सदाभाऊ, तुमची ओळख काय? रविवार विशेष - जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 12:38 AM2018-11-04T00:38:40+5:302018-11-04T00:41:40+5:30

महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची स्मशानभूमी झाली आहे. कारण दीड लाख शेतकऱ्यांनी गेल्या दोन दशकांत आत्महत्या करून जीवन संपविले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी अभ्यासाअंती मांडले होते. त्या राज्याच्या कृषी खात्याचे राज्यमंत्री असणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी शासन बांधावर घेऊन जाऊन काम करावे. राजू शेट्टी यांना शिव्या देऊन शेतीचे प्रश्न सुटणार असतील तर तो मार्ग निवडावा...

Sadabhau, what is your identity? Sundays Special - Jagar | सदाभाऊ, तुमची ओळख काय? रविवार विशेष - जागर

सदाभाऊ, तुमची ओळख काय? रविवार विशेष - जागर

Next
ठळक मुद्देत्यामुळे स्वत:ची ओळखच हरविलेल्या ‘सदां’ना अधिक काय सांगावे? राजू शेट्टी यांना शिव्या देऊन शेतीचे प्रश्न सुटणार असतील तर तो मार्ग निवडावा...

- वसंत भोसले -
महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची स्मशानभूमी झाली आहे. कारण दीड लाख शेतकऱ्यांनी गेल्या दोन दशकांत आत्महत्या करून जीवन संपविले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी अभ्यासाअंती मांडले होते. त्या राज्याच्या कृषी खात्याचे राज्यमंत्री असणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी शासन बांधावर घेऊन जाऊन काम करावे. राजू शेट्टी यांना शिव्या देऊन शेतीचे प्रश्न सुटणार असतील तर तो मार्ग निवडावा...

शेतकऱ्यांच्या भल्यासाठी लढणारे आणि त्यांच्यासाठी राजकारण करणारे खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत आता महाराष्ट्राला अपरिचित राहिलेले नाहीत. तीन वर्षांपूर्वी सदाभाऊ खोत यांचा मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. तेव्हा ‘आमचा सदा मंत्री झाला!’ या शीर्षकाखाली खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’साठी आवर्जुन लेख लिहिला होता. तो लेख स्वत:हून लिहिला होता. ‘लोकमत’ने सांगितले नव्हते. त्यात त्यांनी आनंद व्यक्त केला होता, अभिमान नोंदविला होता आणि हा एक प्रकारे शेतकऱ्यांचा स्वाभिमान द्विगुणित झाला आहे, असा विश्वासही नोंदविला होता. त्यांच्याबरोबर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अंगात फाटकी पॅन्ट असल्यापासून लढा देत होता.

जयसिंगपूरमध्ये होणाºया ऊस शेतकरी परिषदेत मुलुखमैदान तोफ म्हणून जोरदार भाषण सदाभाऊ खोत यांचेच होत होते. शेतकऱ्यांच्या मनातले दु:ख भळाभळा व्यक्त व्हायचे. आंदोलनाची चेतना पेटवून उठायची. राजू शेट्टी यांचे नेतृत्त्व मान्य करूनच सदाभाऊ आणि सर्वसामान्य शेतकरी लढत राहिला. तो एक एल्गार होता. राजू शेट्टी यांचे नेतृत्व, शेतकरी आंदोलन आणि शेतकºयांचे कल्याण यात काही उणिवा असतीलही; पण शेतकºयांना जागृत करून संघटित होऊन लढण्याचे बळ निर्माण केले. हे मान्यच करावे लागेल. त्यामुळे ऊसकरी शेतकºयांना योग्य भाव मिळू लागला. सहकारी साखर कारखानदारीला शिस्त लागली.अशा पार्श्वभूमीवर जेव्हा नव्या हंगामाची सुरुवात होताच, जयसिंगपूरची १७वी परिषद झाली. त्यातील मागण्यांसाठी आंदोलनाचा नारा देण्यात आला. त्याची तुलना अस्वल घेऊन गावोगावी फिरणाऱ्या दरवेशांशी सदाभाऊ खोत यांनी करावी, यापेक्षा शेतकरी चळवळीचाअपमान काय असू शकतो? वीस वर्षे लढत राहिलो, असे शेतकरी संघटनेचा बिल्ला छातीवर लावून सांगत होता. त्यावेळी राजू शेट्टी दरवेशीवाटला नाही का? ते सुगीच्या काळात अस्वलाच्या मदतीने गावोगावी भीक मागत होते, असे वाटत असेल तर तुम्ही त्यांच्यामागे का फिरत होता?तुम्ही डमरू वाजवत का होता? राजू शेट्टी विरुद्ध सदाभाऊ खोत असा वाद जेव्हा सुरूझाला तेव्हापासून एकमेकांवर तिखट टीका करतानाही यावर लिहिण्याचे टाळले होते.

कारण दोघांनीही कष्ट उपसले होते. शेतकऱ्यांना संघटित केले होते. त्यांच्यात मतभेद निर्माण होऊन शेतकरी चळवळीचे नुकसान होऊ नये, असे वाटत राहायचे. तसे स्पष्टपणे दोघांनाहीसांगून मतभेद निर्माण झाले असतील तर वेगवेगळ्या वाटेने चालत राहा, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती.सदाभाऊ, तुमची ओळख काय? असा सवाल आता उपस्थित करावा, असे वाटू लागले आहे. कारण दरवेशाच्या भावाची भूमिका सदाभाऊ यांनी निभावली होती. वारणानगरच्या वाटेवर नवे पारगावच्या दक्षिणेस पाडळी गाव आहे. त्या गावात अनेक दरवेशी राहत होते. जंगलातून पकडून आणलेल्या अस्वलांना ते प्रशिक्षण देऊन तयार करीत असत. सुगीच्या दिवसांत गावोगावी फिरत धान्य मागत असत. पुढे अस्वलांना पाळणे बेकायदा ठरविण्यात आले. तसा त्यांचा व्यवसाय बंद पडला. दरवेशीही संपले. तसा पाडळीचा उल्लेख दरवेश पाडळी करू नका, असा ठराव गावकºयांनी केला. कारण हातकणंगले तालुक्यात एकच पाडळी गाव आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सांगली जिल्ह्यातील पेठ नाका ते शिराळा रस्त्याच्या दक्षिणेस असलेल्या मरळनाथपूर गावचे सदाभाऊ खोत जिरायत शेतकऱ्याचा मुलगा. दोन-चार एकर जमीन. गावाला पाणी नाही, अंगात चांगले कपडे नाहीत, पायात वाहाणा नाहीत, जुन्या पद्धतीचे घर, अशा पार्श्वभूमीवरून लढण्याची उमेद बाळगून शेतकरी आंदोलनात आलेला हा तरुण. एकदा छातीवर संघटनेचा बिल्ला लावला. वक्तृत्वाच्या जोरावर नेतेगिरी करू लागला. एक संस्था काढण्याचा प्रयत्न केला. तो सपशेल अपयशी ठरला. राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना उभारण्याचा निर्णय घेतला, तेव्हा या सदाभाऊ खोत यांच्या भाषेत दरवेशाची साथ सुरू केली.

अनेक आंदोलने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झाली. ती कशी लढायची आणि कोठे थांबायचे? शेतकºयांच्या पदरात दोन पैसे कसे पडतील, याचे तंत्र राजू शेट्टी यांनी विकसित केले होते. त्या जोरावर मुलुखमैदान तोफ म्हणून भाषणे करीत फिरण्याऐवजी सदाभाऊ खोत यांनी काय केले? पुढे लोकसभा लढविण्याचा मुद्दा आला तेव्हा राजू शेट्टी यांच्या ज्या मार्गावरील पदयात्रेने (सोलापूर ते बारामती) माढा मतदारसंघात शेतकºयांमध्ये प्रचंड जागृती निर्माण झाली होती. छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला लावूनच सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढविली. अत्यंत अटीतटीच्या लढतीत केवळ सव्वीस हजार मतांनी निसटता पराभव झाला. त्यांच्या विरोधात मोहिते-पाटील घराण्याचे नेते विजयसिंह दादांसारखे तगडे उमेदवार होते. शिवाय पूर्वी शरद पवार यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केलेहोते. तेव्हा या दरवेशाच्या टोळीतील सदाभाऊंच्या छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला होता ना? लोकसभेच्या निवडणुका झाल्या. केंद्रात सत्तांतर झाले तसे राज्यातही चार महिन्याने झाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपचा मित्र पक्ष होता. मित्र पक्षांना मंत्रिमंडळात स्थान देताना (दरवेशाचा धंदा करणाºया) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सदाभाऊ खोत यांचे नाव दिले. मात्र, या पट्ट्याने स्वाभिमानी पक्षाच्या नावाने उमेदवारी न करता भाजपची उमेदवारी घेतली. राजू शेट्टी आजही स्वाभिमानी पक्ष या पक्षाचे लोकसभेत सदस्य आहेत. हा पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असताना सदाभाऊ खोत यांनी भाजपची उमेदवारी कशी घेतली? ही गद्दारी नव्हती का? याउलट राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजपला ठणकावून सांगितले की, ‘मी भाजपचा सदस्य नाही. माझ्या पक्षाचा आहे. शिवाय मला राज्यमंत्रिपद चालणार नाही. कॅबिनेट पदच हवे,’ तसेच घडले. मात्र, सदाभाऊ खोत यांना मंत्री होण्याची घाई होती. मंत्रिपदावर जाताच हा दरवेशी राज्यभर फिरू लागला. त्यांचा उद्योग काय चालला आहे? स्वत:ची शेतकरी संघटना स्थापन केली. त्यातर्फे जयसिंगपूरच्या शेतकरी परिषदेच्या अगोदर वारणानगरजवळ कोडोलीला परिषद घेतली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच बोलावले.

यापूर्वी सरकार शेतकºयांच्या विरोधात असायचे, आता त्या राज्याचे सरकारचे नेते, शेतकरी परिषदेला येतात, असे सांगितले गेले. परिषदेचे फलित काय? काहीच नाही. भूमिका काय तर एफआरपी अधिक दोनशे रुपये द्या, आता राज्यकर्ते झालात ना? राज्याचे नेतृत्वच मार्गदर्शन करायला होते ना? मुख्यमंत्र्यांना शेतकºयांच्या बांधावर आणल्याचे सांगत होता ना? मग, निर्णयच जाहीर करायचा होता. राज्य सरकारच त्या परिषदेचे प्रायोजक होते ना? परिषदेसाठी कोडोली-वारणानगरची निवड करतानाचे कारण सांगितले होते की, वारणा खोरे लढाऊ शेतकºयांचे खोरे आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांचे ते मध्यवर्ती ठिकाण आहे; पण वारणाकाठच्या शेतकºयांना माहीत आहे की, ही परिषद होण्यासाठी कोणाचे हातभार लागले होते. खुर्च्या, ताडपत्रीपासून माईकही आणण्याची व्यवस्था कोणी केली होती? पत्रकार कक्षाच्या बाजूने परिषदेनंतर जाणाºया मोलमजुरी करणाऱ्या बायाबापड्या आजची मजुरी कधी देणार? याची विचारणा करीत होत्या. कारण त्यांना त्याच वायद्यावर आणले गेले होते. हा संवाद एका ज्येष्ठ पत्रकाराने स्वत:च्या कानाने ऐकला आहे. अशा या बदललेल्या सदाभाऊ खोत यांचा दरवेशी ते राज्यकर्ता हा प्रवास थक्क करणारा आहे.

इतके सारे करण्यापेक्षा मांडीला मांडी लावून बसलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गेल्यावर्षीचे एफआरपीचे थकीत ठेवलेले पैसे तेवढे शेतकºयांना देऊन टाका, एवढी जरी मागणी केली असती, ती देशमुखांनी मान्य केली असती तर स्वाभिमानीचा सोलापूर जिल्ह्यातील दरवेशांचा धंदा बंद पडला असता. शिवाय एक तरी यश रयत क्रांती संघटनेच्या नावावर जमा झाले असते. त्याऐवजी राजू शेट्टी यांना शिव्या देण्याचे काम केले. त्यांच्या काही चुका असतीलही, पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, हे मान्य करावेच लागेल. शेतकºयांची तीच भावना आहे. म्हणून तर ज्या जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत ‘आता संघटनेची मुलुखमैदान तोफ धडाडणार’ असे सांगून सदाभाऊ खोत यांना बोलण्यास पाचारण करण्यात येत होते. तेव्हा हजारो शेतकरी नाचत, शिट्या मारत आणि डोक्याचा फेटा उडवित जल्लोष करायचे.

‘आमचा सदा, आमचे दु:ख मांडणार आणि आम्हाला दु:खी ठेवणाऱ्यांचे वाभाडे काढणार’ अशी भावना असायची. त्याच सदाभाऊ खोत यांचे नाव परवाच्या परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा. जालिंधर पाटील यांनी घेतले, तेव्हा शेतकऱ्यांनी त्याचे नावही घेऊ नका, टीकाही करू नका. त्याचे नाव आता घेण्याच्या लायकीचे ते राहिले नाहीत, असे म्हणत प्रचंड विरोध केला. तेव्हा प्रा. जालिंधर पाटील यांना दिलगिरी व्यक्त करीत तुमच्या भावनांशी सहमत आहे, असे स्पष्टीकरण द्यावे लागले.  ही सदाभाऊ खोत यांच्या निष्ठेविषयीची शेतकऱ्यांमध्ये भावना आहे.

महाराष्ट्रात शरद जोशी यांनी अंगारमळ्यापासून शेतकरी आंदोलनाची सुरुवात केली. ऊस, कांदा, कापूस, तंबाखू, दूध, आदी उत्पादक शेतकºयांसाठी त्यांनी सतत लढा दिला. शेतमालाला रास्तभाव मिळाला तर ग्रामीण भागातील दारिद्र्य संपेल, हा सिद्धांत त्यांनी मांडला होता. मात्र, सध्याची शेती, त्यातील भांडवली गुंतवणूक आणि बाजारपेठेची कमकुवत व्यवस्था पाहिली की, हे शक्यच नाही, असे वाटते.

सध्याची जिरायत आणि तुकड्याची शेती व्यवस्था मोडून काढून सामुदायिक पद्धतीने सहकारी संस्थांच्या आधारे शेती करावी लागणार आहे. अन्यथा कॉर्पोरेट फार्मिंग स्वीकारावे लागणार आहे. जे आपल्या कृषी समाज रचनेला किंवा ग्राम संस्कृतीला झेपणारे नाही. दुसरी बाब ही की, शेतमालाला भाव देण्यात सहकार चळवळीलाच थोडेफार यश आले आहे, हे मान्यच करावे लागेल. त्यासाठी कष्ट उपसणाºया नेत्यांना सलाम करावा लागेल. आणि शेतकºयांना संघटित करून रास्त भावाची चळवळ उभारणाºया शरद जोशी, महेंद्रसिंग टिकेत, प्रा. नंजुडाप्पा स्वामी, बाबा गौंडा पाटील, राजू शेट्टी यांच्यासह असंख्य नेत्यांचे उपकार मानायला हवेत.
महाराष्ट्र ही शेतकºयांची स्मशानभूमी झाली आहे.

कारण दीड लाख शेतकऱ्यांनी गेल्या दोन दशकांत आत्महत्या करून जीवन संपविले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी अभ्यासाअंती मांडले होते. त्या राज्याचे कृषी खात्याचे राज्यमंत्री असणाºया सदाभाऊ खोत यांनी शासन बांधावर घेऊन जाऊन काम करावे. राजू शेट्टी यांना शिव्या देऊन शेतीचे प्रश्न सुटणार असतील किंवा बहुजनांचा खासदार झाल्याने शेतकऱ्यांचे भलं होणार असेल तर तो मार्ग निवडा. जातीयवादाचा आधार घेणे म्हणजे सुगीतच काय, बारमाही दरवेशाचा धंदा करता येऊ शकेल. अस्वल पाळण्यास बंदी आली असली तरी तुमच्या भोवती अस्वले काही कमी नाहीत. त्यामुळे स्वत:ची ओळखच हरविलेल्या ‘सदां’ना अधिक काय सांगावे?

Web Title: Sadabhau, what is your identity? Sundays Special - Jagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.