बेसुमार वाळूउपशामुळे नद्यांचे झाले गटार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 04:35 AM2018-12-10T04:35:09+5:302018-12-10T04:37:24+5:30
नद्या कोरड्या पडायला आणि पाऊस-पाणी निघून जायला एकमात्र कारण आणि ते म्हणजे, वाळूउपसा. हे कारण म्हणून कुणालाच स्वीकारावेसे वाटत नाही. कारण वाळू प्रत्येकाला हवी आहे.
- प्रमोद पवार
आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी यमुना किनारी विश्व सांस्कृतिक समारंभाचे आयोजन केले आणि त्यात १५५ देशांतील सद्भाविकांनी सहभाग नोंदवून संस्कृतीची देवाण-घेवाण केली. पंतप्रधानांनी कार्यक्रमाचे महत्त्व प्रतिपादन करताच, यमुनेचा खोटा कैवार असणाऱ्यांनी कोल्हेकुई सुरू केली. इतर वेळी यांना नद्यांशी काहीही घेणे-देणे नसते. खासगी कार्यक्रमासाठी सैनिकांचा वापर केला, यमुनेचे पात्र बदलले, खोदकाम केले, (वाळूतली म्हणायला तोंडच नाय) म्हणून मातीतली जैवविविधता नष्ट केली आणि अशी एक ना दोन अच्छे को बुरा साबित करण्यासासाठी, प्रतिमा मलीन करण्यासाठी खोडसाळबुद्धीला जी-जी कारणे सुचतील, ती-ती हरित लवादासमोर मांडण्याचा हिरिरीने मांडण्याचा प्रयत्न केला, पण दूरदूरपर्यंत किमान दिडशे किमीच्या पट्ट्यात वाळूउपसा करणाºयांनी नदीचे गटार केले, म्हणून कुणी एकजुटीने पुढे आलेले दिसले नाहीत किंवा दिसतही नाहीत. जानेवारी-फेब्रुवारीपासूनच कोरड्या पडणाºया नदीकाठी आम्ही झाडे लावू , नव्हे-नव्हे बारमाही प्रवाहीत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू, त्यात पाणी भरण्यासाठी डॉ. राजेंद्र सिंहांचा जोहड पॅटर्न राबवू, असे तळमळीने ना श्री श्री म्हणाले, ना कांगावा करणारे, ना लवादाला हे सुचले.
नद्या कोरड्या पडायला आणि पाऊस-पाणी निघून जायला एकमात्र कारण आणि ते म्हणजे, वाळूउपसा. हे कारण म्हणून कुणालाच स्वीकारावेसे वाटत नाही. कारण वाळू प्रत्येकाला हवी आहे. वाळूउपसा- रेती उत्खनन ही आता केवळ एका राज्याची समस्या नसून, ज्या-ज्या राज्यांनी अधिकृत आणि अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन दिले, सिमेंटची जंगले वाढवून शायनिंगचा वसा घेतला, तिथे-तिथे ही समस्या ‘आ’ वासून उभी राहिली आहे आणि तिने तक्रारदार शेतकºयांपासून ते पोलीस, तहसीलदार-जिल्हाधिकाºयांपर्यंतच्या कर्तव्यदक्ष-निरापराधांचे शेकडो बळी घेतले आहेत.
यमुनेच्या डोहातली सुमारे दीडशे ते दोनशे किमी पट्ट्यातील अवैध रेतीची तस्करी निदर्शनास आणूनदेखील लवाद दुर्लक्ष करतो, तर दुसरीकडे अनावश्यक गोष्टीत लक्ष घालून त्रास देण्याची भूमिका बजावतो. कृष्णा- नर्मदा ६० टक्के लहान झाल्यात, तर कावेरी ४० टक्के आणि गोदावरी २० टक्के लहान झालीय. हजारो वर्षांपासून अव्व्याहत वाहणाºया या जीवनदायिनी फक्त पावसाळ्यातच वाहू लागल्या आहेत. तीच अवस्था गेल्या १५ ते २० वर्षांत या मोठ्या नद्यांची होताना दिसतेय. पुढील १५ ते २० वर्षांत पावसाबरोबर लोंढे आले तसे मुरून जातील. आताच जानेवारी- फेब्रुवारीमध्ये नद्या सुकू लागल्यात, गोदावरी-भीमेची पात्र खोदून लोक पाणी शोधू लागलेत. यमुना, कावेरी, कृष्णेची माळराने झालीत. सुजलाम सुफलाम देशाच्या २५ टक्के भूभागाचे माळरान झालेय. मी ‘माळरान’ शब्द का वापरतोय कळतेय ना? कारण वाळवंट म्हणायला नदीत वाळू असावी लागते.
वाळूच जलस्तर कायम राखू शकते. मातीत पाणी धारण करण्याची क्षमता नसते आणि जैवविविधतेचे सृजन वाळूच्या पाण्यातच होते, सुकलेल्या यमुनेच्या पात्रात नव्हे. आजमितीला बारमाही वाहणारी कृष्णा नदी चार महिने समुद्रापर्यंत पोहोचू शकत नाही, तर कावेरी तीन ते साडेतीन महिने समुद्रापासून दूर असते. या पुढच्या पिढीसाठी धोक्याच्या घंटा नाहीत का? हजारो-लाखो वर्षे खळखळ-धोधो वाहणाºया या नद्या शायनिंगच्या नादात सिमेंटच्या जंगलापायी बांधकाम माफिया, जंगल माफिया-वाळूमाफियांबरोबरच हातमिळवणी करून, आपल्या एका पिढीनेच नष्ट करून टाकल्या. यातून निर्माण होणारा धोका आता तरी ओळखायला हवा.
(लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत)