क्रिकेटची उत्कंठा वाढवण्यातील तंत्रज्ञानाचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 03:05 AM2019-06-22T03:05:59+5:302019-06-22T03:07:28+5:30

क्रिकेट आणि तंत्रज्ञानाची जोडी कशी जमत गेली त्याकडे टाकलेली धावती नजर...

role of technology in increasing excitement of cricket | क्रिकेटची उत्कंठा वाढवण्यातील तंत्रज्ञानाचा सहभाग

क्रिकेटची उत्कंठा वाढवण्यातील तंत्रज्ञानाचा सहभाग

Next

- डॉ. दीपक शिकारपूर, संगणक साक्षरता प्रसारक

विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता रंगात येऊ लागली आहे. क्रिकेट हा आपला (जरा जास्तच) राष्ट्रीय खेळ (किंवा उद्योग, पूजास्थान, विरंगुळा... काहीही म्हणा) बनल्यामुळे आता सर्वत्र त्यासंबंधीच्या चर्चेला उधाण येते आहे. आजकाल नवतंत्रज्ञान सर्वांच्याच जीवनात पूर्णपणे भिनले आहे. त्या दृष्टीने क्रिकेट (किंवा एकंदरीनेच क्रीडाप्रकार) आणि तंत्रज्ञानाची जोडी कशी जमत गेली, याकडे आपण एक धावती नजर टाकू.



हॉक आय - ५०० पासून ५० हजारांपर्यंतचे तिकीट काढून प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याची गरज नवतंत्रज्ञानाने ठेवली नाही. कारण अगदी तसाच अनुभव सुधारत्या तंत्रज्ञानामुळे घरबसल्या मिळू लागला. तसे पाहिले तर ऑनलाइन बुकिंग साइट्सवरही कोणत्या आसनावरून खेळपट्टीचे एकंदर दृश्य कसे दिसेल याचे पूर्वावलोकन म्हणजेच प्रीव्ह्यू (बुकिंग करण्यापूर्वी) मिळू शकते, हीदेखील नवतंत्रज्ञानाचीच देणगी आहे. एकच शॉट टीव्हीवर अनेक कोनांतून पाहण्याची सोय झाली, तीदेखील एक्स्पर्ट कॉमेंटसहित. टाकलेला चेंडू गुडलेंग्थऐवजी गुगली किंवा यॉर्कर असता तर तो फलंदाजाकडे कोणत्या कोनातून आणि किती वेगाने गेला असता; त्याने तो कसा फटकावला असता अशासारख्या बाबींचे विश्लेषण संगणकीय प्रणालींमुळे तत्काळ होऊ लागले. ‘हॉक आय’ हे या तंत्राचे उदाहरण आहे. वादग्रस्त निर्णयाच्या समस्येतून योग्य मार्ग काढण्यासाठी अंपायरला साहाय्य करणे हे या ‘मल्टिकॅमेरा सिस्टीम’चे खरे काम असले तरी प्रेक्षकांना घरबसल्या अधिक माहिती देऊन त्यांचा आनंद वाढवणे यासाठीच ती वापरली जाते, असे म्हणता येईल!

स्काय कॅम - थेट प्रक्षेपण पाहण्यातली गंमत वेगळीच असली, तरी काही कारणाने ते शक्य नसलेल्यांना रेकॉर्डेड सामना पाहणे डीटीएच तंत्रज्ञानाने शक्य झाले आहे.



विविध कोनांतून सामना दाखवायचा तर मुळात त्याचे चित्रीकरणही तसे व्हायला हवे! त्याकरिता कॅमेरा-अँगल आणि त्यासंदर्भातही नवी साधने, प्रणाली आणि उपकरणे उपलब्ध झाली आहेत. मैदानाच्या मध्यभागी खूप उंचीवर असणारे स्पायडर कॅमेरा, स्काय कॅम ही त्याची चांगली उदाहरणे आहेत. सुपर-स्लो मोशन, स्पीडगन, स्टंपमधील कॅमेरे ही इतर उपकरणे पूर्वीपासून आहेतच.



आणखी काही तंत्रे - याखेरीज ‘हॉट स्पॉट’ नावाचे ‘इन्फ्रारेड किरणांवर चालणारे’ तंत्र आहे. त्याचा वापर चेंडूचा बॅटला वा यष्टीला खरोखरीच स्पर्श झाला आहे अथवा नाही हे ठरवण्यासाठी केला जातो. ‘स्निकोमीटर’ नावाची यंत्रणा याच कामासाठी वापरली जाते. चेंडूचा यष्टी अथवा बॅटला निसटता का होईना स्पर्श झाला की थोडा तरी आवाज येणारच, नाही का? (विशेषत: चेंडूचा वेग ताशी ८० ते १०० किमी असताना तर नक्कीच!) हा मीटर यष्टीमधील अति-संवेदनशील मायक्रोफोनसोबत काम करून आपला निर्णय देतो. शिवाय त्याला, उदाहरणार्थ, बॅटने निर्माण होणारा आवाज आणि ग्लोवमुळे उमटणारा आवाज ह्यांतील फरकही समजत असल्याने काही प्रश्न उद्भवत नाही.



आणि स्क्रीनवरची ग्राफिक्स? तीदेखील हल्ली सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या ‘इमोटिकॉन्स’सारखेच काम करून आपली करमणूक करतात. तीच बाब ‘लाइव्ह ग्राफिकल स्कोअरबोर्ड’ची. इथे मात्र कलात्मकता आणि अचूकता यांचा संगम (आणि तोही एक-दोन सेकंदांत) घडवण्यासाठी तंत्रज्ञांची मोठी टीम काम करीत असते!

लाइव्ह व्हिडीओ - सध्याच्या दिवसांत मोबाइल फोनकडे कोणीच दुर्लक्ष करू शकत नाही. क्रिकेट आणि इतरही खेळांची माहिती देणारी अनेक अ‍ॅप्स मोबाइलवर मिळतात. स्मार्टफोनवर तर सामनाही थेट पाहता येतो.



अशा स्पर्धांच्या काळात इंटरनेटवर जास्तीचे ओझे पडते. जाता जाता चटकन स्कोअर पाहणाऱ्यांची संख्या तर वाढतेच; परंतु सध्या प्रत्येकाच्याच हाती स्मार्टफोन्स दिसू लागल्याने हँडसेटवरून ‘लाइव्ह स्ट्रीमिंग व्हिडीओ’ म्हणजे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्यांची संख्या विलक्षण वाढणार आहे! अर्थात हे ध्यानात घेऊन सरकारने इंटरनेटची क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत. एकंदरीत काय तर कोणताही मोठा इव्हेंट यशस्वी होण्यामागे नवतंत्रज्ञानाचा (आणि त्याचा योग्य वापर करून घेणाऱ्या तंत्रज्ञांचा तसेच प्रशासकांचाही!) फार मोठा वाटा असतो. तंत्रज्ञान पडद्याआडून काम करीत असल्याने आपणास जाणवत तर नाहीच; पण बरेचदा त्याद्वारे पुरवलेल्या सुविधा गृहीत धरल्या जातात. हिमनगाचे टोक पाहून ‘हॅ, यात काय मोठेसे!’ असे मत व्यक्त करण्याआधी त्याचा पाण्यात दडलेला भाग लक्षात घ्यावा, म्हणून हा प्रपंच.

Web Title: role of technology in increasing excitement of cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.