रोहित वेमुला : जातवाद व राजकीय हस्तक्षेपाचा बळी
By admin | Published: February 10, 2016 04:31 AM2016-02-10T04:31:13+5:302016-02-10T04:31:13+5:30
हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुला या पीएच. डी. करणाऱ्या दलित विद्यार्थ्याने १७ जानेवारी, २०१६ रोजी आत्महत्त्या केल्याच्या बातमीने सबंध देशभर प्रथमच
- प्रा.भालचन्द्र मुणगेकर
(माजी कुलगुरु, मुंबई विद्यापीठ)
हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुला या पीएच. डी. करणाऱ्या दलित विद्यार्थ्याने १७ जानेवारी, २०१६ रोजी आत्महत्त्या केल्याच्या बातमीने सबंध देशभर प्रथमच खळबळ उडाली. खरे पाहाता, उच्य शैक्षणिक संस्थामध्ये, विशेषत: व्यावसायीक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रशासन व शिक्षक यांच्याकडून दलित विद्यार्थ्यांना जातीच्या पार्श्वभूमीमुळे वाईट वागणूक देणे, लेखी परीक्षेत खूप चांगले गुण मिळाल्यानंतरही तोंडी परीक्षेत अगदी कमी गुण देऊन नापास करणे व त्यांचे करिअर बरबाद करणे, कधी कधी त्यांचा मानसिक छळ करणे व त्याला कंटाळून अशा दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्त्या करणे या गोष्टी आता काही नवीन राहिल्या नाहीत. गेली ४० वर्षे माझा शिक्षण क्षेत्राशी विविध पातळ्यांवर घनिष्ट संबंध आल्यामुळे मी या गोष्टी स्वत: पाहिल्या आहेत आणि काही घटनांविषयी केंद्र सरकारला चौकशी अहवालही सादर केले आहेत.
रोहितची केस खळबळजनक होण्याचे कारण म्हणजे त्याच्या आत्महत्त्येला विद्यापीठाच्या प्रशासनाबरोबरच, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक भाजपा आणि अभाविप च्या मंडळीनी केलेला हस्तक्षेप. अगदी थोडक्यात ती केस अशी:
याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर आंबेडकर विद्यार्थी संघटनेने विद्यापीठ परिसरात फाशीच्या शिक्षेविरुद्ध पदयात्रा काढली. त्यावर प्रतिक्रिया म्हणून नंदानाम सुशीलकुमार या अभाविपच्या पदाधिकाऱ्याने आपल्या फेसबुकवर आक्षेपार्ह कॉमेन्ट केली. आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला. सुशीलकुमारने फेसबुकवरून तो मजकूर काढला व माफीही मागितली. खरे म्हणजे इथेच प्रकरण थांबले असते. परंतु तसे झाले नाही.
सुशीलकुमारचे चुलते आणि भाजपाचे स्थानिक नेते नंदानाम दिवाकर यांनी १० आॅगस्ट रोजी केंद्रीय श्रममंत्री दत्तात्रेय बंडारू याना पत्र लिहून सुशीलकुमारला मारहाण केल्याबद्दल व याकूबच्या फाशीविरोधी पदयात्रा काढल्याबद्दल दलित विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली व परिस्थितीने पूर्णपणे राजकीय वळण घेतले. बंडारूंनी त्वरित म्हणजे १७ आॅगस्ट रोजी मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणींना पत्र लिहिले आणि दलित विद्यार्थ्यांवर त्यांच्या ‘जातीवादी, अतिरेकी व देशद्रोही कारवायांबद्दल’ कारवाई करण्यास सांगितले. इराणी यांच्या मंत्रालयाने ३ सप्टेंबर रोजी विद्यापीठास पत्र लिहून बंडारू यांच्या पत्राबाबत खुलासा मागितला, म्हणजे कारवाई करण्यास सांगितले. या प्रकरणी इराणींचे मंत्रालय इतके तत्पर आणि कार्यक्षम की त्याने दोन महिन्यात विद्यापीठाला पाच स्मरणपत्रे पाठवली.
रोहित वेमुला प्रकरणी दोन महत्वाचे मुद्दे आहेत. दलित विद्यर्थ्यांनी सुशीलकुमारला मारहाण केली आणि याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर पदयात्रा काढली. मारहाणीबाबत विद्यापीठाने नेमलेल्या पांडे समितीने पहिला आरोप पूर्णपणे फेटाळला. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सैबराबादचे पोलीस कमिशनर सी.व्ही.आनंद (ज्यांना मी २५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष भेटलो) यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही हा आरोप अमान्य केला आहे. उलट त्यानी सुशीलकुमारला अपेंडिक्ससाठी उपाय करणाऱ्या डॉक्टरचा हवाला देऊन अपेंडिक्समुळे सुशीलकुमारच्या पोटात दुखल्याचे नमूद केले आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की दलित विद्यार्थ्यांनी सुशीलकुमारला मारहाण केल्याचा फक्त कट रचण्यात आला.
आता मुद्दा दलित विद्यार्थांच्या तथाकथित राष्ट्रद्रोही कृत्याचा. याकूब मेमनला फाशी देशाच्या कायद्यानुसार झाली. परंतु फाशीच्या शिक्षेला एखाद्याने विरोध केला, तर तो राष्ट्रद्रोह कसा ? फाशीच्या शिक्षेला विरोध करणारे आज भारतात लाखो लोक आहेत. म्हणजे रोहित प्रकरणी फाशीच्या तत्वाचा मुद्दा नसून याकूबच्या फाशीला दलित विद्यार्थ्यांनी विरोध करणे म्हणजे संघ परिवारच्या मुस्लीमविरोधी विचारसरणीला त्यांनी आव्हान दिल्याचे समजणे, हा आहे.
इराणी यांच्या पाच स्मरणपत्रांचा परिणाम असा झाला की पांडे समितीने आपला पहिला अहवाल बदलून दलित विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा दुसरा अहवाल दिला व पाच विद्यार्थ्यांना विद्यापीठातून निलंबित केले. १८ सप्टेंबर रोजी त्यांच्या वसतिगृहातील खोल्यांना टाळे ठोकले. त्याच दिवशी रोहित वेमुलाने कुलगुरू व्ही. आप्पाराव यांना पत्र लिहून आत्महत्त्या करण्यासाठी दलित विद्यार्थ्यांना विष द्यावे अथवा दोरखंड द्यावा, असे सांगितले. आप्पाराव यांनी महिनाभर कसलीच दखल घेतली नाही. संबधित पाच जणांना साधे चर्चेलाही बोलावले नाही. १७ जानेवारी २०१६ रोजी आपल्या मित्राच्या खोलीत गळफास लावून रोहितने आत्महत्त्या केली.
गेल्या अनेक वर्षात माझ्या सान्निध्यात आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांमधील मागच्या चार वर्षातील रोहित हा एक अत्यंत हुशार, प्रचंड क्षमता व आत्मविश्वास असलेला, शाहू-फुले-आंबेडकर-पेरियार यांच्या समतेच्या विचारांनी झपाटलेला, समाजशास्त्रे व सायन्स या दोन्हीमध्ये पीएच.डी. करण्यासाठी फेलोशिप मिळवणारा, डॉक्टर-इंजिनियर-उद्योगपती-कलेक्टर-शास्त्रज्ञ होण्याची स्वप्ने पाहाणारा आणि अन्यायाच्या विरोधी पेटून उठणारा २६ वर्षांचा दलित युवक. २० वर्षांपूर्वी वडिलांनी सर्वाना सोडून दिल्यानंतर शिवणकाम करून त्याला उभे करणारी व त्याच्या भविष्याची स्वप्ने पाहणारी त्याची दुर्दैवी आई राधिका, भाऊ व बहीण, सगळे उद्ध्वस्त झाले.
प्रसंगी दलित युवकांची आयुष्ये उद्ध्वस्त करणारी येथील विकृत जाती-व्यवस्था आणि त्याच्या जोडीला विषमतेने ग्रस्त झालेले प्रशासन अशा किती रोहित वेमुलांचे बळी घेणार आणि त्याच्या विरोधात या देशातील तथाकथित समतावादी काय करणार, हाच भविष्यातील खरा प्रश्न आहे. (लेखकाने २५, ३० आणि ३१ जानेवारी रोजी विद्यापीठास भेट दिली, सर्व कागदपत्रे जमा केली, तसेच निदर्शने व मेणबत्त्या मिरवणुकीत सहभागही घेतला.)