सदाभाऊंचा पतंग भरकटला...
By admin | Published: May 26, 2017 01:31 AM2017-05-26T01:31:03+5:302017-05-26T01:31:03+5:30
आपल्या देशातील शेतकरी आणि शेतकऱ्यांचे नेते यांच्या संघटनाला काहीतरी अनामिक शाप असावा ! एक झाले, लढायला सज्ज झाले
आपल्या देशातील शेतकरी आणि शेतकऱ्यांचे नेते यांच्या संघटनाला काहीतरी अनामिक शाप असावा ! एक झाले, लढायला सज्ज झाले, आता आपले तारणहार निर्माण होणार असे वाटू लागले की लगेचच कुणाच्या ना कुणाच्या डोक्यात हवा शिरते आणि सर्व काही विसकटून जाते ! स्वातंत्र्यापासून आजपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या नशिबीही त्याच शापाचे भोग आलेले दिसतात. शरद जोशींसारखा विद्वान माणूस बांधावर जाऊन बळीराजाला शहाणे करण्याचा प्रयत्न करतो. भांडवली अर्थशास्त्रापासून मार्क्सवादी तत्त्वज्ञानापर्यंतचे अनेक पदर त्यांनी उकलून दाखवून शेतमालाला हमीभाव मागणारे अर्थशास्त्र राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांपुढे मांडले. शरद जोशींची संघटना नावारूपास आली. त्यांना भारतीय जनता पक्ष आपला वाटला अन् संघटनेची शकले उडाली ! राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोतसारखी शेतकऱ्यांसाठी जिवाची बाजी लावणारी मंडळी स्वतंत्र झाली. हा इतिहास राज्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना नवा नाही. पुढे साखरसम्राटांच्या विरोधात राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी युद्धाचे रणशिंग फुंकत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा लढवय्या कार्यकर्त्यांच्या हाती दिला. रघुनाथदादांनीही आपली स्वतंत्र चूल मांडून आपली आंदोलनाची स्वतंत्र फळी निर्माण केली. सगळ्यांचाच लढवय्या बाणा आणि सगळ्यांचेच युद्ध शेतकऱ्यांसाठी ! पण कितीही युद्धं झाली तरी शेतकरी मात्र आपल्या बांधावर आहे तेथेच आहे.
गेल्या दशकात पश्चिम महाराष्ट्रात राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नवा चेहरा दिला. हा चेहरा देताना महाराष्ट्राच्या राजकारणातील साखरपट्ट्याला आणि सहकार क्षेत्राला जबरदस्त हादरे देण्याची व्यूहरचना केली. साखर उद्योगाचे अर्थशास्त्र त्यांनी ऊस उत्पादकांना शिकविले. साखर उद्योगात येणाऱ्या पै न् पै चे पोस्टमार्टेम करून पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक हक्काचा मतदार असलेला ऊस उत्पादक शेतकरी आणि त्याला मानणारा छोटा शेतकरी तसेच शेतमजूर त्या दोन्ही पक्षांपासून तोडला. तो तोडताना अर्थशास्त्र मांडत असताना त्याला आक्रमक आंदोलनाची जोड देणारी कार्यशैली विकसित केली. ट्रक, ट्रॅक्टरचे टायर फोडण्यापासून स्वत:चीही डोकी फुटून रक्तबंबाळ झालेले राजू शेट्टी माध्यमांपुढे नैसर्गिकरीत्या येत गेले. या प्रवासात राजू शेट्टींचा विश्वासू, इरसाल आणि आक्रमक शिलेदार म्हणून सदाभाऊ खोत यांची भूमिका खूप महत्त्वाची राहिली. सदाभाऊ हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात हजारभर लोकसंख्या असलेल्या मरळनाथपूर या गावचा हाडाचा अल्पभूधारक. कधी बेकरी व्यवसाय, तर कधी दूध व्यवसाय आणि प्रसंगी राजारामबापू साखर कारखान्यात नोकरीही केलेला लढवय्या तरुण. ग्रामीण ढंगातील इरसाल आणि आक्रमक भाषणशैलीमुळे सदाभाऊ लोकप्रिय झाले. संघटनेचे प्रदेशाध्यक्षही झाले. शेतकऱ्यांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे राजू शेट्टी ‘नोट आणि व्होट’ मागत विधानसभा व लोकसभेतही पोहचले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सहकार-साखर साम्राज्याच्या विरोधातील हुकमी हत्यार म्हणूनच शेट्टी-सदाभाऊंकडे भाजपासह सर्वच पक्ष पाहू लागले. सदाभाऊंचीही महत्त्वाकांक्षा जिवंत झाली. त्यांनाही माढा लोकसभा मतदारसंघातून उभे राहण्याची खुमखुमी आली. २०१४च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इमानेइतबारे दोस्ती केली. भाजप आघाडीची सत्ता आल्यानंतर सदाभाऊंना मंत्रिपदाची स्वप्ने पडणे स्वाभाविक होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वप्न साकार केले. सदाभाऊंचा पतंग राज्याच्या राजकारणात उत्तुंग घिरट्या घेऊ लागला. मुत्सद्दी आणि धूर्त राजू शेट्टींनी शेतकरी आणि आंदोलनाची नाळ तुटू दिली नाही. सदाभाऊ मात्र सत्ता राजकारणात रमले. त्याचाच परिणाम म्हणून आज शेट्टी आत्मक्लेश यात्रेवर निघाले आहेत तर सदाभाऊ लाल गालिच्यांच्या विश्वात दंग आहेत. स्वाभिमानीची उभी फूट आणि सदाभाऊंचा भाजपा प्रवेश अटळ दिसतो. पण शापापुढे आपण काय करणार? शेवटी सदाभाऊंचा पतंग भरकटलाच म्हणायचे !
- राजा माने