व्यसनमुक्त समाज निर्मितीच्या रक्षेचा पवित्र धागा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 08:33 PM2018-08-26T20:33:11+5:302018-08-26T20:34:11+5:30
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, असे आपण कायमच म्हणतो.
- महेश सरनाईक
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, असे आपण कायमच म्हणतो. ज्या समाजात आपण जन्म घेतो त्या समाजाच्या हितासाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी आणि सुदृढ समाज निर्मितीसाठी काही माणसे ध्येयवेडी होऊन अहोरात्र मेहनत घेत असतात. समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून अशा व्यक्ती काळ, वेळ, पैसा, संपत्ती, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, जात-पंथ यांचा विचार न करता केवळ आणि केवळ समाजसेवेचे व्रत अंगिकारून काम करीत असतात. मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे येथील श्रावणी सतीश मदभावे ह्या भावी पिढी व्यसनापासून दूर रहावी म्हणून झटत आहेत. त्यासाठी त्यांनी रक्षणाची अभिलाषा करणारा आणि रक्षणाचे अभिवचन देणारा रक्षाबंधनाचा दिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजाचे काही प्रमाणात ऋण फेडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेली सात वर्षे भावा-बहिणीतील अतूट नात्याचा गोडवा असणा-या रक्षाबंधनासारख्या पवित्र सणाचा वापर त्या व्यसनमुक्तीसारख्या अभिनव उपक्रमाकरिता करीत आहेत. समाजाच्या रक्षणाची जबाबदारी असणा-या घटकांना व्यसनमुक्तीसाठीचा पवित्र धागा बांधून त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीवही करून दिली जात आहे.
देशाच्या तरूण पिढीची ऊर्जा महत्त्वाच्या कामासाठी न वापरता विनाकारण वाया जात असल्याचे अलीकडील काही वर्षांत दिसून आले आहे. त्यातही तंबाखू, गुटखा व सिगारेट अशा अनेक तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामध्ये गुरफटत जात असल्याने अख्खी युवापिढी बरबाद होत आहे. त्यामुळे कुटुंबाची मोठ्या प्रमाणात सामाजिक, आर्थिक हानी होते. हे सर्व चित्र पाहता तंबाखू मुक्तीसाठी काम करण्याचे निश्चित केलेल्या ‘तंबाखू प्रतिबंध अभियान, तळेरे’ या सेवाभावी केंद्रातर्फे सामाजिक परिवर्तनासाठी रक्षाबंधनाच्या माध्यमातून गेली सात वर्षे राबवित असलेल्या अभिनव उपक्रमाचे कौतुकच केले पाहिजे. अमेरिका येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व सिंधुदुर्गचे सुपुत्र डॉ. अनिल नेरूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यातून हा उपक्रम वर्षानुवर्षे व्यसनमुक्तीचा ध्यास घेतल्यागत यशस्वीतेच्या शिखरावर पोहोचला आहे.
भावाने बहिणीचे रक्षण करावे या उद्देशाने रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधली जाते. याच रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून तंबाखूच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला त्यातून सोडवून समाज बांधवांचे रक्षण करावे हा दूरगामी उद्देश उराशी बाळगून ‘तंबाखू प्रतिबंध अभियान, तळेरे’ या सेवाभावी केंद्राच्यावतीने रक्षाबंधनाचा नावीन्यपूर्ण कार्यक्रम सर्वप्रथम २०१२ साली कुडाळ पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आला. तंबाखू व्यसनमुक्तीचा संदेश देणारी एक प्रतीकात्मक राखी यावेळी भेट देण्यात आली. तसेच येथील सर्व कर्मचाºयांना राखी बांधून सिंधुदुर्ग जिल्हा कॅन्सरमुक्त करण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच तंबाखू प्रतिबंध अभियानामध्ये समाजातील सर्व घटकांनी सामील व्हावे याकरिता दरवर्षी अशाप्रकारचे रक्षाबंधन जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात येत आहे.
त्यानंतर २०१३ साली वैभववाडी तहसील कार्यालय, वैभववाडी पोलीस ठाणे व जिल्हा रुग्णालय ओरोस येथे या कार्यालयातील सर्व कर्मचाºयांसमवेत, २०१४ साली तळेरे येथे परिसरातील शिक्षक, पालक व पत्रकार, २०१५ साली कणकवली पोलीस ठाणे, २०१६ साली कणकवली रेल्वे स्टेशन, २०१७ साली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा गं्रथालय अधिकारी श्रेया गोखले तर यावर्षी म्हणजे २०१८ साली जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा मुख्यालयातील पत्रकार यांच्यासमवेत अनोखे रक्षाबंधन करण्यात आले.
तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे या सेवाभावी केंद्राच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून भावी पिढी व्यसनापासून दूर रहावी हा दूरगामी उद्देश उराशी बाळगून श्रावणी मदभावे आपल्या सहकाºयांसोबत गेली ७ वर्षे कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा तंबाखूमुक्त आणि कॅन्सरमुक्त व्हावा या डॉ. अनिल नेरूरकर यांच्या ध्येयाने प्रेरित होऊन ही संस्था कार्यरत आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालये तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांच्या माध्यमातून शिक्षक, विद्यार्थी, संस्थाचालक व पालक यांच्या सहयोगाने सात वर्षांत ६५ हजारांहून अधिक व्यक्तींना व्यसनमुक्तीबाबत प्रबोधन केले आहे.
तंबाखू सेवनामुळे होणारी सामाजिक, आर्थिक आणि शारिरीक हानी टाळण्यासाठी यावर प्रतिबंधात्मक समुपदेशन व प्रबोधन होण्याची नितांत आवश्यकता आहे. याचीच बांधिलकी जोपासत तंबाखू प्रतिबंध अभियानातून २०१२ पासून दरवर्षी पर्यावरण दिन, रक्षाबंधन, नवरात्रोत्सव, बालदिन, नववर्षाभिनंदन, हळदीकुंकू समारंभ, जागतिक कर्करोग विरोधी दिन, महिला दिन, जागतिक तंबाखू विरोधी दिन यासारख्या विविध दिवसांचे व सणांचे औचित्य साधून जनजागृतीच्या पथावर चालत विविध व्यक्ती, संस्थांच्या माध्यमातून आगळ्या-वेगळ्या स्वरूपात समाजामध्ये व्यसनाविरोधी विविध उपक्रमांतून जाणीव जागृती केली जाते.
मुलांच्या मनामध्ये तंबाखूविरोधी विचार निर्माण व्हावेत व जीवनातील व्यसनाधिनतेची भयानकता व आत्मघातकता लक्षात यावी यासाठी रांगोळी, चित्रकला, निबंध, पथनाट्य, पाककला, तंबाखूविरोधी प्रतिकृती बनविणे, किल्ले स्पर्धा अशा नावीन्यपूर्ण स्पर्धा आणि उपक्रम व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी आयोजित केल्या जातात.
युवा पिढी व्यसनमुक्त होण्यासाठी निरंतर लढा
रक्षाबंधनातून सर्व स्तरातील लोकांना व्यसनमुक्तीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे.
देशाची तरूण पिढी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेल्याने कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे आर्थिक, सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे.
यासाठी तंबाखूविरोधी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेत सहभागी होऊन तरूण पिढीला एका राजपथावर पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
त्यातून प्रत्येकाने आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावण्याचा प्रयत्न करावा, असा त्या मागचा उद्देश आहे.
विशेष म्हणजे या कार्यात प्रत्येकाचे सामाजिक उत्तरदायित्व असावे याकरिता विविध जिल्हा व तालुकास्तरीय शासकीय कर्मचारी व अधिकारी, पत्रकार, पोलीस, शिक्षक, पालक अशा विविध घटकांना त्यामध्ये सामावून घेतले आहे.
अर्थात या अशा प्रवाहाविरूद्ध अथवा व्यसनाधिन तरूणांच्या मनाविरूद्ध काम करताना प्रचंड कसरत करावी लागत आहे.
परंतु यानिमित्ताने तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे कशाप्रकारच्या यातना भोगाव्या लागतात, याची जाणीव करून देत तंबाखूविरोधी काम करण्यासाठी अभिवचन घेतले आहे.
अर्थात त्यांनाही या अभियानात सामावून घेतले गेले.
युवा पिढी व्यसनमुक्त व्हावी यासाठी हा लढा निरंतर सुरूच राहणार आहे.
या समाजाभिमुख उपक्रमात अधिक भर देऊन असंख्य विद्यार्थ्यांच्या सहभागातून देशाच्या भावी पिढीला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण सत्कार्य केले जात आहे.
त्याची प्रेरणा केलेल्या कार्यातून सदैव मिळत राहणार आहे.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने हे सकारात्मक प्रयत्न असंख्य लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून असे उपक्रम राबविले जात आहेत.
तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरेचे व्यसनमुक्तीचे कार्य हे आगळे-वेगळे आणि प्रगल्भ आहे.
हे काम लक्षणीय तर आहेच शिवाय अत्यंत विधायकही आहे.
तंबाखूचे दुष्परिणाम हे व्यक्तिगत विनाशकारक आहेत. तसेच सामाजिक स्तरावर घातक आणि समस्याप्रधान आहेत.
अशा समाजाच्या सबलीकरणासाठीच्या उपक्रमात नेहमीच प्रत्येकाने खारीचा वाटा उचलणे आवश्यक आहे.