ग्रामीण भागात उन्हाळ्याऐवजी पाऊसकाळ जास्त जोखमीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 03:57 AM2017-08-30T03:57:04+5:302017-08-30T03:57:23+5:30
अहमदनगर तालुक्यातील निंबोडी येथे शाळेचा वर्ग कोसळून तीन विद्यार्थी दगावले. घटना घडल्यानंतर तिचे धागेदोरे शोधायचे अन् पुढे चौकशी अहवालाच्या गोधड्या तयार करायच्या असा आपला प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेचा रिवाज आहे.
अहमदनगर तालुक्यातील निंबोडी येथे शाळेचा वर्ग कोसळून तीन विद्यार्थी दगावले. घटना घडल्यानंतर तिचे धागेदोरे शोधायचे अन् पुढे चौकशी अहवालाच्या गोधड्या तयार करायच्या असा आपला प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेचा रिवाज आहे. त्याप्रमाणे चौकशांचा फार्स सुरु झाला आहे. पण, त्यातून मुलांचे गेलेले प्राण परत येणार का? या घटनेच्या प्राथमिक चौकशीतच निकृष्ट बांधकामामुळे ही खोली पडली हे समोर आले आहे. या शाळेचे बांधकाम कोणी केले ती फाईल शोधण्याचे काम घटनेनंतर सुरू झाले. हे बांधकाम आरसीसी नव्हते. लोडबेअरिंग पद्धतीने ८८ हजार रुपयात १९९७-९८ साली ही खोली बांधली गेली. म्हणजे २० वर्षही बांधकाम टिकले नाही. आपल्या राज्यकारभात प्राधान्यक्रम कशाला आहे? हा प्रश्न यातून उपस्थित होतो. राष्टÑीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च शिक्षणावर होणे आवश्यक आहे हे कोठारी आयोग सांगतो. प्रत्यक्षात एवढे पैसे कधीच मिळत नाहीत. देशात हा खर्च तीन टक्केच्या पुढे गेलेला दिसत नाही. त्यामुळे पाया असा कच्चा राहतो. सर्व शिक्षा नावाचे अभियान केंद्र सरकारने सुरू केले. पण, गत दोन वर्षे या अभियानात शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी निधीच मिळाला नाही. अशा परिस्थितीत शाळांचे वर्ग भरवायचे कुठे? आलेल्या निधीतील सिमेंट, वाळू कुठे जाते, हा आणखी वेगळा भाग आहे. घटना घडल्या की मग समाज पेटून उठतो. पण, शासकीय इमारतींचे बांधकाम सुरू असताना किती ग्रामस्थ जागरुक असतात. केवळ शासकीय यंत्रणेकडे बोट दाखवून गावांनाही आता जबाबदारी ढकलता येणार नाही. सरपंच, ग्रामसेवक काय करतात? याचीही चिकित्सा आवश्यक आहे. अखेरीस गावातील विकास कामांवर देखरेख करण्यात ग्रामपंचायतीची भूमिका महत्त्वाची आहे. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नेमके काय? याचे उत्तर जिल्हा प्रशासनानेही यानिमित्ताने द्यायला हवे. वेधशाळेने या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. अशावेळी दुर्गम व अडचणीच्या शाळांना सुटी देण्याचा निर्णय का होत नाही? उन्हाळ्यात दुपारची शाळा नको म्हणून शिक्षक संघटना जिल्हा परिषदेत येऊन भांडतात. निवेदने देतात. या शिक्षक संघटना पावसाळ्यात कोठे जातात? इंग्रजांनी उन्हाळ्यांच्या सुट्यांची पद्धत सुरु केली. तीच परंपरा आम्ही पुढे रेटतो आहे. ग्रामीण भागात उन्हाळ्याऐवजी पाऊसकाळ जास्त जोखमीचा असतो. तो जीवघेणा असतो. मात्र, या काळात शाळांची वेळ बदलावी, त्यांना सुटी द्यावी, असा विचारच पुढे येताना दिसत नाही. निंबोडीची घटना घडली तेव्हा मुसळधार पाऊस सुरु होता. पावसामुळे मुलांना घरी सोडता येत नव्हते. त्यामुळे मृत्यूच्या दाढेत मुलांना बसविणे अपरिहार्य ठरले. या घटनेतून राज्याने काहीतरी बोध घ्यायला हवा.