नात्यात हवा संस्कारांचा गंध !

By किरण अग्रवाल | Published: December 27, 2018 12:54 PM2018-12-27T12:54:03+5:302018-12-27T13:04:44+5:30

नाती ही विश्वासाच्या बळावरच टिकतात; पण हल्ली परस्परांमधील विश्वासच उतरणीला लागला आहे, त्यामुळे नात्यांमधले ठेचकाळणे वाढले आहे.

rite smell to the relation! | नात्यात हवा संस्कारांचा गंध !

नात्यात हवा संस्कारांचा गंध !

googlenewsNext

 - किरण अग्रवाल

नाती ही विश्वासाच्या बळावरच टिकतात; पण हल्ली परस्परांमधील विश्वासच उतरणीला लागला आहे, त्यामुळे नात्यांमधले ठेचकाळणे वाढले आहे. संस्कारांची रुजवणूक कमी पडल्याचे कारण तर यामागे आहेच, शिवाय हल्लीच्या पिढीतील सहनशीलतेचा अभावही त्यामागे आहे. म्हणूनच पै-पैशाच्या व्यावहारिकतेपलीकडचा व भौतिक सुखासीनतेखेरीजचा विचार करीत नात्यांचे बंध दृढ व सुरक्षित कसे राखता येतील, याची काळजी समाजशास्त्रींनी वाहणे गरजेचे होऊन बसले आहे.

किरकोळ व जुन्या पिढीच्या दृष्टीने हास्यास्पद ठरावीत अशा कारणांतून घटस्फोट दिले-घेतले जाण्याचे प्रमाण हल्ली वाढताना दिसत आहे. विभक्त कुटुंब पद्धतीतून ओढवलेले एकटेपण, त्यातून घेतली जाणारी स्वायत्तता व आपसूकच बळावणारा ‘मी’पणा, यामुळे सुखी संसाराच्या वाटचालीतले धोकेदायक वळण कुठे लाभून जाते हे अनेकांच्या लक्षातच येत नाही. विश्वासाचा रस्ता सोडून या वळणाला चुकून लागलेल्या व्यक्ती विवेक गहाण ठेवून चालू पाहतात व पुढे जाऊन कपाळमोक्ष करून घेतात. कशातून घडून येते हे सारे, याचा विचार केला तर प्रकर्षाने लक्षात येते ती बाब म्हणजे, ज्येष्ठांचे, मार्गदर्शकांचे बोट सोडून चाललेली वाटचाल. घरातल्या वडीलधाऱ्यांना गावाकडे सोडून शहरात आलेली पिढी स्वैर वा अनिर्बंध वागू पाहते. त्यातून मर्यादांचे उल्लंघन घडून येत असताना दुसरीही एक बाब वाढीस लागते जी नात्यांमधील दुरावा वाढवणारी ठरते, ती म्हणजे शंकाखोरी. एकमेकांबद्दलचा विश्वास डळमळतो तेव्हा हा शंकेखोरपणा जन्मास येतो व त्याची सुरुवात होणे हाच नात्याच्या विच्छेदाचा प्रारंभ ठरतो. कारण अविश्वासाची ठिणगीच कोणत्याही नात्याला तुटीच्या अगर फुटीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणारी असते. अशातूनच सध्या पती-पत्नीमधील मतभेदांचे व त्यातून घटस्फोटांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.

महत्त्वाचे म्हणजे, टीव्ही सिरीअल्सच्या प्रभावात तरुणपिढी अशी काही हरवून जाते की, स्वत:च्या बºयावाईटाचा विचारही ते धडपणे करीत नाहीत. एखाद्या नाजूक प्रसंगी घरातील वडीलधाºया मंडळीकडून दिला जाणारा सल्ला किंवा केला जाणारा उपदेश दुर्लक्षून ते मार्गक्रमण करू पाहतात आणि कधी कधी स्वत:चे नुकसान करून घेतात. अर्थात, सल्ला न मानणे इथवरही ठीक; पण आई-वडील आपले वाईट कशाला करतील, असा साधा विचारही न करता सुसाट निघालेली मुले नात्यांचा गळा घोटतानाही दिसतात. तामिळनाडूतील तिरुवल्लूरमध्ये प्रियकरासोबत लग्नास नकार दिल्याने एस. देवप्रियानामक तरुणीने आपल्या मातेचीच चाकूने भोसकून हत्या केल्याची ताजी घटना हेच सांगून जाते की, मुलांची नकार समजून घेण्याचीही तयारी राहिलेली नाही. बरे, हा नकार विवाह-संबंध अगर खूप काही मोठ्या कारणासाठीचा असतो असेही नाही. अगदी शुल्लक, म्हणजे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मातेचा खून करणारे दिवटे निपजल्याचीही उदाहरणे आहेत. यासारख्या घटना अपवादात्मक असल्या तरी त्या समाजमनाला अस्वस्थ करणाºया ठरतात, म्हणूनच संस्कारांची शिदोरी कमी पडतेय की काय, यासारखा प्रश्न उपस्थित होऊन जातो.

अर्थातच, संस्कार रोपणाची प्रक्रिया मंदावली आहे हे नाकारता न येणारे सत्य आहे. पूर्वी राजा-राणीच्या, परीकथांमधून आजी-आजोबा सहजपणे नीतिमूल्यांची पेरणी करून जात. हल्लीच्या आजी-आजोबांचाच वेळ टीव्हीसमोर बसण्यात जातो. पूर्वी साने गुरुजी कथामालेच्या शाखा मोठ्या प्रमाणात भरत. आता त्यांचेही प्रमाण कमी झालेय. नोकरीच्या घाण्याला जुंपलेल्या पालकांना मुलांकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नाही व आजी-आजोबा एकतर गावाकडे किंवा घरात असूनही अधिकतर टीव्हीसमोर, त्यामुळे बच्चे कंपनीला संस्काराचे धडे देणार कोण हा खरेच प्रश्न आहे. अपर्णाताई रामतीर्थंकर यांच्यासारखे प्रवचनकार याबाबत समाजमन जागृत करण्याकरिता घसा ओरडून सांगत असतात, ‘नाती जपा, त्यात अविश्वास वाढू देऊ नका; ती हरवता कामा नये, त्यासाठी संस्कारांचे कवच घट्ट करून मुलांना शिकवा.’ तेव्हा, प्रवचने ऐकून व तेवढ्यापुरते गलबलून उपयोगाचे नाही, ज्येष्ठांनी व पालकांनी गांभीर्याने याकडे बघायला हवे. उद्याच्या सुदृढ व सशक्त भारताच्या स्वप्नात हा सुसंस्कारांचा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरणारा आहे.  

Web Title: rite smell to the relation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.