सगुण-प्रासादिक भावदर्शन
By admin | Published: August 25, 2016 06:32 AM2016-08-25T06:32:38+5:302016-08-25T06:32:38+5:30
उपासनामार्गात सगुणोपासना ही सहज समजणारी आणि परमात्म्याशी सहजपणे अनुसंधान साधणारी आहे
उपासनामार्गात सगुणोपासना ही सहज समजणारी आणि परमात्म्याशी सहजपणे अनुसंधान साधणारी आहे. भक्तीचे प्रयोजन एकच की, परमात्म्याशी एकरुप होणे. निर्गुण हे ज्ञानमय आहे तर सगुण हे प्रेममय. सगुण हे भावनामय आहे. सगुणामध्ये ओलावा आहे. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय आपल्या अभंगात म्हणतात...
आवडे हे रुप गोजिरे सगुण।
पाहता लोचन सुखावले।।
आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे।
तो मी तुज पाहे वेळोवेळा।।
देवा तुझे गोजिरे सगुणरुप मला फार आवडते. ते पाहाताना माझे डोळे सुखावतात. हे पांडुरंगा आता माझ्या डोळ्यासमोर तू असाच राहा, म्हणजे मी तुला वेळोवेळी पाहीन. तुझ्या रुपाला पाहाण्यासाठी माझे मन लांचावले आहे. हे तुकोबारायांच्या अंतर्मनाचे प्रासादिक भावदर्शन आहे. सगुण परमात्म्य विषयीचा उत्कट भाव त्यातून प्रगट होत आहे.
पुढे दुसऱ्या एका अभंगात तुकोबाराय म्हणतात...
अद्वैती तो नाही माझे समाधान।
गोड हे चरण तुझी सेवा।
अद्वैत स्थितीमध्ये माझे समाधान होत नाही. तुझी चरणसेवा करणेच मला गोड वाटते. मला या स्थितीतून वेगळा कर आणि देवभक्तातील सुखाचा सोहळा दाखव. तुझ्या सगुणरुपाचे वर्णन करणाऱ्या तुझ्या नामसंकिर्तनाचेच उचित दान मला दे. सगुणोपासना म्हणजे षङ्गुणऐश्वर्यसंपन्न भगवंताची त्याच्या विशिष्ट रुपाला धरून केलेली पूजा, उपासना किंवा संकीर्तन होय. संकीर्तन हे निर्गुण तत्वाचेही करता येते. ते गुणसंकीर्तन होते तर सगुणाचे कीर्तन हे लीला संकीर्तन होय. सगुण रुपात प्रत्येक इंद्रिय भगवंताची सेवा करून शुद्ध होता येते.
घेई घेई माझे वाचे।
गोड नाम विठोबाचे।
डोळ्यांनी हरिरुप पाहावे. कानांनी हरिकथा ऐकावी. मुखाने नाम उच्चारावे. पायाने तीर्थयात्रा करावी, हाताने टाळी वाजवावी आणि संकीर्तनाची गुढी उभारावी. फुले ही देवाला वाहायची असतात. फुलांच्या माळा स्वत:च्या गळ्यात घालायच्या नसतात. इंद्रिये ही फुले आहेत. ती परमात्म्यालाच वाहायची आहेत.
इंद्रियाचा उपयोग ईश्वराच्या आणि मानव्याच्या सेवेत करायचा आहे. प्रत्येक इंद्रिय हे परमात्म्याकडे धावणे ही केवढी मोठी उपासना. म्हणून सगुण उपासकाला इंद्रिये हे साधनरुप आहेत. संतश्रेष्ठ तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, ‘मला ब्रह्मज्ञान नको, आत्मविश्वास नको, मी भक्तच राहू दे आणि तू देवच. म्हणजे मला सेवेच्या रुपाने तुझी प्रेमभक्ती करता येईल आणि माझे जीवनच या प्रेमभक्तीने आणि सेवेने निर्मळ गंगा होऊन जाईल’. अर्थात सगुणाचे सामर्थ्य काही वेगळेच.
-डॉ. रामचंद्र देखणे