छतावरील पाऊसही जिरवणे गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 06:05 AM2019-05-10T06:05:19+5:302019-05-10T06:07:28+5:30
दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे. याला कारण म्हणजे कमी होत चाललेला पाऊस, मोठ्या प्रमाणात जमिनीतून होणारा पाण्याचा उपसा, वाढता पाण्याचा वापर व पाण्याचा अपव्यय.
- प्रा. डॉ. संदीप ताटेवार
अभियांत्रिकीचे प्राध्यापक
दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे. याला कारण म्हणजे कमी होत चाललेला पाऊस, मोठ्या प्रमाणात जमिनीतून होणारा पाण्याचा उपसा, वाढता पाण्याचा वापर व पाण्याचा अपव्यय. सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात ठिकठिकाणी बोअरवेल खोदल्या जात आहेत. खूप खोलवर जाऊनही पाणी लागताना दिसत नाही. मात्र यामुळे भूगर्भाची चाळण होत आहे. एकीकडे वेगवेगळ्या कारणांमुळे पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
पाणी जर भूगर्भात अखेरपर्यंत पोहोचवायचे असेल, तर त्याकरिता साधारण १०० ते १५० वर्षांचा कालावधी लागतो. जमिनीच्या भूगर्भात साठविलेल्या हजारो वर्षांपूर्वीच्या पाण्याचा आज आपण उपसा करीत आहोत; मात्र त्या प्रमाणात भूगर्भात पाण्याचे पुनर्भरण केले जात नाही. त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्याचे महत्त्व समजून घेतले जात नाही. त्यामुळे भूगर्भातील पाण्याचा स्तर झपाट्याने खालावत आहे. जे उपलब्ध पाणी आहे त्याची मागणी औद्योगिक, सिंचन, घरगुती वापर यासाठी प्रचंड प्रमाणात वाढत आहे.
भारतात शहरांमध्ये साधारण २०० लीटर प्रति दिन प्रति मनुष्य पाण्याचा वापर गृहीत धरला जातो. वाढती लोकसंख्या व प्रति मनुष्य वाढते पाण्याचे प्रमाण हे पाणी संकट अजूनच गंभीर करीत आहे. नदी, तलाव, धरणे यांमधील साठविलेले पाणी उपभोक्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पाण्याला विविध प्रक्रिया पार करीत जावे लागते जसे की पम्पिंग करणे, पाइपलाइनमधून वाहून नेणे, जलशुद्धीकरणाच्या विविध टप्प्यांतून पाणी शुद्ध करणे, निर्जंतुक करणे. नंतर शहराच्या विविध भागांत जलवाहिन्यांद्वारे पोहोचविणे. पाणी उपभोक्त्यापर्यंत पोहोचविताना पाण्याचा योग्य दाब (प्रेशर) व स्राव (डिस्चार्ज) आवश्यक असतो. या सर्व गोष्टी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. पण बरेचदा याचा अंदाज सर्वसाधारण नागरिकाला नसल्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनसामान्यांत जागरूकता नसते. पाणी भरल्यानंतर नळ सुरूच ठेवणे, पाण्याच्या टाक्यातील पाणी वाहत जाणे, पाणी शिळे झाले म्हणून फेकून देणे, कपडे धुण्यासाठी, अंघोळीसाठी, भांडी धुण्यासाठी भरमसाट पाणी वापरणे तसेच नळाच्या तोट्या दुरुस्त न केल्यामुळे पाण्याचा अपव्यय वाढतो.
दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख शहर असलेले केपटाऊन हे जगातील पहिले पाणीविरहित शहर म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या सरकारने १४ एप्रिल २०१९ नंतर पाणीपुरवठा करू शकणार नाही म्हणून असमर्थता दाखवली आहे. ही दु:खद परिस्थिती आपल्याला ओढवून घ्यावयाची नसेल, तर आपण सावध होणे अत्यावश्यक आहे. त्याकरिता घरोघरी रूफ रेन वॉटर हार्वेस्टिंग (छतावरील पाणी अडवून जिरवण्याचे काम) केल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून पाणीटंचाई कमी होऊ शकते.
पावसाळ्यातील घराच्या, इमारतीच्या छतावरील वाहून जाणारे पाणी पाइपद्वारे जमा करून त्याचा पुन्हा वापर करता येऊ शकतो. यालाच रूफ रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात. छतावरील पावसाचे जमा झालेले पाणी पाइपद्वारे फिल्टर टँकमध्ये सोडून, फिल्टर टँकच्या खालून जमा झालेले पाणी पाइपद्वारे उपलब्ध बोअरवेल किंवा विहिरीत सोडणे किंवा साठवण करणे किंवा पावसाचे छतावरील पाणी सरळ शोषखड्डा करून जमिनीत मुरविणे म्हणजे रूफ रेन वॉटर हार्वेस्टिंग होय. यासाठी इमारतीच्या किंवा घरच्या छतावरील पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी जे पाइप इमारतीत आपण बसविलेले असतात ते सर्व पाइप एकमेकांना जोडून त्या सर्व पाइपमधील पाणी एकत्रित जमा करून ते फिल्टर टँकमध्ये सोडायला पाहिजे. घराच्या छतावरील काडीकचरा, धूळ इत्यादीमुळे गढूळ झालेले पावसाचे पाणी बोअरवेल किंवा विहिरीत जाऊ नये यासाठी फिल्टर टँकची आवश्यकता असते. एका मध्यम घरासाठी सर्वसाधारणपणे एक मीटर व्यास व १.५ मीटरचा फिल्टर टँक विटांनी बांधणे जरुरी आहे. याकरिता आपण राहात असलेल्या जागेमध्ये जमिनीत खोल खड्डा खोदून त्यामध्ये चार इंची वीट भिंतीमध्ये फिल्टर टँकचे बांधकाम करून त्यास प्लॅस्टर न करता त्यात साधारण ८० मिमी आकाराचे दगड दीड फूट उंचीपर्यंत भरून त्यावर साधारण ४० मिमी आकाराचे दगड एक फूट उंचीपर्यंत टाकावेत. नंतर त्यावर साधारण २५ मिमी गिट्टी एक फूट उंचीपर्यंत टाकून सर्वांत वर एक फूट जाडीची रेती टाकावी. फिल्टर टँकच्या वर लोखंडी सळईची फ्रेम करून तारांच्या जाळीचे झाकण लावावे. आजकाल तयार (रेडिमेड) कृत्रिम फिल्टर टँकसुद्धा बाजारात उपलब्ध आहेत.
रूफ रेन वॉटर हार्वेस्टिंगचा खर्च साधारणपणे एका घराला अंदाजे ५ ते १० हजारांपर्यंत येऊ शकतो. पावसाळ्यात जर एक हजार मिलीमीटर पाऊस पडला, तर एक हजार चौरस फुटांच्या स्लॅबवरील जवळपास एक ते दीड लाख लीटर पाणी आपल्याला यातून उपलब्ध होते. यामुळेच प्रत्येक महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या इमारतींत रूफ रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ‘जल है तो कल है’ या उक्तीप्रमाणे पाण्याचे महत्त्व जाणून पावसाळ्यापूर्वी घरोघरी रूफ रेन हार्वेस्टिंग करणे अत्यावश्यक आहे. यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे, ही काळाची गरज आहे.