Russia: रशियात समलिंगी व्यक्तींभोवतीचा फास घट्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 05:39 AM2023-02-01T05:39:43+5:302023-02-01T05:41:14+5:30
Russia: LGBTQ समुदायाबद्दल जगभर वेगवेगळी मतं आहेत. काही देशांमध्ये या समुदायाला कायदेशीर मान्यता आहे, काही देशांमध्ये समलैंगिकतेचा उच्चार करणंदेखील गुन्हा आहे, तर काही देशांमध्ये या समूहाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठीची लढाई सुरू आहे.
LGBTQ समुदायाबद्दल जगभर वेगवेगळी मतं आहेत. काही देशांमध्ये या समुदायाला कायदेशीर मान्यता आहे, काही देशांमध्ये समलैंगिकतेचा उच्चार करणंदेखील गुन्हा आहे, तर काही देशांमध्ये या समूहाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठीची लढाई सुरू आहे. मात्र, ही कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी लोकांनी प्रयत्नच करू नयेत यासाठी रशियाने नुकताच एक नवीन कायदा केला आहे. त्यामुळे तेथे आता समलिंगी संबंध ठेवणं तर गुन्हा आहेच, पण लोकांनी समलिंगी संबंधांना मान्यता द्यावी यासाठी प्रयत्न करणं हाही गुन्हा आहे असं ठरविणारा कायदा रशियाने नुकताच पास केला आहे.
आजही अनेक लोकांना LGBTQ म्हणजे काय ते माहिती नाही. समलैंगिकता नैसर्गिक असते असं म्हणणाऱ्यांचा एक मोठा गट जगभरात आहे. त्याच वेळी समलैंगिकता ही एक-एक विकृती आहे असं मानणारेही जगात कमी नाहीत. आजही अनेक देशांमध्ये समलिंगी नात्यांना मान्यता दिली जात नाही. दोन पुरुष किंवा दोन स्त्रिया एकमेकांशी लग्न करू शकतात हे अजूनही अनेक देशांमध्ये मान्य नाही.
या समुदायामध्ये लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीअर, आदींचा समावेश होतो. या समाजगटाची कोंडी अनेक पातळ्यांवर होत असते. एकीकडे त्यांच्यातील नात्यांना कायदेशीर मान्यता नसते, तर दुसरीकडे सामाजिकदृष्ट्याही त्यांच्याकडे अतिशय वाईट दृष्टीने बघितलं जातं. त्याचा परिणाम म्हणून अनेक समलिंगी व्यक्ती आयुष्यभर मनात कुढत राहतात. त्यांना त्यांचं नैसर्गिक आयुष्य जगता येत नाही. अनेकजण त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न करतात आणि ते आयुष्यभर निभावत राहतात. यातूनच अनेकजण विविध प्रकारच्या मानसिक रोगांचे शिकार होतात.
समलिंगी व्यक्तींना हे सगळं सहन करायला लागू नये यासाठी जगात अनेक देशांमध्ये सपोर्ट ग्रुप्स काम करीत असतात. ते समलिंगी व्यक्तींना स्वतःशी स्वतःची लैंगिकता मान्य करायला मदत करतात. समाजात वावरताना त्यांना आत्मविश्वास वाटावा यासाठी साथ देतात. कायद्याने समलैंगिकतेला मान्यता द्यावी यासाठी जगभर चळवळ चालविली जाते. लोकांमध्ये जनजागृती केली जाते. समलिंगी लोकांची बाजू इतर व्यक्तींना समजावून सांगण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, आता रशियामध्ये अशी कुठलीही चळवळ चालवता येणार नाही. कारण रशियाने नुकत्याच मंजूर केलेल्या नवीन कायद्यानुसार समलैंगिकतेबद्दल, अपारंपरिक स्वरूपाच्या लैंगिक संबंधांबद्दल जनजागृती करणंदेखील गुन्हा आहे. हा कायदा रशियाने २०१३ मध्ये मंजूर केलेल्या कायद्याचं पुढचं पाऊल आहे असं समजलं जातं आहे. रशियाने २०१३ मध्ये एक कायदा करून अज्ञान व्यक्तींमध्ये अपारंपरिक लैंगिक संबंधांबद्दल माहिती देणं हा गुन्हा आहे असं जाहीर केलं होतं. समलिंगी हक्कांसाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करून तुरुंगात डांबून ठेवण्यासाठी या कायद्याचा अतिशय क्रूर पद्धतीने वापर केला होता.
एकीकडे रशियाने युक्रेनशी पुकारलेल्या युद्धाला जवळ्जवळ एक वर्ष झालं आहे, तरीही रशिया हे युद्ध जिंकू शकलेला नाही. सतत सुरू असलेल्या युद्धामुळे रशियातील सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे. पुतीन सरकारबद्दल असंतोष वाढत चालला आहे. अशा वेळी रशियन सरकारने लोकांच्या भावना चुचकारण्यासाठी पारंपरिक मूल्यांना पाठिंबा देण्याचं धोरण स्वीकारलं आहे. पश्चिमेकडचं जग हे उघडउघड ‘सैतानाच्या’ मार्गावर चालत आहे अशी मांडणी रशियन सरकार करीत आहे. म्हणूनच पश्चिमेकडील देशांना, त्यांच्या मूल्यांना विरोध केला पाहिजे अशी भूमिका रशियाने घेतली आहे. समलैंगिकतेबद्दल बोलणं गुन्हा ठरविणारा कायदा हा त्याच भूमिकेचा एक भाग आहे. सर्वसामान्य लोकांना पारंपरिक जीवनपद्धती शक्यतो बदलायची नसते. अशा वेळी आम्ही पारंपरिक जीवनमूल्यांना प्रतिष्ठा देतो, ती जपण्यासाठी प्रयत्न करतो असं दाखविल्यास लोकांमध्ये सरकारबद्दल सकारात्मक भावना निर्माण होतील, अशी रशियन सरकारला आशा आहे. मात्र, हे करतान कित्येक समलिंगी व्यक्तींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तरी रशियन सरकारला चालणार आहे.
खबरदार, जर कायदा मोडाल तर..
रशियातील या नवीन कायद्यानुसार अपारंपरिक लैंगिक संबंधांचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तीला चार लाख रुबल्स म्हणजे सुमारे चार लाख शंभर रुपये इतका दंड होऊ शकतो. हाच गुन्हा करणाऱ्या संघटनेला पन्नास लाख रुबल्स म्हणजेच अठ्ठावन्न लाख त्रेचाळीस हजार रुपये इतका दंड होऊ शकतो. एखाद्या परदेशी व्यक्तीने जर रशियामध्ये हा गुन्हा केला तर त्या व्यक्तीला १५ दिवसांचा तुरुंगवास होऊन त्या व्यक्तीला परत त्याच्या मायदेशी पाठवून दिलं जाईल अशी तरतूद करण्यात आली आहे.