बलिदान वाया जाऊ नये
By admin | Published: June 24, 2017 02:35 AM2017-06-24T02:35:53+5:302017-06-24T02:35:53+5:30
पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (बॅट) च्या गोळीबाराला तोंड देऊन घुसखोरी हाणून पाडताना महाराष्ट्रातील दोन जवानांना आलेले वीरमरण आणि श्रीनगरमधील मशिदीबाहेर
पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (बॅट) च्या गोळीबाराला तोंड देऊन घुसखोरी हाणून पाडताना महाराष्ट्रातील दोन जवानांना आलेले वीरमरण आणि श्रीनगरमधील मशिदीबाहेर जमावाच्या हल्ल्यात उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा झालेला मृत्यू या दोन्ही घटना अतिशय दुर्दैवी असून, त्याचा करावा तितका निषेध कमीच आहे. औरंगाबादमधील संदीप जाधव आणि कोल्हापूरचे सावन माने या दोन जवानांनी तर देशासाठी शत्रूशी लढताना दिलेल्या बलिदानाचे दु:ख सर्वांना आहे. दोन देशांतील तणाव व पाकच्या कागाळ्या यामुळे वीरमरण येणाऱ्या जवानांची संख्या काही महिन्यांमध्ये वाढली आहे. पाकिस्तानचे मनसुबे हाणून पाडताना जवानांना हौतात्म्य आल्यानंतर सरकारपासून सर्व पातळीवर दु:ख होते, निषेधाचे सूर उमटतात आणि मदतीच्या घोषणाही होतात. पण काही काळ लोटल्यावर सारेच जण हे वीरमरण विसरून जातात. सरकारी यंत्रणा बेदरकारपणे त्यांच्या नातेवाईकांशी वागते. या दोन जवानांच्या नातेवाईकांच्या बाबतीत असे होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. पोलीस उपअधीक्षक मोहमद अयुब पंडित यांचा जमावाच्या मारहाणीत झालेला मृत्यूही निषेधार्ह आहे. त्यांना तर आपल्या देशातील नागरिकांनीच मारले आहे. काश्मीरमध्ये गेली तीन वर्षे तणावाचे वातावरण असून, तणाव संपविण्यात वा कमी करण्यात केंद्र व राज्य सरकार दोघांना अपयश आले आहे. काश्मीरमध्ये स्थानिक व पाकिस्तानी दहशतवाद्यांनी संख्या वाढते आहे. स्थानिक जनता त्यांना सक्रिय मदत करताना दिसत आहे. हे का होत आहे आणि ते कसे थांबवता येईल, याचा विचारच होताना दिसत नाही. सुरक्षा दले व पोलीस यांच्या आधारे काश्मीरच्या प्रश्नांवर तोडगा निघू शकत नाही. त्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करणे आवश्यक आहे आणि नेमकी तीच बंद झाली आहे. तेथील सारेच नागरिक पाकिस्तानधार्जिणे नाहीत, त्यांना जे चालले आहे, ते मान्यही नाही. पण रोजगार नाहीत, उद्योग नाहीत, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई यांमुळे काश्मिरींमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. ती दूर व्हायला हवी. ते काम सुरक्षा दले करू शकत नाहीत. गोळीबार व पेलेट गन्सचा वापर यामुळे सरकारी यंत्रणांविषयी अविश्वास व संताप आहे. त्यामुळे तणावात भर पडत आहे. पाकिस्तान त्याला खतपाणी घालत आहे. उपअधीक्षकाचा मारहाणीत झालेल्या मृत्यूचे हेही एक कारण आहे. त्याचा निषेध करतानाच काश्मिरी जनतेच्या मूळ प्रश्नांना हात घालणे गरजेचे आहे. या जनतेला फुटीरवादी व पाकधार्जिण्या शक्तींपासून दूर नेण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. या तिघांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नसेल तर आता तरी ती सुरुवात व्हावी.