अभयारण्ये पुरेशी नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:24 AM2018-01-22T00:24:38+5:302018-01-22T02:22:21+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी जंगलास लवकरच वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात येणार आहे. सुमारे १६० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले घोडाझरी हे राज्यातील ५५ वे अभयारण्य ठरेल.
चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी जंगलास लवकरच वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात येणार आहे. सुमारे १६० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले घोडाझरी हे राज्यातील ५५ वे अभयारण्य ठरेल. ही निश्चितपणे आनंदाची बातमी आहे; पण केवळ जंगलांना अभयारण्ये घोषित करून, संरक्षणाची गरज असलेल्या वन्यजीवांना खरेच अभय मिळते का, याचाही विचार होणे गरजेचे आहे. अभयारण्य ही संकल्पना आपल्या देशात सुमारे शंभर वर्षांपूर्वी रुजविण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत देशभरात सुमारे साडेपाचशे अभयारण्ये साकारली. दुर्दैवाने, नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या वन्यजीवांना खºया अर्थाने अभय देण्यात या अभयारण्यांना यश लाभले नाही, असा निष्कर्ष अमेरिकेतील ड्युक विद्यापीठाने काही वर्षांपूर्वी केलेल्या शास्त्रीय अभ्यासातून काढला होता. एकूण २५ मोठ्या सस्तन प्राण्यांची त्या अभ्यासासाठी निवड करण्यात आली होती. त्या प्राण्यांची तेव्हाची संख्या आणि अधिवासाचे क्षेत्र यांची सुमारे २०० वर्षांपासूनच्या उपलब्ध ‘रेकॉर्ड’शी तुलना करण्यात आली होती. ड्युक विद्यापीठाच्या त्या अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला होता, की त्या २५ जाती निकट भविष्यात किमान स्थानिक पातळीवर तरी नष्ट होतील. हा निष्कर्ष अत्यंत गंभीर आहे. जैव वैविध्य ही भारताची अनमोल संपत्ती आहे. तिची जपणूक हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. दुर्दैवाने काही स्वार्थी प्रवृत्तींना ही देशाची संपत्ती जपण्यापेक्षा स्वत:ची संपत्ती झटपट वाढविण्यात जास्त रस आहे. त्याचा फटका दुर्दैवी मुक्या जीवांना बसत आहे. ही परिस्थिती बदलायची असल्यास, केवळ अभयारण्यांची संख्या वाढवून भागणार नाही, तर त्या प्रणालीत कार्यरत लोकांची मानसिकता बदलावी लागेल. वन्यप्राण्यांच्या संरक्षणापेक्षा जास्त भर त्यांच्या संवर्धनावर द्यावा लागेल. संरक्षण आणि संवर्धनातील फरक वन्यजीव संरक्षण विभागात कार्यरत कर्मचा-यांच्या मनावर बिंबवावा लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या विभागातील कर्मचारी आणि आदिवासींमधील दरी सांधावी लागेल. वने आणि वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे काम कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न बाळगता, आदिवासी समूह पिढ्यान्पिढ्यांपासून करीत आले आहेत. त्यांना वगळून वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनाच्या कामात यश मिळणार नाही, याची खुणगाठ आपण जेवढ्या लवकर बांधू, तेवढी वन्यजीव संरक्षणाच्या अभियानास यश मिळण्याची शक्यता वाढेल; अन्यथा पुढील पिढ्या आपल्याला कदापि क्षमा करणार नाहीत!