रोहितच्या जातीचे राजकारण करतो कोण ?
By admin | Published: February 10, 2016 04:31 AM2016-02-10T04:31:52+5:302016-02-10T04:31:52+5:30
रोहित वेमुलाच्या आत्महत्त्येचे प्रकरण केंद्र व आंध्र सरकारांएवढेच भाजपा आणि संघ परिवारालाही दीर्घकाळ भेडसावत राहणारे आहे. रोहित हा दलित होता की नाही असे फाजील प्रश्न पु
रोहित वेमुलाच्या आत्महत्त्येचे प्रकरण केंद्र व आंध्र सरकारांएवढेच भाजपा आणि संघ परिवारालाही दीर्घकाळ भेडसावत राहणारे आहे. रोहित हा दलित होता की नाही असे फाजील प्रश्न पुढे करून त्या प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वेधण्याचा त्या साऱ्यांचा प्रयत्न त्यांच्याच अंगलट येणारा आहे. रोहित दलित नसेल तर त्याला अशी आत्महत्त्या करू द्यायची असते काय, हा या फसव्या युक्तिवादातून पुढे येणारा प्रश्न आहे आणि तो दलितांएवढाच सवर्णांच्या संतापालाही कारणीभूत ठरणारा आहे. रोहित एक बुद्धिमान तरूण होता. त्याने लिहून ठेवलेले अखेरचे पत्र त्याची बौद्धिक उंची व महत्त्वाकांक्षा पटवून देणारे होते. अशा विद्यार्थ्यावर आत्महत्त्येची पाळी आणणे हाच मुळात एक मोठा अपराध आहे. तो दलित होता की सवर्ण हा भेदमूलक विचार या प्रश्नावर पाणी फिरवणारा आहे. मग तो विचार केन्द्रीय मंंत्रिमंडळातील स्मृती इराणी यांनी विचारलेला असो वा सुषमा स्वराज यांनी. आत्महत्त्या करणे भाग पडणाऱ्या विद्यार्थ्याची वा नागरिकाची जात महत्त्वाची असते की त्याचा जीव? आपले दुर्दैव हे की आपला सामाजिक विचार जातीपाशी सुरू होतो आणि तो जातीबाहेर जातही नाही. मारणाऱ्याची जात, मरणाऱ्याची जात, आत्महत्त्या करणाऱ्याची वा ती करायला भाग पाडणाऱ्यांची जात मरणाऱ्याच्या मृत्यूहून मोठी ठरत असेल तर आपले सामाजिक गैरवास्तव आणखी दीर्घकाळ असेच राहणार आहे हे लक्षात येते. दुर्दैवाने राजकारणातून सामाजिक आचार व अर्थविचार बाद होण्याचे व त्यांची जागा जात आणि धर्म या राजकारणबाह्य मतांनी घेण्याचे दिवस अद्याप संपले नाहीत. दिल्लीत नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून तर त्यांना जास्तीचे भरते आले आहे. खरेतर रोहित वेमुला याची जात कोणती हा प्रश्न या साऱ्या गदारोळात पुढे येण्याचेच काही कारणच नव्हते. परंतु संघ परिवार आणि त्याच्या संघटना यांना प्रत्येकच गोष्टीला जातीचा वा धर्माचा रंग देण्याचा सराव असल्यामुळे त्याने या मानवी व राष्ट्रीय प्रश्नाला जातीय बनविण्याचे राजकारण सध्या चालविले आहे. परिणामी राहुल गांधींनी रोहितच्या जन्मदिनी केलेले उपोषण हाही त्या परिवाराला ‘राजकीय फार्स’च वाटला आहे. भाजपाच्या एकाही नेत्याला, मंत्र्याला, प्रवक्त्याला वा कार्यकर्त्याला रोहितच्या परिवाराला भेट देण्याची इच्छा वा हिंमत न होणे ही एकच बाब या प्रकरणाला जातीय राजकारणाचा रंग कोण देत आहे हे सांगायला पुरेशी आहे. दुर्दैवाने आपल्यातील दलितांमध्येही अनेक जाती आहेत आणि त्या प्रदेशवार वेगळ््या आणि विभागल्या आहेत. त्यामुळे हैदराबादच्या रोहितचे दलित असणे हे एका वेगळ््या दलित समूहाचे असू शकते एवढे साधे ज्ञानही आपल्या केंद्रीय लोकांना असू नये हीच आश्चर्याची बाब आहे. एक गोष्ट मात्र खरी, रोहित वेमुलाच्या आत्महत्त्येने देशभरातील सर्व जातींच्या दलितांएवढेच सवर्णांमधील उदारमतवादी व पुरोगामी विचाराच्या लोकानाही एकत्र आणण्याचे व अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे काम नक्कीच केले आहे. रोहितच्या आत्महत्त्येची सर्वाधिक जबाबदारी शिरावर असलेल्या हैदराबाद विद्यापीठाच्या कुलगुरुंनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला स्वच्छ नकार दिला असला तरी तेथील प्र-कुलगुरुंनी मात्र दीर्घकालीन रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय त्या विद्यापीठातील २० हून अधिक ज्येष्ठ प्राध्यापकांनी त्यांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या या प्रकरणामुळे सोडल्या आहेत. एका तरुण विद्यार्थ्यासाठी साऱ्या देशाचे राजकारण ढवळून निघते, एका विद्यापीठासह राज्य व केंद्र सरकार अपराध्याच्या कठड्यात उभे राहते, त्यांच्या परिवाराला बचावासाठी चोरटी कारणे शोधावी लागतात आणि कोणत्याही प्रश्नावर एकत्र न येणारे देशातील राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष एकत्र आलेले दिसतात ही बाब देशाच्या राजकारणात व समाजकारणात प्रथमच घडत असलेली आपण पाहात आहोत. काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी, जदयू, बसप व रिपब्लिकन पक्ष यासह अनेक सामाजिक व राजकीय संघटना या प्रश्नाचा निकाल लावून घेण्यासाठी आता एकत्र आल्या आहेत. या प्रकरणातील खऱ्या आरोपींना जोवर शिक्षा होत नाही आणि त्यांना पाठीशी घालण्याचे पाप करणारे त्याचे प्रायश्चित्त जोवर घेत नाहीत तोवर हा प्रश्न असाच धगधगत राहणार आहे. झालेच तर या प्रकरणात भाजपा व संघ परिवार हा एकाकी पडला असून त्यालाच रोहित वेमुलाच्या आत्महत्त्येचे पातक स्वीकारावे लागणार आहे. राहुल गांधी यांनी रोहितच्या जन्मदिनी उपोषण केले या गोष्टीचा आपल्या बाजारू व प्रचारी राजकारणासाठी उपयोग करणे त्याला पुरेसे नाही. तसाही देशाच्या समाजकारणात व राजकारणात सूड घेणाऱ्या खुनी वृत्तीने प्रवेश केला आहे. आतापर्यंत त्याची लागण महाराष्ट्रात, कर्नाटकात, उत्तर प्रदेशात आणि मध्य प्रदेशात होती. आता ती आंध्र प्रदेशासारख्या दाक्षिणात्य राज्यातही पोहोचली आहे आणि तिचे स्वरुप कमालीचे संतापजनक व निंदनीय आहे.