मराठवाड्याच्या विकासाचा मार्ग खडतर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 04:22 AM2018-09-22T04:22:18+5:302018-09-22T04:22:35+5:30

अजिंठा, भोगवर्धन (भोकरदन), तगर (तेर), प्रतिष्ठान (पैठण), सिन्नर, नाणेघाट ते नालासोपारा. सातवाहनांच्या काळातील हा आंतरराष्ट्रीय मार्ग, या मार्गाने रेशमी वस्त्रे, सोने, दागिने आदींचा व्यापार परदेशाशी होत असे.

The road to development of Marathwada is difficult | मराठवाड्याच्या विकासाचा मार्ग खडतर

मराठवाड्याच्या विकासाचा मार्ग खडतर

Next

- सुधीर महाजन

अजिंठा, भोगवर्धन (भोकरदन), तगर (तेर), प्रतिष्ठान (पैठण), सिन्नर, नाणेघाट ते नालासोपारा. सातवाहनांच्या काळातील हा आंतरराष्ट्रीय मार्ग, या मार्गाने रेशमी वस्त्रे, सोने, दागिने आदींचा व्यापार परदेशाशी होत असे. आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र म्हणून भोगवर्धन, प्रतिष्ठान आणि तगर ही नगरे प्रसिद्ध होती. आताच्या भाषेत आंतरराष्टÑीय व्यापार केंद्रे होती आणि हा मार्ग म्हणजे ‘इंटरनॅशनल बिझनेस कॉरिडॉर’ होता.
आज मराठवाड्यातून राजधानी मुंबईकडे जाणारे रस्ते व इतर राज्यांना जोडणाऱ्या रस्त्यांकडे नजर टाकली, तर एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे मराठवाड्याला इतर राज्यांशी जोडणारे सगळेच रस्ते हे केवळ दोन पदरी आहेत. नांदेडहून हैदराबादकडे जायचे किंवा औरंगाबादहून इंदूरला जायचे म्हटले तरी रस्ते दोन पदरीच. पुण्याकडे जाणारा एकमेव चौपदरी रस्ता आहे. औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी; पण येथून मुंबईला जाण्यासाठी वैजापूर, येवला, नाशिक हा मार्ग किंवा शिर्डी, सिन्नर, ढोकी हा मार्ग हे दोन्ही खडतर, दोन पदरी, खड्डेमय आणि प्रवाशांची परीक्षा पाहणारे आहेत. तिसरा समृद्धी महामार्ग हा अजून कागदावरच आहे. नांदेड किंवा बीडहून मुंबईला जायचे म्हटले तरी औरंगाबादहूनच जावे लागते. बीड-औरंगाबाद राष्टÑीय महामार्ग क्र. २११ चे काम धिम्यागतीने चालू आहे. या मराठवाड्याचा राजधानी मुंबईशी थेट संपर्क सुलभ नाही. ही प्रमुख मार्गांची अवस्था आहे. मराठवाड्यातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था यापेक्षा वाईट. रस्ते हे जीवनवाहक असतात. ते चांगले असतील तर व्यापार-उदीम वाढतो; पण ही लाइफलाइनच खराब असल्याने बाजारपेठा भरभराटीला येत नाहीत.
रेल्वेचा विचार केला, तर औरंगाबाद-नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी केवळ चार रेल्वेगाड्या. त्यांच्या वेळाही फारशा सोयीच्या नाहीत. रेल्वे डब्यांची अवस्था त्याहूनही वाईट. दिल्लीला जाण्यासाठी एकच रेल्वे. एवढ्या तुटपुंज्या रेल्वेसेवेने विकासाला कोणता हातभार लागणार? सोलापूर-जळगाव हा मार्ग घोषणेपलीकडे सरकला नाही. अहमदनगर-परळी हा मार्ग कधी पूर्ण होणार? याविषयीच्या घोषणांची आणि आश्वासनांची लांबीच या मार्गापेक्षा मोठी असेल. अशी ही रेल्वेसेवा. तिचा मराठवाड्याच्या विकासाला उपयोग तो किती?
औरंगाबाहून विमानसेवा बºयाच वर्षांपासून पर्यटनस्थळ या अर्थाने परदेशी पर्यटकांसाठी ही सेवा होती. पुढे उद्योग आल्यानंतर त्यात वाढ झाली; परंतु आता मुंबईसाठी ३, तर दिल्लीसाठी दोनच विमाने आहेत. जयपूरसेवा बंद आहे. हैदराबादची सेवा विस्कळीत झाली आहे. शिर्डीला विमानसेवा सुरू झाल्यामुळे त्याचा परिणाम औरंगाबादवर झाला. त्यामुळे विमानसेवा वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. हे सगळे रस्ते, रेल्वे, हवाईमार्ग विकासाचे मार्ग असतात. त्यांचा विकास व वृद्धी हाच भरभराटीचा मार्ग असतो; परंतु याच मार्गांवर सगळे अडथळे निर्माण झाले आहेत. दळणवळणाची अद्ययावत साधनेच विकास आणतात. सध्या मंत्रालयात मुंबई-पुणे कॅप्सूलसेवेची जोरदार चर्चा आहे. वर्षभरात हे अंतर केवळ २८ मिनिटांत गाठता येईल. याचे पॉवर पॉइंट दाखविले जाते. नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने ही दोन शहरे उपनगरांइतक्या अंतरावर आणण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे; पण त्याचवेळी राज्याच्या इतर भागांकडे किती काळ दुर्लक्ष करणार? मराठवाड्याच्या विकासाचा मार्ग खडतर आहे, हे विसरता येत नाही.
(संपादक, लोकमत औरंगाबाद)

 

Web Title: The road to development of Marathwada is difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.