रितेऽऽऽश, ‘तो’ चेहरा लक्षात ठेवा !
By राजा माने | Published: July 9, 2018 04:56 AM2018-07-09T04:56:01+5:302018-07-09T04:56:27+5:30
आजआपला इंद्रलोकांचा मराठी भूमीतील स्टार रिपोर्टर यमके खूप नाराज आणि वैतागलेला होता. या आठवड्यात इंद्रलोकांना मराठी भूमीतील कुठलाही रिपोर्ट न पाठविण्याचा निर्णय त्याने घेतला आणि महागुरू नारदांना फोन लावला...
आजआपला इंद्रलोकांचा मराठी भूमीतील स्टार रिपोर्टर यमके खूप नाराज आणि वैतागलेला होता. या आठवड्यात इंद्रलोकांना मराठी भूमीतील कुठलाही रिपोर्ट न पाठविण्याचा निर्णय त्याने घेतला आणि महागुरू नारदांना फोन लावला... नारदांची तिकडून डायलर टोन सुरू झाली, नारायण.. नारायण ... नारदांनी फोन उचलला आणि यमकेने त्यांना या आठवड्यात कुठलाही रिपोर्ट नसल्याचे सांगून टाकले. शिष्याच्या अशा वागण्याने नारदही बुचकळ्यात पडले आणि बोलू लागले...
नारद : अरे शिष्या, असे काय घडले की ज्यामुळे तू एवढा वैतागलेला आहेस?
यमके : गुरुदेव काय सांगू तुम्हाला! अहो काल रात्रीपासून मला सतत फोन येताहेत आणि तिकडून फक्त रागारागात एकच वाक्य ती व्यक्ती बोलते आणि फोन लगेच फोन कट करते..
नारद : कोणतं वाक्य?
यमके : यमकेऽऽऽ.. हा चेहरा लक्षात ठेव.. हा चेहरा लक्षात ठेव..
नारद : मग त्यात काय एवढं?त्याला फक्त हो म्हणायचं आणि लय भारी सिनेमा पाहायला पाठवून द्यायचं..
यमके : तेवढं सोप नाही. कारण तो फोन चक्क लातूर जिल्ह्यातल्या बाभळगावातून होता.
नारद : मग, त्याचे काय म्हणणे आहे?
यमके : तो म्हणतोय रितेशच्या रायगड फोटोवर एक शब्दाचा पण रिपोर्ट इंद्रदेवांना द्यायचा नाही...
नारद : पण तुझे तर रिपोर्ट देणे कर्तव्यच आहे!
यमके : गुरुदेव, रितेशने रायगडावर शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीवर फोटोसेशन केले आणि त्यास टीकेला सामोरे जावे लागले.
नारद : मग...
यमके: महाराजांच्या चरणाजवळ बसण्यामागे भक्तिभाव होता, कुणाला दुखावण्याचा हेतू नव्हता, परंतु या कृत्यामुळे कुणी दुखावले असेल तर त्यांची माफी मागतो, अशी पोस्ट रितेशने फेसबुकवर लिहून माफीही मागून टाकली.
नारद : बरं... हा रिपोर्ट दे इंद्रदेवांना...
यमके : गुरुदेव, मी तुमचा शिष्य असलो तरी रितेशचाही फॅन आहे, हे तुम्ही जाणताच.
नारद : हो, पण आपण कर्तव्यात कसूर करू नये. तू जे सत्य आहे ते कळव.
यमके : देवा सत्य तुम्ही जाणताच! त्यामुळे तुम्हीच इंद्रदेवांना रिपोर्ट द्या.
नारद : ठीक आहे मग, तू या आठवड्यात काय करणार आहेस?
यमके : मी रितेशला निरोप धाडणार आहे की, छत्रपती शिवरायांबद्दल त्याच्या मनात किती श्रद्धाभाव आहे, हे त्याच्या सर्वच फॅनना माहिती आहे. पण त्या तुझ्या रामगोपालच्या नादात त्या पितामहांचे आसन गेले होते. त्यांचे चेहरे तू कसा विसरू शकतोस? आंबेपुराण गाजूनही काही न घडण्याच्या जमान्यात त्याच्यासारख्या कलाकारांनी ताकही फुंकून प्यायला नको का? म्हणून त्याला तमाम फॅन्सच्या वतीने म्हणावे वाटते... ‘‘रितेऽऽऽश.. ‘‘तो’’ चेहरा लक्षात ठेव...काळजीने वाग, त्याला सांगावाच धाडणार आहे.