सुषमा गच्छंतीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 04:38 AM2018-01-20T04:38:29+5:302018-01-20T04:40:25+5:30

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे ग्रह फिरले आहेत. मोदींच्या सरकारातून त्या लवकरच बाहेर पडतील वा त्यांना ‘सन्मानपूर्वक’ नारळ दिला जाईल असे वारे सध्या दिल्लीत वाहत आहेत.

On the road to Sushma Ghankhanti | सुषमा गच्छंतीच्या वाटेवर

सुषमा गच्छंतीच्या वाटेवर

Next

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे ग्रह फिरले आहेत. मोदींच्या सरकारातून त्या लवकरच बाहेर पडतील वा त्यांना ‘सन्मानपूर्वक’ नारळ दिला जाईल असे वारे सध्या दिल्लीत वाहत आहेत. परराष्टÑ मंत्री म्हणून त्यांना स्वत:चा जराही प्रभाव देशाला दाखवता आला नाही आणि जगालाही तो कधी दिसला नाही. त्यांच्या याच प्रभावशून्यतेवर दिल्लीतील बड्या इंग्रजी वृत्तपत्रांनी अलीकडे टीकेची झोड उठविली आहे. मोदींनी देशाची सूत्रे ज्या दिवशी हाती घेतली त्या दिवसापासून देशाचे परराष्टÑ व्यवहार प्रत्यक्षात तेच सांभाळत असल्याचे देशाला दिसले आहे. त्यांनी ठेवलेल्या थोड्याशा रिकाम्या जागेतच सुषमा स्वराज यांना त्यांचे कर्तृत्व दाखविता येणे शक्य आहे. मात्र त्यांना तेही दाखविता आले नाही असे या टीकाकारांचे म्हणणे आहे. गेल्या तीन वर्षात नेपाळ, म्यानमार, बांगला देश, श्रीलंका व मॉरिशससारखे एकेकाळचे शेजारी मित्र देश भारतापासून दूर गेले. रशियाचे स्नेहसंबंधही आता पूर्ववत राहिले नाहीत आणि चीनच्या वाढत्या प्रभावाला व भारताला चहुबाजूंनी घेरण्याच्या त्याच्या प्रयत्नाला त्यांना जराही शह देता आला नाही. मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रात जेव्हा असे टीकेचे स्तंभ ओळीने प्रकाशित होतात तेव्हा त्यामागे कोणती ना कोणती राजकीय शक्ती वा व्यक्ती उभी असते. सुषमा स्वराज यांचे वैर करणारी अनेक माणसे सरकारात व संघ परिवारात आहेत. वास्तविक परराष्टÑ व्यवहारातील उपरोक्त अपयशाला त्या कारणीभूत नाहीत. चीनची ताकद व बदललेली जागतिक परिस्थिती ही त्याची खरी कारणे आहेत. मात्र त्या अपयशासाठी कोणाला तरी जबाबदार ठरविणे आणि त्या आरोपातून मोदींना मुक्त करणे ही भाजपाची गरज आहे. त्यासाठी सुषमाबार्इंची ते निवड करतील असे जाणकारांचे भाकीत व टीकाकारांचे म्हणणे आहे. तशाही त्या मुळातल्या संघपरिवारातल्या नाहीत. हरियाणात आमदार व मंत्री राहिलेल्या स्वराज या मूळच्या समाजवादी. त्यांना भाजपाच्या परिवारात जॉर्ज फर्नाडिसांनी आणले. नंतरच्या काळात त्या खासदार व वाजपेयींच्या मंत्रिमंडळात मंत्री झाल्या. दिल्लीचे मुख्यमंत्रिपदही त्यांनी काही काळ चालविले. मात्र संघात असलेला त्यांच्याविषयीचा संशय त्यामुळे कधी कमी झाला नाही. शिवाय आता तर अपयशाचे निमित्तही त्यांच्या हाती आहे. मोदींच्या एकाही परदेशवारीत त्या त्यांच्यासोबत दिसल्या नाहीत. विदेशी नेत्यांशी होणाºया चर्चेतही त्या कधी दिसत नाहीत. ‘सबकुछ मोदी’ असेच आताच्या सरकारचे स्वरूप असल्याने कोणत्याही मंत्र्याचे काम त्याचे राहिले नसून त्याचे सारे श्रेय मोदींकडे जाणारे आहे. मोदी स्वत:ही ते तसे कुणाला देत नाहीत. मनोहर पर्रीकरांनी संरक्षण मंत्रिपद सोडले तेव्हा कुणाच्याही ध्यानीमनी नसताना मोदींनी ते त्यांच्या मंत्रिमंडळात २२ व्या क्रमांकावर असलेल्या निर्मला सीतारामन यांना दिले. गंमत ही की त्यांच्या मंत्रालयाबाबत त्या स्वत: कमी बोलतात वा बोलत नाहीत. त्यांचे सेनाप्रमुख विपीन रावत मात्र नको तेवढे व नको तसे बोलत असतात. परवा जम्मू आणि काश्मीरच्या सरकारनेच त्यांना ‘जरा व्याख्याने देणे कमी करा’ असे ऐकविले. मोदींच्या सरकारात सुषमाजी काय आणि निर्मलाजी काय, यांना तसेही फारसे महत्त्व नाही. तरीही सध्याच्या परराष्टÑ व्यवहारातील माघारीसाठी भाजपाला ‘बळीचा बकरा’ हवा आहे आणि यासाठी सुषमा स्वराज या आता राजकारणातही पुरेशा उपयुक्त न राहिलेल्या मूळच्या समाजवादी महिला उपयोगाच्या आहेत. वृत्तपत्रांनी त्यांच्याविरुद्ध प्रकाशित केलेल्या स्तंभांच्या मागे कोण असेल याचा अंदाज यातून कोणालाही बांधता येणार आहे. स्वत:चा दोष नसताना, जागतिक स्थितीच्या परिणामामुळे असे घडले तर त्याचा सुषमा स्वराज यांच्या देशभरातील चाहत्यांना धक्का बसणार आहे. मात्र मोदींचे सरकार धक्कातंत्रात वाक्बगार आहे हेही विसरता येत नाही.

Web Title: On the road to Sushma Ghankhanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.