भर पावसात किल्ल्यांवर गर्दी करताय? लोकहो, सावध व्हा ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 11:27 AM2023-07-12T11:27:33+5:302023-07-12T11:28:00+5:30

पावसाळ्यात अनेक जण किल्ले, डोंगरांवर गर्दी करतात; पण पर्यटन आणि ट्रेकिंग तसेच टुरिस्ट आणि ट्रेकर यातला फरक लक्षात घेतला नाही तर जिवावर बेतू शकते

Rushing to the forts in the pouring rain? People, be careful! | भर पावसात किल्ल्यांवर गर्दी करताय? लोकहो, सावध व्हा ! 

भर पावसात किल्ल्यांवर गर्दी करताय? लोकहो, सावध व्हा ! 

googlenewsNext

पावसाळा आणि पर्यटन हे एक समीकरण आहे. वीकेंडला पर्यटक एखाद्या धबधब्यावर किंवा ट्रेकिंगला जातात. हल्ली तर पावसाळ्यात ट्रेकिंगला अक्षरशः ऊत येतो. शहरात किंवा रिसॉर्टवर होणारी गर्दी टाळण्यासाठी सुटीच्या दिवशी आता किल्ल्यांवर गर्दी होऊ लागली आहे. लोहगडावर अलीकडेच हजारो पर्यटक चार तास अडकून पडले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. कळसुबाईवरदेखील ट्रैकिंग करणाऱ्यांची गर्दी दिसून आली. गडकिल्ल्यांवर येण्याचे आकर्षण वाढते ही बाब सकारात्मक आहे; पण त्याचा अतिरेक होत असल्याने मोठी दुर्घटनाही घडू शकते.

ट्रेकर्सचे प्रमाण वाढले ही सकारात्मक गोष्ट आहे; पण पर्यटन आणि ट्रैकिंग तसेच टुरिस्ट आणि ट्रेकर यांच्यातला फरक आता लोक विसरत चालले आहेत. पूर्वी ट्रैकिंग संस्थात्मक पद्धतीचे होते; आता त्याचा इव्हेंट व्हायला लागला आहे. ट्रेकिंगकडे लोक व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहू लागले आहेत. ट्रेक आयोजित करून त्यातून पैसे कमावणे यात गैर काहीच नाही; पण असे ट्रेक घेऊन जाणाऱ्या संस्थांनी आपली जबाबदारीही ओळखली पाहिजे.

हरिहर, लोहगड, विसापूर, कळसूबाई अशा ट्रेकची सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी झाली आहे. त्यामुळे तिथे अनेक पर्यटक जातात; पण प्रत्येक किल्ल्याची एक मर्यादा असते. ती आपणच पाळायला हवी. लोहगडावरच्या गर्दीचा व्हिडीओ आपण पाहिला. तिथे ५ हजारांहून अधिक लोक गेले होते; पण त्या गडाची तितकी क्षमता नाही हे आपण लक्षात घ्यायला हवे. ट्रेक ग्रुप्सने जर बेजबाबदारपणे जास्तीत जास्त पर्यटक जर तिथे नेले तर एखाद्या दिवशी लोकल ट्रेनसारख्या चेंगराचेंगरीची घटनाही घडू शकते. वैयक्तिक ट्रेकर्सना आपण रोखू शकत नाही; पण संस्थात्मक ट्रेकिंग करणाऱ्यांनी मात्र स्वतःसाठी काही नियम आवर्जून घालून घेतले पाहिजेत. महाराष्ट्रात ३५० हून अधिक किल्ले आहेत. आपल्याकडे सह्याद्रीमध्ये अनेक चांगल्या जागा आहेत. ट्रेकिंग तुम्हाला घडवत असते. त्यातून बरेच काही शिकता येते, पण ट्रेकिंग कशासाठी करायचे हेच अनेकांना माहीत नसते.

पावसाळ्यात हौशी ट्रेकर्सने किल्ल्यांवर जाऊ नये. कारण पावसाळ्यात किल्ल्यांचे बरेचसे अवशेष हिरवळीमुळे झाकले गेलेले असतात. वाटा निसरड्या झालेल्या असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. किल्ल्यांचे महत्त्व काय, तेथे पाहण्यासारख्या बाबी काय, तिथे जाऊन काय पाहिले पाहिजे, याची अनेकांना कल्पनाच नसते. कोणी तरी सांगितले किंवा इतर जण जाताहेत त्यामुळे आपणही जा, असे म्हणत अशा ठिकाणी नुसतीच गर्दी होते. आपण जेव्हा ट्रेकिंगला जातो तेव्हा ज्यांच्यासोबत आपण जातोय त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विचारले पाहिजे की, तुमच्या संस्थेकडे सुरक्षेची काय साधने आहेत. आपत्कालीन स्थितीत काही संपर्क आहे का? तुम्ही रोप वापरणार आहात का? पण साधारणपणे लोक विचारतात की ट्रेकमध्ये जेवायला काय आहे? गाडीत एसी आहे का? डीजे आहे का?...

ट्रेकिंगला वाढणारी गर्दी पाहता ज्याप्रमाणे जंगल सफारीसाठी त्या त्या दिवसासाठी पर्यटकांची संख्या मर्यादित केलेली असते, तसेच गड-किल्ल्यांच्या बाबतीत करायला हवे. सर्वच गडकिल्ल्यांवर हे शक्य नाही; पण अंधरबनमध्ये ट्रेकिंग जेव्हा बंद करण्यात आले होते,  त्यावेळी तेथील गावकऱ्यांनी पुढाकार घेत नियमन करून ट्रेकिंग सुरू ठेवण्याची सूचना केली होती. स्वयंशिस्त आणि स्वयंनियमनातून अनेक चांगल्या गोष्टी होऊ शकतात. वैयक्तिक स्तरावर आपण किती सक्षम आहोत है आपण ओळखले पाहिजे, दुसऱ्याच्या भरवशावर ट्रेक करू नये. ट्रेकला किंवा इतर कुठेही जाताना आपण ज्यासाठी तयार आहोत तितकंच 'साहस' केले पाहिजे किंवा या गोष्टी टाळल्याच पाहिजेत. प्रत्येक गोष्टीवर सरकारचे नियंत्रण असू शकत नाही. अपघात घडण्यापेक्षा स्वयंशिस्त केव्हाही महत्त्वाची..

दिवाकर साटम, बाण हायकर्स

(शब्दांकन : विराज भागवत प्रतिनिधी, लोकमत डॉट कॉम)

Web Title: Rushing to the forts in the pouring rain? People, be careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.