मार्ग खडतर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2016 04:14 AM2016-05-26T04:14:09+5:302016-05-26T04:14:09+5:30
‘सबके लिए आनंद लाएंगे सर्वानंद!’ आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या शपथविधी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चारलेले हे वाक्य कितीही श्रवणीय
‘सबके लिए आनंद लाएंगे सर्वानंद!’ आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या शपथविधी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चारलेले हे वाक्य कितीही श्रवणीय असले तरी, सगळ्यांसाठी आनंद आणणे, सर्वानंद सोनोवाल यांच्यासाठी सोपे नाही. प्रचाराची राळ उठवत निवडणुकीत विजय संपादन करणे जेवढे सोपे, तेवढेच प्रचारादरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करणे कठीण, याचा प्रत्यय नरेंद्र मोदींना दोन वर्षात आला आहे. मोदींच्या तुलनेत सोनोवाल यांचे मैदान खूप छोटे असले तरी, त्यांच्या समोरची आव्हाने मोदींच्या तुलनेत अजिबात छोटी नाहीत. आसाममध्ये भारतीय जनता पक्षाची वाढ आणि सत्ता संपादनामध्ये सर्वात प्रमुख भूमिका कोणत्या मुद्याने निभावली असेल, तर ती बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्याने! सत्ता मिळाल्यास दोन वर्षात बांगलादेशी घुसखोरांना परत धाडण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीदरम्यान दिले होते. मोदी सरकारची दोन वर्षे पूर्ण झाली; पण घुसखोर आहेत तिथेच आहेत. बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याच्या आव्हानाशिवाय सोनोवाल यांच्या समोर मोठे आव्हान असेल, ते स्वपक्षीय हेमंत बिश्वास सर्मा यांना शांत ठेवण्याचे! सोनोवाल आणि सर्मा हे दोघेही भाजपामध्ये उपरेच!! मुख्यमंत्री पद ही दोघांचीही महत्त्वाकांक्षा होती. त्यामध्ये सोनोवाल यांनी बाजी मारली खरी; पण त्यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून सहभागी झालेले सर्मा त्यांना सहयोग करतात, की अडचणी निर्माण करतात, यावरच सोनोवाल यांची पुढील वाटचाल निर्भर असणार आहे. सर्मा यांच्याशिवाय, भाजपाचे मित्र पक्ष असलेल्या आसाम गण संग्राम परिषद, बोडोलँड पीपल्स फ्रंट व इतर तीन पक्षांची मर्जी राखणे हेदेखील सोनोवाल यांच्या समोरचे मोठे आव्हान असेल. सध्याच्या घडीला सोनोवाल मंत्रिमंडळात भाजपाचे दहा, आसाम गण संग्राम परिषदेचे तीन, बोडोलँड पीपल्स फ्रंटचे दोन आणि गण शक्ती पक्षाचा एक मंत्री असेल, असे निश्चित झाले आहे; पण मित्र पक्षांद्वारा सत्तेत आणखी मोठ्या वाट्याची मागणी होण्याची शक्यता आहे आणि ती सोनोवाल यांची मोठी डोकेदुखी ठरू शकते. ही सगळी डोकेदुखी सांभाळून, आसामच्या जनतेला ‘अच्छे दिन’ दाखविण्याचे आव्हान सोनोवाल यांना पेलावे लागणार आहे. थोडक्यात, स्पष्ट बहुमत पाठीशी असले तरी सोनोवाल यांंंचा मार्ग खडतरच म्हणावा लागेल!