सचिन ‘भारतरत्न’ झाला, काँग्रेसला मते मिळाली? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 06:57 AM2021-12-20T06:57:09+5:302021-12-20T06:58:35+5:30

भारताच्या अमूल्य सांस्कृतिक वारशाचा गंध दरवळणाऱ्या बनारसचे नवे रूप हा या देशाचा सन्मान आहे, केवळ मतांची बेगमी नव्हे!

sachin tendulkar became Bharat Ratna congress got votes | सचिन ‘भारतरत्न’ झाला, काँग्रेसला मते मिळाली? 

सचिन ‘भारतरत्न’ झाला, काँग्रेसला मते मिळाली? 

Next

विजय दर्डा

गतसप्ताहात पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे लोकार्पण करत होते तेव्हा माझ्या डोळ्यासमोर बनारसच्या गल्ल्या आल्या. झुळझुळ वाहणारी निर्मल गंगा आणि बाबा विश्वनाथाच्या दरबारात सकाळी होणाऱ्या रुद्राभिषेकाचे अद्भुत दृश्य नजरेसमोर उभे राहिले. गेल्याच महिन्यात मी राजभाषा संमेलनात सहभागी होण्यासाठी बनारसला गेलो होतो. गंगा आरतीचे ते नयनमनोहर दृश्य आजही मनात ताजे आहे. एका संपूर्ण संध्याकाळी मी गंगेच्या कुशीत नौकाविहार केला, बनारसच्या चटकदार चाटचा आस्वाद घेतला. धुक्यात लपेटलेल्या पहाटे भोलेनाथावर होणारा अभिषेक पाहायला हजर होतो. पहाटेच्या ओल्या दवात भिजलेल्या भक्तीच्या ओघाचा तो अनुभव केवळ अद्भुत असाच होता! यावेळी मला दिसलेल्या बनारस या शहराने माझ्यावर घातलेल्या मोहिनीचे वर्णन करायला शब्दच नाहीत. 

बनारसला मी या आधीही अनेकदा गेलो आहे; पण यावेळी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरमुळे यात्रा अधिक सुखद झाली, हे नक्की! एके काळी चालायचा प्रयत्न करणारी माणसे शेजारच्या माणसांना धडका देत अशा अरुंद गल्ल्या येथे होत्या. आता तर मिरवणूक जाईल इतका रस्ता रुंद झाला आहे. काशी विश्वनाथाचे मंदिर अतिक्रमणांपासून मुक्त होईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. बनारसचे घाट पहिल्यांदाच मला  इतके सुसज्ज दिसले. बनारस या शहराने जणू नवे रूपच धारण केले असावे, इतके बदल मी पाहिले. या प्रवासाच्या  मधुर आठवणी घेऊन बनारसहून परत आलो.

माझ्या या प्रवासानंतर लगेचच झालेल्या कॉरिडॉरच्या लोकार्पण समारंभामुळे त्या आठवणी ताज्या झाल्या. काशी हे केवळ शब्दांनी सांगता येऊ शकेल,  असे प्रकरण नाही, तो संवेदनेचा विषय आहे; या पंतप्रधानांच्या विधानाशी मी पूर्ण सहमत आहे. काशीमध्ये जागृतीच जीवन आणि मृत्यूही मंगल आहे. काशीत प्रवेश करणारा सर्व बंधनातून मुक्त होतो ही पुराणोक्ती तरी वेगळे काय सांगते?  काशी विश्वेश्वराचा आशीर्वाद आणि एक अलौकिक ऊर्जा येथे येताच आपला अंतरात्मा जागृत करते. हे शहर नाही... एक पूर्ण स्थायीभाव आहे. भारताच्या अमूल्य सांस्कृतिक वारशाचा गंध इथल्या वातावरणात दरवळत असतो.

स्वाभाविकपणे बहुतेक लोक बनारसकडे धार्मिक चष्म्यातून पाहतात. ते उचितच म्हटले पाहिजे  कारण बनारसच्या कणाकणात आस्था भरलेली आहे. मी मात्र या शहराकडे धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन त्याभोवती गुंफलेली आध्यात्मिकता, पौराणिकता आणि सांस्कृतिक वारसा म्हणून पाहतो. बनारसचा विषय निघाला की मला कबीरांची वाणी आठवते, बिस्मिल्ला खान यांची सनई कानात घुमू लागते, पंडित छन्नुलाल मिश्रांचे स्वर झंकारतात... बनारस हिंदू विद्यापीठाच्या वैचारिक प्रभेने माझी दृष्टी विस्तारते. सुप्रसिद्ध कादंबरीकार काशिनाथ सिंह यांच्या ‘काशी का अस्सी’मधली पात्रे मनात दंगा करू लागतात. 
बनारस हे नगर बाबा भोलेनाथांच्या त्रिशुलावर वसले आहे म्हणतात. अर्थात, हा झाला श्रद्धेचा मामला; पण उत्तर भारताचे पालनपोषण करणारी गंगा तर आपल्यासमोर वाहते. या प्राचीन शहरातून जाताना ती आपला प्रवाह बदलते हे भौगोलिक चमत्कारापेक्षा कमी आहे काय? या शहरात वेगळी काही तरी जादू नक्की आहे; ज्यामुळे त्याचे रंग, गंध आणि भावही निराळे आहेत. भोलेनाथ नावाच्या भोळ्या सांबाचे हे शहर; पण  नृत्य, संगीत ज्ञान आणि विज्ञानाने भारलेले! अशा काशी विश्वनाथ धामाला अतिक्रमणमुक्त करून कॉरिडॉर निर्मिती झाली असेल तर तो सनातन संस्कृतीचा सन्मान, भारताची प्राचीनता आणि परंपरेबद्दलचा आदरभावच म्हटला पाहिजे.

काही लोक म्हणतात, उत्तर प्रदेशातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदूंची मते मिळवण्यासाठी या कॉरिडॉरच्या पहिल्या चरणाचा शुभारंभ करण्यात आला. हे शक्य असेल असे मानले तरी या देशातला मतदार जागा असतो हे विसरता येणार नाही. तो समजून उमजून मतदान करतो. 

एक जुनी आठवण : सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिले गेले तेव्हाही असे म्हटले गेले की तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा हेतू त्यामागे आहे; पण त्यानंतरच्या निवडणुकीत तरुणांनी काँग्रेस पक्षाला मते दिली का? थोडक्यात, असे काही करून या देशात मतदार खेचता येत नाहीत. त्याबाबतीत मतदारांवर विश्वास ठेवायला हवा. कॉरिडॉर ही काळाची गरज होती. त्याकडे पर्यटन आणि शहर विकासाच्या नजरेतून पाहावे. बनारसच्या विकासाने केवळ हिंदूंचा नव्हे तर सर्व धर्म आणि श्रद्धांच्या लोकांचा विकास होईल. त्यांना रोजगार मिळेल. पानाफुलांपासून पूजासामग्रीचा व्यापार, गंगेतील नाव चालवणे, हे सारेच विविध जाती-धर्मांचे लोक करत असतात. बनारसमधल्या समरस समाजाचा परिचय असलेल्यांना हे वेगळे सांगायला नको. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये भले हिंदू शब्द असेल; पण तिथे इतर धर्मीय शिकतातच. 

हिंदुस्थानचे हेच तर वैशिष्ट्य आहे. हा देश धर्माच्या आधारावर नव्हे तर  घटनेवर चालतो. सर्वधर्म समभाव आपल्या रक्तात आहे. गतसप्ताहात आपल्या सर्वांच्या प्रिय ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीने  ५० वर्षे पूर्ण केली तेव्हा मी मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च, बौद्ध आराधना स्थळ, जैन मंदिर अशा सगळीकडे जाऊन नमस्कार केला. कारण ‘लोकमत’चे पितृपुरुष स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांनी आम्हाला सर्व धर्मांबद्दल आदर बाळगायला शिकवले. आज लोकमत परिवार हा एखाद्या गुच्छासारखा असून येथे सर्व धर्मांचे लोक पत्रकारितेचे पवित्र लक्ष्य समोर ठेवून काम करतात. म्हणून मी नेहमी म्हणतो; दृष्टी महत्त्वाची आहे... लक्ष्य महत्त्वाचे आहे... एकता महत्त्वाची आहे... आपण एक असू तर दुनियेतली कोणतीही ताकद आपल्याला वाकवू शकत नाही!
 

Web Title: sachin tendulkar became Bharat Ratna congress got votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.