तालिबान्यांच्या बंदुकीला आव्हान देणारी रोया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2024 08:06 AM2024-03-15T08:06:44+5:302024-03-15T08:07:09+5:30
यातून कसं बाहेर पडावं, हा फार मोठा प्रश्न अफगाणी महिलांसमोर पडला आहे.
अफगाणिस्तानात महिला आणि महिलांच्या शिक्षणाची स्थिती किती भयानक आहे हे प्रत्यक्ष तिथे गेल्याशिवाय आणि तिथे वास्तव्य केल्याशिवाय कळू शकत नाही. तालिबानच्या काळात तर त्यात चढत्या श्रेणीने वाढच होत गेली. यातून कसं बाहेर पडावं, हा फार मोठा प्रश्न अफगाणी महिलांसमोर पडला आहे.
तालिबाननं २०२१मध्ये अफगाणिस्तानवर पुन्हा कब्जा मिळवला आणि महिलांची स्थिती आणखीच दु:सह झाली. शिक्षण तर जाऊ द्या; पण त्यांना घराबाहेर पडणंही मुश्कील झालं. २४ तास बुरख्याच्या आड घरामध्ये बंदिस्त! अनेक महिला आणि मुलींना शिक्षणाची आस आहे. पण, शिक्षण घेतलं किंवा शिक्षण दिलं तरीही मृत्यूची टांगती तलवार मात्र डोक्यावर ! अशा स्थितीतही अनेकींनी आपले प्रयत्न सोडलेले नाहीत. त्यातलंच एक महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे रोया अजिमी. सध्या तिचं वय ३३ वर्षे आहे.
२४ तास आणि चारही बाजूंनी तालिबानचा पहारा असतानाही अफगाणमधील लहान मुलींना शिकवण्याचं काम ती करते आहे. हे करत असताना अनेकदा तिच्या प्राणावर बेतलं, तालिबानी बंडखोरांच्या हातात सापडता सापडता ती वाचली. पण, तरीही तिचं काम गुप्तपणे सुरूच आहे. जिथे कुठे जागा मिळेल आणि जिथे कुठे मुली असतील तिथे जाऊन शिकवण्याचं काम ती करते. एकदा तर तालिबानी अतिरेक्यांनी तिच्या शाळेत घुसण्याचाही प्रयत्न केला. पण, आजूबाजूच्या लोकांनीच तालिबान्यांना अडवलं. ‘इथे असं काहीच चालत नाही. इथे मुलींना फक्त शिलाई मशीन चालवणं शिकवलं जातं’, असं सांगून वेळ मारून नेण्यात आली. तेवढ्या वेळात मुली आणि रोयाही तिथून गायब झाली म्हणून सारे वाचले.
त्यानंतर मात्र रोयाला तिथली शाळा बंद करावी लागली. पण, शाळा बंद करून आणि मुलींचं शिकवणं बंद करून, त्यांचं नुकसान होऊन कसं चालेल, म्हणून तिनं पुन्हा दुसऱ्या ठिकाणी शाळा सुरू केली. जेव्हा केव्हा तालिबान्यांची नजर तिकडे जाईल त्यावेळी तिला काही काळापुरती का होईना, शाळा बंद करावी लागते. मात्र, आजही चोरीछुपे आणि गुप्तपणे मुलींना शिकवण्याचं काम ती करतेच आहे.
रोया म्हणते, माझं हे काम किती काळ चालेल आणि मी कधी तुरुंगात डांबली जाईन, कधी मला मारलं जाईल, हे मला काहीच माहीत नाही. पण, माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत तालिबान्यांच्या नाकावर टिच्चून शिक्षणाचं काम मी सुरूच ठेवणार आहे.
रोया स्वतः उच्चशिक्षित आहे. पण, त्यासाठी तिला स्वतःलाही खूप मोठा संघर्ष करावा लागला. सगळ्यात पहिला विरोध तिला घरातूनच झाला. सर्वांत आधी तिच्या काकांनीच नकाराची घंटा वाजवली. मुलींनी चूल आणि मूल एवढंच करावं, घर सांभाळावं, असं त्यांचं मत होतं. रोयाच्या आईनं आणि रोयानं स्वत: काकांची मनधरणी केल्यानंतर मोठ्या मुश्किलीनं तिला शिक्षणाची परवानगी मिळाली. पण, त्यातही एक मुख्य अट होती, ती म्हणजे तिनं कायम बुरख्यातच राहायला हवं! ज्या दिवशी ती बुरखा काढेल त्या दिवशी तिचं शिक्षण बंद होईल. रोयाला ही अट मान्य करावी लागली. कारण शिक्षण हे तिचं प्रमुख ध्येय होतं. फारसी साहित्याचा तिचा चांगला अभ्यास आहे. आपल्या या शिक्षणाचा मुलींना उपयोग व्हावा, बुरख्याआड चार भिंतीतच त्यांचं बालपण आणि तारुण्य बंदिस्त होऊ नये, यासाठी जीव धोक्यात घालून मुलींना शिकवण्याचं व्रत तिनं कायम ठेवलं आहे.
सन २०२१मध्ये पुन्हा सत्तेवर आल्यानंतर तालिबाननं सांगितलं होतं, आता कठोर इस्लामी शासनाचे नियम शिथिल करण्यात येतील, महिलांना शिकू देण्यात येईल; पण असं काहीही घडलं नाही. महिलांवरची बंधनं आणखीच कडक झाली. काही दिवसातच महिलांच्या शिक्षणावर बंदी आली. पुरुषांशिवाय एकट्यानं प्रवास करण्यास त्यांना मनाई करण्यात आली. त्यांच्या नोकऱ्यांवर बंदी आली. त्या फक्त सार्वजनिक उद्यानात, तेदेखील पुरुष सोबत असले तरच जाऊ शकत होत्या. कोणतीही महिला बुरख्याविना सार्वजनिक ठिकाणी दिसली की, लगेच तिला चाबकानं फोडून काढण्यात येऊ लागलं आणि तिची रवानगी तुरुंगात होऊ लागली. या साऱ्याला महिला कंटाळल्या आहेत. रोयासारख्या तरुणींच्या माध्यमातून बंडाची आग त्यांच्यात धुमसते आहे.
आम्हाला अक्कल शिकवू नका!
गेल्या वर्षी, जानेवारी २०२३मध्ये इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनचं (ओआयसी) शिष्टमंडळ काबूलला पोहोचलं होतं. महिलांचं शिक्षण पुन्हा सुरू करावं, यासाठी या संघटनेनंही तालिबानवर दबाव आणला. पण, आम्हाला कोणीही अक्कल शिकवू नका, महिलांचं भलं कशात आहे, हे आम्हाला चांगलं कळतं म्हणून तालिबानने त्यांनाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या.