डोंग्याचा जीवघेणा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 12:38 AM2018-07-11T00:38:55+5:302018-07-11T00:39:37+5:30
सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून नदी नाले दुथडी भरून वाहात आहेत. पुरात वाहून गेलेल्यांचा यावर्षीचा आकडा विदर्भात १० च्या घरात गेला आहे. पुलावरून पाणी वाहात असताना रस्ता ओलांडण्याच्या नादात अनेकांनी जीव गमावला आहे तर ग्रामीण भागात शेतकामासाठी नदी ओलांडणाऱ्या मजुरांना जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतो.
सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून नदी नाले दुथडी भरून वाहात आहेत. पुरात वाहून गेलेल्यांचा यावर्षीचा आकडा विदर्भात १० च्या घरात गेला आहे. पुलावरून पाणी वाहात असताना रस्ता ओलांडण्याच्या नादात अनेकांनी जीव गमावला आहे तर ग्रामीण भागात शेतकामासाठी नदी ओलांडणाऱ्या मजुरांना जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतो. भंडारा जिल्ह्यात नदी ओलांडण्यासाठी आजही प्राचीन डोंग्याचाच वापर केला जातो. अधिकृत नसलेल्या या डोंग्याचा प्रवास अनेकांच्या जीवावर बेतला असला तरी अद्याप डोंगा बंद झाला नाही. पुरेशा सुविधा नसल्याने मजुरांसह विद्यार्थीही नदी ओलांडण्यासाठी याचाच आधार घेत असल्याचे आजही जाणवते. भंडारा जिल्ह्याच्या टोकावरील लाखांदूर तालुक्यातील आवळी गावाची अशीच भयावह स्थिती आहे. एकीकडे वैनगंगा तर दुसरीकडे चुलबंद अशा दोन नद्यांच्या मध्यभागी वसलेल्या आवळी गावाला बेटाचे स्वरूप आल्याने डोंगा हाच एकमात्र पर्याय उरतो. गावात पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून पुढील शिक्षणाकरिता येथील विद्यार्थ्यांना सोनी, लाखांदूर, वडसा येथे जावे लागते. यासाठी त्यांचा डोंग्याने प्रवास सुरू असतो. डोंगा जीवघेणा आहे, तरी त्यातून प्रवास करणे ही ग्रामीण भागातील नागरिकांची अगतिकताच. यापूर्वी १७ जुलै २०११ रोजी भंडारा येथे डोंगा उलटून तब्बल ३५ महिलांचा जीव गेला होता. तर १६ नोव्हेंबर २०१३ रोजी तुमसर तालुक्यातील उमरवाडा येथे १३ जणांना प्राणाला मुकावे लागले. या दोन्ही घटना जिल्हा प्रशासनाच्या गचाळ कारभाराला मोठी चपराक असली तरी त्यातून प्रशासनाने काहीही बोध घेतलेला नाही. हा जीवघेणा प्रवास नियमितपणे सुरू आहे. या घटनांनंतर प्रशासनाने डोंगा घाटांचा नियमानुसार लिलाव करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजही अनेक डोंगा घाटांचा लिलाव झालेला नाही. परिणामी कुणीही डोंगा तयार करतो आणि नागरिकांना ने-आण करण्याचा अनधिकृत व्यवसाय सुरू करतो. नागपूर जिल्ह्यातील कुही परिसरातील नागरिक अंभोरा घाटातून भंडारा जिल्ह्यात येतात. मात्र डोंग्याने प्रवास करू नका, एवढा सल्ला देण्यातच जिल्हा प्रशासन धन्यता मानते. लोकप्रतिनिधीही फारसे लक्ष देत नाही. डोंग्याचा प्रवास थांबवायचा असेल तर पुलांची निर्मिती करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र या लहान गावांतील बोटावर मोजण्याइतपत मतांकडे कानाडोळा केला जातो. काही मते मिळविण्यासाठी कोट्यवधींचा खर्च पुलाच्या बांधकामावर करणे परवडणारे नसल्याने डोंग्याचा जीवघेणा प्रवास दरवर्षी असाच सुरू असतो.