Sambhaji Raje Chhatrapati : संभाजीराजे, मुळावर घाव घाला!
By वसंत भोसले | Published: March 6, 2022 05:06 PM2022-03-06T17:06:47+5:302022-03-06T17:33:52+5:30
Sambhaji Raje Chhatrapati : संभाजीराजे, आपले उपाेषण आणि पदरात पडलेल्या मागण्या या पुरेशा नाहीत. व्यापक लढा उभा करावा लागेल. आता जागतिकीकरणाच्या दिशेने जावे लागेल. शाहू महाराज यांनी जगभराचे ज्ञान काेल्हापूर संस्थानात आणले हाेते. त्यांचे जागतिक भान काेल्हापूरला नव्या उंचीवर पाेहाेचविणारे ठरले. अशी झेप घेण्याची तयारी करा, त्यासाठी मुळासह बदल करावा लागेल.त्यावर घाव घालावा लागेल.
- वसंत भोसले
(लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक आहेत)
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा उशिरा का होईना, कोल्हापूर जिल्हा परिषदेने नागाळा पार्कातील कार्यालयासमोर उभा केला. त्याचे अनावरण झाल्यापासून एका सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त कार्यकारी संचालक समोरून सकाळी फिरायला जातात. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर येताच रस्त्यावरून दोन्ही हात जोडून वाकून नमस्कार करतात आणि पुढे जातात. याचे कारण विचारता ते म्हणाले, साहेबांच्यामुळे मी सामान्य कुटुंबातील मुलगा सहकारी साखर कारखान्याचा एम. डी. झालो. त्यांनी ईबीसीची सवलत योजना (आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग) केली नसती तर मी कुठला शिकलो असतो? त्यांचे खूप मोठे उपकार आहेत. आमच्या पिढीचे भाग्यच बदलून गेले. मी अधिकारी झाल्याने माझा मुलगा शिकून अमेरिकेत पोहाेचला. आता तो नोकरी बदलून कॅनडामध्ये जात आहे. बघा, एका ईबीसीचा परिणाम दुसऱ्या पिढीत जागतिक बदलात झाला.
यशवंतराव चव्हाण , साहेब आणि त्यांचा मुलगा या साखळीने समाज परिवर्तन म्हणजे काय असते? याचा नेहमीच माझ्या मनात विचार येताे. म्हणूनच त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणता येते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना शाहूवाडी तालुक्यातील थोरातांच्या वडगावचा दहावीच्या परीक्षेत चमकलेला पांडुरंग पाटील भेटला नसता तर वसतिगृहाची कल्पना सुचली नसती. माणसांच्या समस्यामध्ये दडलेला उद्याचा सूर्य शोधण्याचे कार्य युगपुरुष करतात, त्यांचे ह्रदय विशाल असते. शंभर वर्षांनंतरही त्यांच्या स्मृतीने नतमस्तक व्हायला होते.
सलग सव्वा अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद सांभाळणारे वसंतराव नाईक यांना १९७५ मध्ये बदलण्याच्या हालचाली चालू होत्या. त्यामागे मराठा स्वाभिमान जोडला जात होता. मराठी माणसात जातीच्या आधारे मतभेद निर्माण होत आहेत, याचे दु:ख होत असल्याचे यशवंतराव चव्हाण एका पत्राद्वारे आपल्या पत्नीला सांगत असतात. माणसांचे कार्य, कर्तृत्व महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात कृषिक्रांती करणारा नेता केवळ बिगरमराठा आहे, म्हणून पदावरून पायउतार होऊ नये, असे त्यांचे मत होते. इतरांना संधी मिळावी, पण वसंतरावांची प्रतिष्ठा कमी होता कामा नये, असेही ते वेणुताईंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात. मनाचा हळवेपणा आणि विचारांचा पक्केपणा किती असू शकतो याचे हे उदाहरण आहे. ‘माझ्या महाराष्ट्राला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण केले नाही तर मला शनिवारवाड्यासमोर फासावर द्या!’ अशी समाजाशी बांधीलकी बाळगणारे वसंतराव नाईक होते. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी मी बांधील आहे, ते शक्य झाले नाही तर फाशीची शिक्षा भोगण्याची तयारी असणे, याला बांधीलकी म्हणतात.
ही चर्चा याच्यासाठी की, खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा समाजाच्या उन्नतीसाठी महाराष्ट्रव्यापी आंदोलन करीत आहेत. महाराष्ट्राला सामाजिक, आर्थिक आणि साहित्य-सांस्कृतिक आंदोलनांचा मोठा इतिहास आहे. सत्यशोधक समाजाची परंपरा आहे. प्रबोधनाची व्यापक दिशा महाराष्ट्राला आहे. शैक्षणिक उठाव करणाऱ्या देशातील प्रमुख प्रांतांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर होता. कर्मवीर याच मातीत जन्मले होते. छत्रपती शाहू महाराज राजर्षी याच भूमीत झाले. त्यामुळेच महाराष्ट्र हा शिवरायांचा आहे तसा ती परंपरा फुले-शाहू-आंबेडकर यांच्यापर्यंत येते, आजही तो आदर्श मानला जातो. त्याच विचारांचा विजय झाला. तो अधिक दृढ करण्याची जबाबदारी घ्यायला आता कोणी पुढे येत नाही.
महाराष्ट्राच्या मराठी समाजाची घडी बरीच बदलली आहे. परिणामी, जातीचा आधार घेऊन परिवर्तन करण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. सध्याचा उपेक्षित घटक हा जातीमुळे मागास राहत नाही. राज्यघटनेने समान संधी देण्याचा विचार मांडला आहे. त्याला छेद देऊन आर्थिक आणि शैक्षणिक धोरणे आखल्याने नवा उपेक्षित समाज उदयास आला आहे. त्यात सर्वांत मोठा मराठा समाज आहे. तो शेती करणारा आहे. व्यापार करून नफेखोरीवर जगणारा नाही. त्याला पारंपरिक शेतीतून बाहेर पडता येईना आणि आधुनिक शिक्षणाची वाट धरता येईना. थोडेफार शेती करण्याची क्षमता असणारे आणि ज्याला इतर क्षेत्रात जाण्याची संधीच मिळत नाही, असाच माणूस शेतीत आहे. शेती क्षेत्राची धोरणे ही तोट्यात घेऊन जाणारी आहेत. शेतकऱ्यांना सर्वांनी लुबाडले आहे. आजही लुबाडत आहेत. त्याचे चटके संपूर्ण समाजालाही बसत आहेत.
शेतीतून बाहेर पडावे तर शिक्षणाच्या खासगीकरणाने संधी नाकारण्यात आली आहे. शिवाय ते खासगीकरण शिक्षण महागडे आहे. यशवंतराव चव्हाण यांनी दिलेली सवलत योजना नाही. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यावर समजले की, हजारो मराठी मुले-मुली वैद्यकीय शिक्षणासाठी तेथे गेली आहेत. कारण तेथील शिक्षण स्वस्त आहे, शिकविण्याची पद्धत चांगली आहे. शिवाय चांगल्या सुविधा असलेल्या सुंदर देशात राहता येते. ही सोय आपण करू शकत नाही का? आपण ती व्यवस्था गरजूंना ओरबडण्यासाठी तयार केली आहे. अतिहुशार असलेल्यांना संधी नाकारली जाते म्हणू नये, यासाठी मेरिटवर काही जागा ठेवून कोटीभर रुपयाने वैद्यकीय शिक्षण घेणारे किती मराठा समाजातील मुले आहेत? राजर्षी शाहू महाराज यांनी त्यावेळेची शिक्षणाची गरज ओळखून व्यवस्था केली. पायाभूत सुविधा निर्माण केल्या. उत्तर भारतातील मल्लांशी लढायचे असेल तर एक-दोन नव्हे तर अनेक गोष्टी करून मल्ल तयार केले. पायाभूत सुविधा निर्माण केल्या. ती प्रक्रिया स्वतंत्रपणे अभ्यासावी अशी आहे. शाहू महाराज-मल्लविद्या असे संशोधन करायला हवे.
याच धर्तीवर संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाज आणि या समाजातील तरुण उपेक्षित वर्गात कधी ढकलला गेला? किंबहुना तो उपेक्षितच होता का? त्याच्या प्रगतीमधील अडथळे कोणते आहेत? त्याने शेती करावी की सोडावी? त्याने शिक्षणावर भर द्यावा का? आरक्षण मिळाले तर मराठा समाजाचे सर्व प्रश्न सुटणार आहेत का? आता सरकारी/शासकीय नोकरीत आहेत त्यांना आरक्षण नसताना नोकऱ्या कशा मिळाल्या? शेती तोट्यात राहणार नाही यासाठीच्या धोरणासाठी संघर्ष कोण करणार? सहकार चळवळीचा आधार होता, ती संपवून टाकणारे आणि ती खरेदी करणारे कोण आहेत? त्या नाटाळांना सरळ कोण करणार? मराठा समाजातील तरुण व्यापार-उद्योगात कधी येणार? त्यासाठी मानसिकतेत बदल कसा करणार? नाटक, साहित्य, सिनेमा आदी सांस्कृतिक व्यवसायात हजारो कोटींची उलाढाल आहे. त्यात प्रवेश कधी करणार?
कोल्हापूरची चित्रपटसृष्टी अशांना साथ देत होती. ती बंद पडू नये म्हणून शाहू महाराज यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी केलेले प्रयत्न महत्त्वपूर्ण होते. ती चित्रनगरी पुन्हा का उभी राहत नाही? चित्रपट हा आता हौशी प्रकार राहिला नाही तो व्यवसाय झाला. हौशी असताना त्यात धडपड करणारे व्यवसाय झाल्यानंतर कमावते का झाले नाहीत? अशा साऱ्या प्रश्नांना गवसणी घालणारे आंदोलन हाती घ्यावे लागेल. परिवर्तन त्यातच आहे. समाजासमोरील समस्या जाणून त्यावर अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी झटावे लागेल. मराठा समाजाचे परिवर्तन अधिक व्यापक पातळीवर करण्यासाठी पुन्हा एकदा सत्यशोधकी चळवळीप्रमाणे भिडावे लागणार आहे. त्याला आता ब्राम्हण- ब्राम्हणेत्तर वगैरे संकुचित होऊन चालणार नाही. आताची पिढी सैराट झाली आहे. ती जात-पातीच्या पलीकडे पाहू लागली आहे. सामाजिक आणि आर्थिक पातळीवर त्या जातीजातीतील मुलेमुलींचा मेळ बसू दिला जात नाही म्हणून सैराटचा शेवट जसा झाला तशी हिंसा होताना आपण पाहतो आहोत.
शिक्षण आणि रोजगार हा संपूर्ण समाजाचा कळीचा मुद्दा झाला आहे. शिक्षण बहुसंख्याकांना नाकारणारे क्षेत्र बनले आहे. सीबीएससी अभ्यासक्रम आणि स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम अशी दुहेरी पद्धत अवलंबली आहे. सरकारी आणि खासगी शाळा अशी दुसरी दुहेरी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. कोल्हापूर परिसरात आठवीसाठी लाख रुपये फी घेणाऱ्या शाळा आल्या आहेत. या सर्वांना नीटसारख्या सर्व प्रकारच्या राष्ट्रीय पातळीवरील एकच परीक्षा आहे. त्यात राधानगरी तालुक्यातील गावात शिकलेली मुलं कशी टिकणार? मोठी फी न देऊ शकणारी मुले कशी टिकणार? असा हा समाज विभागणीच्या धोरणांचा मुकाबला कोणी करणार आहे का? बाकी सारे व्यवसाय फायद्यात चालतात. शेतीकडे कोणाचेच लक्ष नाही, या अपेक्षित वर्गाच्या मूळ प्रश्नांवर घाव कोणी घालणार आहात का? आज रोजगार जे निर्माण होतात. नोकऱ्या ज्या निघतात त्यात सरकारी नोकऱ्यांची टक्केवारी किती? कारण की, सरकारी नोकरीतच आरक्षण आहे. ते किती मराठा तरुण-तरुणींना मिळणार आहे. या तरुणांना उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था करण्याची मागणी लावून धरली पाहिजे. ते शिक्षण मोफत किंवा उत्तम असले पाहिजे. कोल्हापूरसारख्या तेराशे वर्षांचा इतिहास असलेल्या शहरात शिवाजी विद्यापीठ वगळता एकही नवी शैक्षणिक किंवा संशाेधन संस्था उभी राहू नये, याचे आश्चर्य वाटते. आयआयएम, आयआयटी किंवा एम्स्सारख्या संस्था नाहीत. नॅशनल लॉ कॉलेज नाही, इतिहास संशोधन संस्था नाही, पशुधन प्रचंड असतानाही पशुवैद्यकीय महाविद्यालय नाही, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज नाही, केंद्रीय विद्यापीठ नाही.
महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि नागपूर ही तीन शहरे वगळता संपूर्ण महाराष्ट्र उपेक्षित आहे. कोल्हापूर ही भूमी "कोल्हापूर आर्टस् स्कूल" नावाने ब्रिटिशकालीन मुंबई प्रांतात प्रसिद्ध होती. अनुदानित आर्टस् कॉलेज असताना तिला स्वत:ची कोल्हापूरला शोभेल, अशी इमारत नाही. या सर्व गोष्टींसाठी झगडावे लागेल. मराठा समाजाला संधी उपलब्ध करून दिली तर उंच झेप घेईल. कोल्हापूर ही भूमी क्रीडानगरी करण्यासाठी उत्तम आहे. एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तयार हाेऊ नये? फुटबाॅल खेळणाऱ्या मुलांचे भवितव्य काय आहे? हाैशीच आहेत ती. येथे खेळणार आणि येथेच संपणार! राजर्षी शाहू महाराज यांनी काेल्हापूरच्या कुस्तीत चाैफेर बदल घडवून आणले. म्हणून ती आजही प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रातील काेरडवाहू शेती करणाऱ्या मराठा समाजाला पर्याय दिला पाहिजे. शासकीय नाेकऱ्यातील आरक्षण हा असंख्य पर्यायातील एक आहे, म्हणून मुळावर घाव घालणारे समाज आंदाेलन उभे करावे लागेल. त्याची उभारणी करावी लागेल. बहुसंख्य जनतेला उपेक्षित ठेवणारी शैक्षणिक व्यवस्था, आर्थिक, सामाजिक, औद्याेगिक परिस्थिती बदलावी लागणार आहे. त्यासाठी बदलाचे राजकारण करावे लागेल. जातीच्या आधारे हाेणाऱ्या आंदाेलनास पाठिंबा मिळेल, पण त्यास मर्यादा असणार आहेत. कारण मराठा युवक-युवतींचे प्रश्न हे सर्वच समाज घटकांचे प्रश्न आहेत. ब्राम्हण समाज गरीब नाही का? मुस्लिम समाज सर्वाधिक उपेक्षित आहे. दलितांना किमान आरक्षण मिळाले, शैक्षणिक सवलती मिळाल्या. मुस्लिम समाजाला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात उपेक्षेशिवाय काही मिळाले नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे धाेरण सर्वसमावेशक हाेते. त्या धर्तीवर आपण विचार केला पाहिजे. शाहू महाराज यांचा विचार कधीही मागे पडणार नाही. समाजाच्या मूलभूत समस्या जाणा आणि त्यावर मूलभूत उपाययाेजना करा, हा साधा मंत्र हाेता. वस्तीगृहे ही गरज हाेती. चांगले शिक्षकही आवश्यक हाेते. जाती-धर्मावरून भेदाभेद समाजासाठी हानिकारक हाेते. या सारख्या गाेष्टींवर मात करण्याची संकल्पना आखणे म्हणजे शाहू विचार हाेय. यशवंतराव चव्हाण यांनी तेच केले. शाहू महाराज यांच्या विचारांचे ते वारसदार हाेते. सर्वांना बराेबर घेऊन जाण्याच्या धाेरणामुळे महाराष्ट्र उभा राहिला. संभाजीराजे, आपले उपाेषण आणि पदरात पडलेल्या मागण्या या पुरेशा नाहीत. व्यापक लढा उभा करावा लागेल. आता जागतिकीकरणाच्या दिशेने जावे लागेल. शाहू महाराज यांनी जगभराचे ज्ञान काेल्हापूर संस्थानात आणले हाेते. त्यांचे जागतिक भान काेल्हापूरला नव्या उंचीवर पाेहाेचविणारे ठरले. अशी झेप घेण्याची तयारी करा, त्यासाठी मुळासह बदल करावा लागेल.त्यावर घाव घालावा लागेल.