रॉजर फेडररच्या विश्वविक्रमी पर्वाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 04:29 AM2018-01-31T04:29:45+5:302018-01-31T04:30:05+5:30
२०१२ साली विम्बल्डन जिंकल्यानंतर दुखापतीने ग्रासलेल्या रॉजर फेडररला पुनरागमन करण्यासाठी खूप झुंजावे लागले. या वेळी त्याचा खेळ पाहून अनेकांनी त्याच्या निवृत्तीची चर्चा रंगवली होती. मात्र, गेल्याच वर्षी आॅस्टेÑलियन ओपन जेतेपद पटकावल्यानंतर त्याने पुन्हा आपल्या वर्चस्वाची जाणीव करून दिली.
- रोहित नाईक
दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने रविवारी वयाच्या ३६व्या वर्षी तब्बल २०वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावत सर्वांना चकित केले. या अद्भुत कामगिरीने संपूर्ण क्रीडाविश्व स्तब्ध झाले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. टेनिस खेळातील वेग, हालचाल, ताकद आणि आवश्यक असलेली तंदुरुस्ती पाहता, एकेरी गटासाठी वयाची जास्तीतजास्त ३२ वर्षे ओलांडल्यानंतर खेळाडू थांबण्याचा विचार करतात, पण फेडरर नुसता थांबलाच नाही, तर दुखापतीतून स्वत:ला सावरून घेत तुफानी पुनरागमन केले आहे.
जवळपास २ दशकांपासून टेनिस विश्वावर राज्य करत असलेला फेडरर आजही युवा खेळाडूंपुढे केवळ आव्हान उभे करत नसून, त्यांच्याहून अधिक चपळतेने खेळत आहे. यामागचे रहस्य शोधण्यात आजची पिढी यशस्वी ठरली, तरच त्यांना यश मिळवता येईल. अर्थात, ते रहस्य अंमलात आणणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण फेडररची कठोर मेहनत हे त्याचे सर्वात मोठे गुपित आहे. गेल्याच वर्षी आॅस्टेÑलियन ओपन जिंकताना फेडररने तब्बल साडेचार वर्षांचा ग्रँडस्लॅम जेतेपदांचा दुष्काळ संपविला होता. २०१२ साली विम्बल्डन जिंकल्यानंतर दुखापतीने ग्रासलेल्या फेडररला पुनरागमनासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्याने पुनरागमन केले, पण त्या वेळी फॉर्ममध्ये असलेल्या नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरे यांच्या धडाक्यापुढे प्रमुख स्पर्धांमध्ये त्याची मजल फार फार तर उपांत्य फेरीपर्यंत होत असे.
त्यामुळे फेडरर पर्व संपले असल्याची चर्चाही टेनिस विश्वात रंगली होती. मात्र, झुंजार फेडररने हार न मानता, काही स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेत, दुखापतीतून पूर्णपणे सावरण्याचे ठरविले आणि हा निर्णय अगदी योग्य ठरताना गेल्या वर्षी नवा फेडरर जगापुढे अवतरला. आज फेडरर अगदी युवा खेळाडूप्रमाणे धडाक्यात खेळत आहे. त्याचा खेळ पाहून सध्या तरी त्याला रोखणे अशक्य दिसत आहे. याचा प्रत्यय आत्ताच आॅस्टेÑलियन ओपनमध्ये आला. एकीकडे सर्व खेळाडू आॅस्टेÑलियाच्या उष्ण हवामानाविषयी तक्रार करत असताना, काही खेळाडू या वातावरणापुढे हार मानत होते, तर दुसरीकडे ‘बुजुर्ग’ फेडररने याच वातावरणामध्ये जेतेपदाला गवसणी घालत सर्वांना तंदुरुस्ती कशी राखावी याचा धडा दिला.
मुळात तंदुरुस्ती राखण्यासाठी तुम्ही कसे खेळता, यापेक्षा कुठे खेळता, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. फेडररने नेमकी हीच गोष्ट साधली. आज फेडरर अशा शिखरावर विराजमान आहे, जेथे त्याला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. मात्र, तरीही जिंकण्याची भूक संपलेली नसल्याने तो आजही टेनिस कोर्टवरील आपला दबदबा राखण्यासाठी खेळतोय. यासाठी त्याने मोजक्या, परंतु केवळ प्रमुख स्पर्धांनाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.
दुखापतीतून पुनरागमन करण्यापेक्षा पुनरागमनानंतर यशाचे शिखर गाठणे हे कधीही कठीण असते. हेच शिखर फेडररने आज काबीज केले आहे. त्याच वेळी राफेल नदाल, नोव्हाक जोकोविच, अँडी मरे आणि स्टॅन वावरिंका हे फेडररचे मुख्य प्रतिस्पर्धी दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतरही झुंजताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या फेडररच्या विश्वविक्रमी पर्वाला सुरुवात झाल्याचे म्हटले, तरी चुकीचे ठरणार नाही.