आजी-आजोबांशी गप्पा मारतील ‘रोबोटस्’!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 10:26 AM2022-11-16T10:26:21+5:302022-11-16T10:26:44+5:30
Robots: अनेक कारणं आहेत, पण अनेक देशांत बुजुर्गांची स्थिती अतिशय हलाखीची आहे. ज्या काळात, ज्या वयात वृद्धांना मदतीची खरी गरज आहे, नेमक्या त्याच वेळी त्यांच्याजवळ कोणी नाही. एकटेपणाचं आणि हलाखीचं जीवन त्यांना जगावं लागत आहे.
अनेक कारणं आहेत, पण अनेक देशांत बुजुर्गांची स्थिती अतिशय हलाखीची आहे. ज्या काळात, ज्या वयात वृद्धांना मदतीची खरी गरज आहे, नेमक्या त्याच वेळी त्यांच्याजवळ कोणी नाही. एकटेपणाचं आणि हलाखीचं जीवन त्यांना जगावं लागत आहे. अनेकांच्या तर मुलांनीच त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे किंवा अनाथाश्रमात ठेवलं आहे. काहींना तर तेही सुख नाही. कारण घरात वृद्धांची अडगळ नको, आपल्या संसारात त्यांची लुडबुड नको म्हणून मुलांनीच त्यांना घरातून बाहेर काढलं आहे.
अनेकांची मुलं परदेशात शिकायला गेली आणि नंतर तिथेच स्थायिक झाली. त्यांच्याकडे पाहायला कोणीच नाही. अशा वयस्कर पालकांकडे पैसा आहे, घर आहे; पण त्यांचीही अवस्था अतिशय दयनीय. आपल्या हक्काचं कोणीतरी असावं, आपल्याशी बोलावं, किमान नातवंडांशी तरी खेळता यावं, यासाठी या वृद्धांचा जीव अक्षरश: आसुसलेला असतो; पण त्यांची ही आस त्यांना आतून आणखी पोखरून काढते. यातल्याच काही वृद्धांचं दुखणं आणखी वेगळं. कारण एकटे राहत असल्यामुळे अनेक भामट्यांचा त्यांच्यावर, त्यांच्या संपत्तीवर डोळा असतो. त्यातूनच अनेक वृद्धांचा त्यांच्या राहत्या घरीच खून झाल्याच्या आणि त्यांची संपत्ती घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याच्या अनेक घटना तर हरघडी होत असतात.
ज्येष्ठांच्या या प्रश्नावर आता विज्ञान-तंत्रज्ञानानंच उत्तर शोधलं आहे. रोबोटस् आज अनेक आघाड्यांवर आणि अनेक अडचणींवर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मानवी बुद्धी, शक्ती आणि आवाक्याच्या बाहेर असलेली अनेक कामं आज रोबोटस् सहजी करीत आहेत. वृद्धांच्या एकाकीपणावर मात करण्यासाठीही आता हे रोबोट्सच पुढे सरसावले आहेत. या वृद्धांसाठी आता खास ह्यूमनॉइड रोबोटस् बनवले जात आहेत. हे रोबोटस् आता एकाकी वृद्धांची सारी काळजी घेतील. त्यांच्याच सोबत, त्यांच्याच घरात राहून त्यांचा एकाकीपणा घालवतील. त्यांची सारी कामं करतील. त्यांना सोबत करतील. त्यांच्याशी गप्पा मारतील. त्यांचं संरक्षण करतील. त्यांच्याशी खेळतील. इतकंच काय, वृद्धांचे हे नवे साथीदार म्हणजे एक यंत्रमानव आहे, याची जाणीवही या वृद्धांना होणार नाही, हे याचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य ! कारण आता संशोधकांनी असे यंत्रमानव, रोबोटस् तयार केले आहेत, जे कुठल्याही पद्धतीनं यंत्र वाटणार नाहीत. ते हुबेहूब माणसासारखे दिसतील. समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेतील. त्याच्याशी बोलतील, गप्पा मारतील आणि त्याच्या प्रश्नांना उत्तरं देतील. हे रोबोटस् वृद्धांशी विविध खेळही खेळतील. हे खेळ या रोबोट्सना आधीच शिकवलेले असतील; पण प्रत्येक वेळी ते जिंकतीलच असं नाही. उदाहरणार्थ रोबोटस् त्यांच्या वृद्ध जोडीदारांबरोबर बुद्धिबळ खेळतील; पण ते हरू शकतील, एवढंच ज्ञान त्यांना दिलेलं असेल. त्यामुळे आपल्या या रोबोटस् जोडीदाराला हरवण्याचा आनंदही आजी-आजोबांना मिळेल. ब्रिटनच्या ‘इंजिनिअर्ड आर्टस्’या रोबोटिक्स कंपनीनं नुकताच एक असा ह्यूमनॉइड रोबोट तयार केला आहे, जो माणसाची सारी कामं करेल. त्याच्याशी गप्पा मारेल, त्याच्यासोबत राहील आणि त्याचा चेहराही अगदी माणसासारखाच असेल.
या कंपनीचे मालक जॅक्सन यांचं म्हणणं आहे, या ह्यूमनॉइड रोबोट्सच्या डोळ्यांमध्ये कॅमेरा लावलेला असेल, ॲनिमेशनचा उपयोग करून त्यांचा चेहराही अगदी माणसासारखा दिसेल आणि प्रत्येक मानवी भावना तो व्यक्त करू शकेल, असा आमचा प्रयत्न आहे.
जपानच्या इंटेलिजेंट रोबोटिक्स लॅबचे संचालक हिरोशी इशिगुरो यांनी तर थेट आपल्या स्वत:च्याच चेहऱ्याचा ‘डमी’ रोबोट तयार केला आहे. एका रोबोटला तर चक्क जपानचे डिजिटल मंत्री कोनो तारो यांचाच चेहरा देण्यात आला आहे!
डोळ्यांत पाहून बोलणारी अमेका !
शास्त्रज्ञांनी अमेका नावाच्या एका महिला रोबोटची नुकतीच निर्मिती केली आहे. अमेका एकाच वेळी अनेक लोकांशी संवाद साधू शकते. ती अजून चालू शकत नाही. तिच्या पायांची निर्मिती सुरू आहे. मुख्य म्हणजे आपले पाय तयार होत आहेत, हे तिलाही माहीत आहे. त्यामुळे ती म्हणते, थांबा की थोडे दिवस, मग मी तुमच्यासोबत फिरायलाही येईन! अमेका जगभरातील बुजुर्गांची खरी साथीदार, जोडीदार ठरू शकेल. ती त्यांना कायम सोबत देऊ शकेल. त्यांच्या गरजेच्या गोष्टींची, उदाहरणार्थ औषधं, गोळ्या यांची आठवण करून देईल. त्यांच्या आवडीचा टीव्हीवरील कार्यक्रम त्या त्या वेळी लावून देईल. एवढंच नाही, समोरच्याच्या डोळ्यांत पाहून ती बोलेल, त्यामुळे त्यांच्यात आपलेपणाची भावनाही निर्माण होईल!