साम, दाम, दंड, भेद...!
By अतुल कुलकर्णी | Published: May 30, 2018 07:00 AM2018-05-30T07:00:30+5:302018-05-30T07:00:30+5:30
हाय, कसे आहात...? हल्ली तुमचं मराठी आमच्यापेक्षा बेस्ट होतयं असं बाबा घरी म्हणत होते. अंकल, तुम्ही मराठी कुठे शिकलात; टेल मी... कारण साम, दाम, दंड, भेद ही तर आमची लँग्वेज.
डीयर देवेंद्र अंकल,
हाय, कसे आहात...? हल्ली तुमचं मराठी आमच्यापेक्षा बेस्ट होतयं असं बाबा घरी म्हणत होते. अंकल, तुम्ही मराठी कुठे शिकलात; टेल मी... कारण साम, दाम, दंड, भेद ही तर आमची लँग्वेज. आमच्या डिक्शनरीत आहे ती. तुम्ही कशी काय युज करता...? परत तीच आमच्यासाठीही वापरता...!
व्हॉट इज धीस काका...? मला सांगा, साम म्हणजे तुमच्या अँगलने काय, दाम, दंड आणि भेद म्हणजे काय ते पण सांगून टाका ना... बाबांनी चिडून विचारलं की आता मराठीचा क्लास तुमच्याकडे लावतो, तर तुम्हीदेखील; मी शिकवायला तयार आहे असं सांगून टाकलं हे काय मला डायजेस्ट झालं नाही. मराठीची पताका हेडवर घेऊन आम्ही सो मेनी इयर्स लढतोय. तो आमचाच राईट असताना तुम्ही कसे काय आमचे मराठीचे शब्द वापरता हे कळत नाही.
युवर्स, आदित्य ऊर्फ आदू
प्रिय आदू बेटा,
तुझा काही तरी गैरसमज झालाय. साम, दाम, दंड, भेद हे शब्द तुमच्या शब्दकोशात नाहीत. ते मराठीच्या शब्दकोशात आहेत. त्याचे स्वामित्व तुमच्याकडे नाही. ज्यांना शुद्ध मराठी येते त्या सगळ्यांना हे शब्द माहिती आहेत. कोणत्याही युद्धात आणि प्रेमात सगळं क्षम्य असतं. आम्ही तुमच्याशीच युद्ध करत आहोत आणि तुमच्या प्रेमातही आहोत, अशा स्थितीवर ‘जब दिल आ गया गधी पे तो परी क्या चीज है’ अशी एक म्हण उत्तरेकडे आहे. आमचे एक योगी तिकडे आहेत. त्यांनी सांगितलेली आहे ही म्हण. तू उगाच तणावग्रस्त होऊ नकोस. हे कळण्याचे तुझे वय नाही. तू आपला तुझ्या वकुबानुसार राहा. तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत सगळ्यांच्या.
तुझाच, देवेंद्रकाका
डीयर देवेंद्रअंकल,
तुमचा मेसेज उशिरा डिलिव्हर झाला. जे विचारलं ते सोडून दुसरंच सांगण्याची तुमची स्टाईल अजून चेंज झाली नाही. शब्दकोश, स्वामित्व असले जड शब्द वापरून तुम्ही मला उल्लू बनाविंग करत असाल तर धीस इज नॉट गूड. मी काही उल्लू नाही.
वन मोअर पॉर्इंट, माझी मराठी बेस्ट आहे. तेव्हा उगाच मधे मधे हिंदी वापरून त्या भय्ये लोकांची बाजू घेतल्याचा शो आॅफ करू नका, आणि तुमचा दिल गधी पे आला त्यात आमचा काय फॉल्ट? दिल देताना चेक करायला पाहिजे होता ना... नाऊ इटस् युवर फॉल्ट...
युवर्स, आदू ऊर्फ आदित्य
प्रिय आदू बेटा,
तुझा संदेश वाचला. जे विचारले जाते ते सोडून दुसरं सांगण्याची ही सवय मी उद्धव नावाचे माझे एक उत्तम फोटोग्राफर मित्र आहेत, त्यांच्याकडून घेतली आहे. तू म्हणत असलास तर ही सवय बदलेन. पण मग मित्र बदलावा लागेल. चालेल का? आणि आमचा दिल परीवर येणार होता पण ती परी मैद्याच्या पोत्यासारखी दिसते असे तुझे आजोबा म्हणायचे. ते आठवलं म्हणून मग परीऐवजी गधीवर दिल गेला. त्याचे आता वाईट वाटून उपयोग नाही. असो.
तुझाच, देवेंद्रकाका
डीयर देवेंद्रअंकल,
व्हॉट इज धीस... मी साम, दाम, दंड, भेद बद्दल बोललो आणि तुम्ही थेट गधीपर्यंत गेलात. नॉट गूड अंकल. कट्टी फू...
नॉट युवर्स, आदू ऊर्फ आदित्य.
- अतुल कुलकर्णी