात दर कपात झाल्यास त्याचा लाभ सामान्यांना न मिळता तो सरकार आणि कंपन्याच लाटत आहेत. कंपन्यांनी दर कमी केले तर, सरकार लगेच कर वाढवून आपले खिसे भरत असल्याचे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून सर्वजण बघत आहेत. निवडणुका आल्या की, सामान्यांचा पुळका येऊन दरवाढ थांबते आणि निवडणुका संपताच पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असे सुरू होते. त्यामुळे सरकारनेही व्यापारी वृत्ती सोडून आपले कल्याणकारी स्वरुप धारण करणे गरजेचे आहे. सरकारने असे धोरण स्वीकारल्यास एकदम होणारी दरवाढ ही नागरिक आणि व्यावसायिक यांना सहन करावी लागणार नाही. सरकारला मात्र काही प्रमाणात कराचा महसूल मिळविण्यासाठी अन्य पर्यायांचा मार्ग शोधावा लागेल.

कोणत्याही व्यवसायात ग्राहक हा देव मानला जातो. हॉटेल व्यवसायही त्याला अपवाद नाही. त्यामुळे मोठी दरवाढ करून या व्यावसायिकांचे उत्पन्न कायम राहणार असले तरी, ग्राहकांची संख्या कमी झाल्यास दरवाढीनंतरही आधीच्या उत्पन्नाएवढेही पैसे न मिळाल्यास तोटाच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा सर्वांगीण विचार करून हॉटेल चालकांनीही दरवाढीचे प्रमाण कमी ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर सर्वसामान्यांच्या पोटाला मोठाच फटका बसेल.

Web Title: Rising hotel prices pit the common man on his stomach!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :hotelहॉटेल