विशेष लेख : ‘वर्जित’ विषयांवर वाचक मान्यतेची मोहर!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 09:10 AM2024-11-17T09:10:42+5:302024-11-17T09:12:19+5:30
हिंदू पुराणांनुसार भगीरथाचा जन्म दोन स्त्रियांपासून झालाय, कार्ले येथील प्रसिद्ध बौद्ध लेण्यात दोन अर्धअनावृत्त स्त्रियांचे स्तनस्पर्शाचे शिल्प आहे, कामसूत्रात समलैंगिकतेवर तपशीलवार माहिती आहे, तर खजुराहोच्या शिल्पांमध्येही समलैंगिकतेस स्थान आहे. मराठी साहित्यात हा विषय पूर्वी वर्जित मानला जायचा, परंतु आता यावर खोलात जाऊन बऱ्यापैकी स्पष्टतेने लिहिले जातेय...
समीर गायकवाड, लेखक
सन १९५५ मध्ये विख्यात हिंदी साहित्यिक सआदत मंटो निवर्तले. त्यानंतर दहा वर्षांनी भाऊ पाध्येंची ‘वासूनाका’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि एकच गहजब उडाला. धर्म बुडाला, संस्कृतीला लांच्छन लावले, मराठी साहित्याला काळीमा फासला, सभ्यतेचे धिंडवडे निघाले, अशी जहरी टीका त्यांच्यावर होऊ लागली. आचार्य अत्रे संपादक असलेल्या ‘नवा मराठा’ने २४ एप्रिल १९६६ रोजी अग्रलेखातून भाऊंना अक्षरश: डागण्या दिल्या. भाऊंच्या लेखनाला अश्लील ठरवताना आचार्य अत्रे यांनीदेखील टीकेची पातळी सोडल्याचे स्पष्ट जाणवते.
सद्य काळातही ‘अमूक एक लिहिले तर याद राखा, महागात पडेल’ ही साथीच्या रोगाची प्रवृत्ती जशी सर्वत्र सहज आढळते ती त्या काळीही होती याचा हा मार्मिक दाखला ठरावा. जी देहिक परिपक्वता मंटोच्या साहित्यात आढळते, तीच भाऊंच्या साहित्यातही डोकावते. फोरासखान्यातल्या, कामाठीपुऱ्यातल्या बायकांना त्यांनी आपल्या कथांच्या नायिकांची जागा दिली आणि तत्कालीन सनातन्यांचे पित्त खवळले!
भाऊंनी वापरलेले शब्दप्रयोग ज्यांनी हीन ठरवले होते त्यांनी त्याच शब्दात भाऊंवर जहरी टिप्पण्या केल्या. विजय तेंडुलकर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या मोजक्या दिग्गज लेखकांनी भाऊंची पाठराखण केली आणि त्यांनाही टीकेचे धनी व्हावे लागले. मात्र, त्या काळात ‘हैदोस’सारखी नियतकालिके एकांतात वाचली जायची, पिवळ्या पुस्तकांखेरीज या वर्गवारीतले ठळक साहित्य नव्हते.
मात्र हा काळ आता मागे पडलाय, असं म्हणण्याजोगी स्थिती आपल्याकडे दिसतेय. एकेकाळी वर्जित मानलेल्या विषयांवरील लेखनाविषयी व्यक्त होताना आताच्या काळातला प्रतिसाद दिलासादायक आहे. किंबहुना प्रोत्साहित करणारा आहे. ‘रेड लाइट डायरीज - खुलूस’ हा माझा कथासंग्रह जेव्हा प्रकाशित होताना वाचकांच्या प्रतिसादाबद्दल साशंक होतो, माझा संशय खोटा ठरवत वाचकांनी, समीक्षकांनी त्यावर पसंतीची मोहर उमटवली.
अवघ्या आठ महिन्यांत ‘खुलूस’च्या पाच आवृत्त्या निघाल्या! वर्जित विषयांना लोकमान्यता मिळत असल्याचे हे द्योतकच होय. या अनुषंगाने काही पुस्तकांचा उल्लेख करावा लागेल. शीतल देशमुख डहाके यांची ‘व्हेन माय फादर’ ही बाललैंगिक शोषण या विषयावरची कादंबरीही चांगली चर्चिली गेली. बाललैंगिक शोषण हे सहसा घरातल्याच किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून होते हे जागतिक संशोधनावर आधारित सत्य आहे, त्याचा उत्तम ऊहापोह यात होता.
समलैंगिकतेबद्दल भारतीय समाज मनामध्ये अजूनही स्पष्टता नाही. समाज याविषयी तोंडात गुळणी धरून गप्प राहणे पसंत करतो. हा वैयक्तिक विषय असून, याला सार्वजनिक स्वरूप देऊ नये. कारण हा संस्कृती संस्काराच्या विरोधातला मुद्दा आहे, असे काहींना वाटते. शारीरिक जडणघडणीचा विषय असून, यावर खुली चर्चा योग्य नव्हे तसेच हे पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण आहे, असेही काहींना वाटते.
समलैंगिकतेकडे संकुचित दृष्टिकोनातून पाहण्याच्या वृत्तीचे प्रतिबिंब भारतीय साहित्य, विविध कलाविष्कार आणि अन्य माध्यमांमध्ये दिसते. चित्रे, कथा, कविता, प्रहसने, सिनेमे, जाहिराती, नाटके, डॉक्युमेंट्रीज, पथनाट्य यातील समलैंगिक आशयाचे प्रमाण एकूण निर्मितीच्या प्रमाणात नगण्य आहे. आपल्या शिक्षणप्रणालीमधून, अभ्यासक्रमातून लैंगिक शिक्षण वगळलेय कारण ते गुप्तज्ञान आहे, अशी आपली जुनाट धारणा!
त्याउलट याचे नेटके अवलोकन आणि अभ्यास करून लैंगिक जाणिवा स्पष्ट व पारदर्शी ठेवत अनेक देशांनी समलैंगिकतेला विधिवत मान्यता दिलीय. आपण मात्र आपल्या बुरसटलेल्या कालबाह्य गृहितकांना बिलगून आहोत.
भारतीय समाजमनाला पारंपरिक टॅबूंना गोंजारणारा, रुढीप्रिय श्रद्धांना तडा न देणारा निर्मिक हवा असतो जो अगदी गुलछबूपणे निगुतीने नीटस निर्मिती करत असतो. या पार्श्वभूमीवर असे विषय हाताळण्याचं आव्हान कुणी पेलत असेल तर आणि हे काम एखादी महिला करत असेल तर ते अधिक आव्हानास्पद ठरते. अरुणा सबाने यांच्या ‘दुभंगलेलं जीवन’मध्ये हे साहित्यगुण प्रकर्षाने समोर येतात.
शुभांगी दळवी यांच्या ‘द लेस्बिअन’मध्ये दोन स्त्रियांच्या समलैंगिकतेवर प्रकाश टाकलाय. वाचकांनी या दोन्ही कादंबऱ्यांना उत्तम प्रतिसाद दिलाय. या वर्गवारीत गणल्या जाणाऱ्या साहित्यावर सेमीपॉर्नचा शिक्का मारता येणार नाही इतके हे साहित्य ठळकपणे आशयवादी आहे.
अमृता पाटील यांच्या ‘कारी’चा आवर्जून उल्लेख करावा वाटतो. या कादंबरीत दोन समलैंगिक तरुणी त्यांच्या अंतिम उद्दिष्टात असफल होतात. परिणामी आत्महत्येचा प्रयत्न करतात. मात्र, दुर्दैवाने त्यात त्या अपयशी ठरतात. त्यानंतर त्यांची ससेहोलपट सुरू होते. पारंपरिक चौकटी मोडून त्यांना आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जी लढाई लढावी लागते त्याची गाथा म्हणजे कारी!
पुरुषोत्तम रामदासी यांच्या ‘बाईची गोष्ट’ या कथासंग्रहात सेक्सच्या प्रदूषणाचा सर्जक धांडोळा घेतला गेलाय. अंजली जोशी यांची ‘विरंगी मी विमुक्त मी’ ही कादंबरी बेटी डॉडसन या खऱ्याखुऱ्या स्त्रीची दास्तान आहे. तिने स्त्रीमुक्ती चळवळीच्या मुख्य धारेशी संबंध तोडत स्त्रियांच्या कामवासनेचे अस्तित्व आणि त्यांच्या मानसिक, शारीरिक आरोग्याशी असलेला जैविक संबंध यावर भर देणे आवश्यक असल्याचं म्हटलं होतं.
जगभरातील विविध भाषांत, संस्कृतींमध्ये समलैंगिकतेविषयी लिहिलं, बोललं गेलंय. भारतीय शिल्पकला, साहित्य, इतिहास यामध्ये तब्बल दोन हजार वर्षांपासूनचे समलैंगिकतेचे उल्लेख, नोंदी आढळतात. व्यक्तीचे लिंग (जेंडर) आणि सेक्स या दोन गोष्टी भिन्न आहेत हेच आपण मान्य करायला तयार नाही.
हिंदू पुराणांनुसार भगीरथाचा जन्म दोन स्त्रियांपासून झालाय, कार्ले येथील प्रसिद्ध बौद्ध लेण्यात दोन अर्धअनावृत्त स्त्रियांचे स्तनस्पर्शाचे शिल्प आहे, कामसूत्रात समलैंगिकतेवर तपशीलवार माहिती आहे तर खजुराहोच्या शिल्पांमध्येही समलैंगिकतेस स्थान आहे. अय्यप्पा या देवाला उभयलिंगी मानले जाते.
‘बाबरनामा’पासून सिराज औरंगाबादीच्या कवितेपर्यंत अनेक सुफी रचनांमध्ये समलैंगिकतेचे वर्णन आलेय. अशी असंख्य उदाहरणे देता येतील. मराठी साहित्यात हा विषय पूर्वी वर्जित मानला जायचा, परंतु आता यावर बऱ्यापैकी स्पष्टतेने लिहिले जातेय नि वाचकांचा त्याला प्रतिसादही उत्तम आहे. हा बदल सुखावह होय!