वास्तवातील ‘विघ्नहर्त्या’ मुंबई पोलिसांना सलाम

By admin | Published: September 19, 2016 04:27 AM2016-09-19T04:27:16+5:302016-09-19T04:27:16+5:30

अत्यंत पवित्र, उल्हसित आणि आनंदमयी वास्तव्यानंतर श्री गजाननाने पुनरागमन करण्याचा आशीर्वाद देऊन अखेर प्रस्थान केले.

Salute to the real 'Vinhhahta' Mumbai Police | वास्तवातील ‘विघ्नहर्त्या’ मुंबई पोलिसांना सलाम

वास्तवातील ‘विघ्नहर्त्या’ मुंबई पोलिसांना सलाम

Next


एकादश दिवसांच्या अत्यंत पवित्र, उल्हसित आणि आनंदमयी वास्तव्यानंतर श्री गजाननाने पुनरागमन करण्याचा आशीर्वाद देऊन अखेर प्रस्थान केले. तो सर्वार्थाने विघ्नहर्ता. परंतु विघ्न हरण करण्याचे व आसमंतात आनंद भरण्याचे काम तो स्वत: थोडेच करतो? हे काम करण्याची सद्बुद्धी तेवढी तो देतो, कारण तोच खरा बुद्धिदाता. त्याने सद्बुद्धी देऊन ज्यांच्या हाती हे काम करवून घेतले, तमाम महाराष्ट्रात यंदाचा गणेशोत्सव अत्यंत आनंदाने पार पडावा, त्याला कोठेही गालबोट लागू नये, समाजाचे सर्व घटक त्यात सहभागी व्हावेत आणि विशेषत: विसर्जनाच्या मिरवणुकीत एकाच वेळी भक्तांमधील उत्साह वाढवतानाच त्यांनी अकारण रेंगाळू नये म्हणून मिरवणूक सारखी सरकती ठेवून वेळेचा अपव्यय होऊ नये यासाठी ज्या महाराष्ट्र आणि खास करून मुंबई पोलिसांनी रात्रंदिवस कष्ट उपसले त्यांचे आणि त्यांच्या नायकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
सामान्यत: पोलीस नेहमीच सामान्यजनांच्या आणि माध्यमांच्या लक्ष्यावर असतात. बऱ्याचदा ते रास्तही असते. परंतु किमान अशा वेळी तरी सत्यास सत्य म्हणण्याची बुद्धी पुन्हा त्या गणेशानेच त्यांना द्यावी असे वाटते. मुंबई, महाराष्ट्र आणि गोव्यात सार्वजनिक स्वरूपात तसेच घरोघरी लक्षावधी गणेशमूर्तींची स्थापना केली जाते. एकट्या मुंबईतील ही संख्या तब्बल २ लाख ११ हजारांच्या घरात जाते. खुद्द पोलिसांच्या घरातही गणेशाची स्थापना होतच असते. पण किती पोलिसांना त्यांच्या घरातील मूर्तीची आरती करायची संधी मिळत असेल? बहुतेक कोणालाच नाही. कारण विघ्नहरणाची जबाबदारी त्यांना पार पाडायची असते व अलीकडच्या काळातील विघ्नकर्त्यांची वाढती संख्या लक्षात घेता, त्यांच्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवासारखे समारंभ ही एक नामी संधीच असते.
गणेशोत्सवाच्या संपूर्ण काळात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखणे व त्याचवेळी जनजीवनही सुरळीत सुरू ठेवणे हे काम जसे आव्हानात्मक तसेच मोठ्या जोखमीचे. विशेषत: मुंबईसारख्या ठिकाणी तर ही जोखीम कितीतरी पटींनी अधिक आणि विसर्जनाचा दिवस म्हणजे तर आव्हानाची परिसीमाच. या एकाच दिवशी ५०-५५ लाख लोक म्हणजे जवळजवळ निम्मी मुंबई रस्त्यावर उतरत असते. येथे तुलना करण्याचा हेतू नाही, पण एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने लोक व्हॅटिकन सिटीतही जमा होत नसतात. एकट्या गिरगाव चौपाटीवर हजारो गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असतात. काही लोक विसर्जनासाठी थेट समुद्रात शिरतात. तिथे लाटेच्या प्रवाहात ओढले जाण्याचा धोका तर नेहमीचाच; पण अलीकडच्या काळात माणसांना डंख मारणारे स्टिंग रे किंवा जेली फिशसारखे मासे किनाऱ्यापाशी असतात. त्यांच्यापासून भक्तांचा बचाव करण्याचे कामही पुन्हा पोलिसांनाच करावे लागते. यंदाचा गणेशोत्सव संपूर्णतया विघ्नरहित पार पाडण्याचे मोठे आव्हान मुंबई पोलिसांपुढे होते. देशाचे शत्रू नको ते उद्योग करू शकतील अशी शंका आणि गुप्तवार्ताही होती. तसे होऊ नये म्हणून पोलिसांनी जनतेमधीलच जागरूक नागरिकांच्या सक्रि य सहकार्याने गुप्तवार्ता प्रतिनिधी नेमस्त केले होते. एकट्या मुंबईत असे २५० जण रात्रंदिवस दक्ष होते. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले. मोठ्या संख्येने महिला मध्यरात्रीपर्यंत गणेशदर्शनासाठी फिरत असतानाही मंगळसूत्र लांबविणे, त्यांच्याशी असभ्य वर्तन करणे असे प्रकार घडले नाहीत.
पोलीस आणि जनतेमधील सहकार्य व सद्भावना यातून मुंबईतल्या भेंडीबाजारसारख्या मुस्लीमबहुल व गजबजलेल्या विभागात काही मुस्लीम बांधव गणेशभक्तांचे स्वागत करताना दिसत होते. वास्तव अर्थाने सर्वधर्मसमभावाचे ते जितेजागते प्रतीक होते. याच संदर्भात आणखी एका मुद्द्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल आणि तो म्हणजे एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येत लोक रस्त्यावर उतरत असूनही मुंबईची नेहमीची वाहतूक कोंडी कुठेही आढळून आली नाही. आणखी एक विशेष म्हणजे, कोणीही न सांगता व बळजबरी न करता संपूर्ण उत्सव काळात बहुतांश मुंबई शाकाहारी बनली होती. ही त्या सद्बुद्धिदात्या हेरंबाचीच कृपा म्हणायची!
अलीकडच्या काळात राज्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात एक मोठा सकारात्मक बदल होत असलेला आढळून येतो. गणेशोत्सव हा सामान्यत: हिन्दू धर्मीयांचा सण किंवा उत्सव. पण आता यामध्ये इतर धर्माचे लोकदेखील मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागले आहेत. लोकमतच्या ‘ती’चा गणपती उपक्रमाचा यात खारीचा का होईना नक्कीच वाटा आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाकडे काही लोक व्यवसायवृद्धीचे साधन म्हणूनही पाहू लागल्याचे दिसून येते. परंतु त्यासाठी कुठले तरी आयातीत दिवस साजरे करण्यापेक्षा हे केव्हाही चांगलेच. त्याचप्रमाणे केवळ गणेशोत्सवातच सहभागी होण्यात समाधान न मानता बरेचसे अन्यधर्मीय वर्षभर गजाननाची आराधना करू लागल्याचे जे दिसून येते, तो एक फार मोठा सामाजिक बदल मानला गेला पाहिजे. गणपती वा गणेशोत्सव हा खरे तर कोकणवासीयांच्या अंतरीचा ठेवा. त्यांना दिवाळीचे नव्हे, इतके गणेशोत्सवाचे आकर्षण. तिथे घरोघरी गणपती आणि तरीही निमंत्रणाविना या घरच्या गणेशाचे दर्शन घेण्याची साऱ्यांचीच रीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भले विदर्भातील असतील; पण मुंबईत येऊन त्यांनी ही परंपरा आपलीशी केली व कोणा लब्धप्रतिष्ठितांकडच्या नव्हे, तर सामान्य कार्यकर्त्यांच्या घरच्या गणपतींचे दर्शन घेऊन त्यांनी राज्यकर्त्यांसाठी एक नवा पायंडा रुजू करून दिला. आज तेच मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचे खरे नायक असल्याने त्यांचेही खास अभिनंदन!
जाता जाता : निमित्त जरी कोपर्डीत घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेचे असले, तरी त्यानिमित्ताने का होईना राज्यातील मराठा समाजात निर्माण झालेल्या ऐक्यभावनेचे स्वागतच झाले पाहिजे. परंतु केवळ स्वागत नव्हे तर अभिनंदन केले पाहिजे, या ऐक्यभावनेचा साक्षात्कार घडविणाऱ्या मूक मोर्चांचे. सामान्यत: त्या समाजातील महिलावर्ग असा व्यापक समाजासमोर सहसा येत नाही. परंतु मोर्चांमधील त्यांची उपस्थिती आणि एकूणच मोर्चा आयोजनातील शिस्त यांनी एक नवा वस्तुपाठ महाराष्ट्रासमोर घालून दिला आहे. याला उत्तर म्हणून प्रतिमोर्चे निघू नयेत व वातावरण कलुषित होऊ नये, हीच पुन्हा त्या गजाननाच्या चरणी प्रार्थना.
-विजय दर्डा
(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)

Web Title: Salute to the real 'Vinhhahta' Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.