थँक यू सानिया! आपण कुठेही कमी नाही, हा विश्वास तुझ्यामुळे भारतीयांना मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 07:05 AM2023-01-28T07:05:33+5:302023-01-28T07:05:48+5:30

काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात ज्यांच्याविषयी अभिमानाने म्हटले जाते, ‘बस्स... नाम ही काफी है!’ त्यातलेच एक नाव म्हणजे सानिया मिर्झा.

sania mirza retirement | थँक यू सानिया! आपण कुठेही कमी नाही, हा विश्वास तुझ्यामुळे भारतीयांना मिळाला

थँक यू सानिया! आपण कुठेही कमी नाही, हा विश्वास तुझ्यामुळे भारतीयांना मिळाला

googlenewsNext

काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात ज्यांच्याविषयी अभिमानाने म्हटले जाते, ‘बस्स... नाम ही काफी है!’ त्यातलेच एक नाव म्हणजे सानिया मिर्झा. सानिया एक अजब रसायन असल्याचे म्हटले, तर चुकीचे ठरणार नाही. ज्याच्या मार्गात अडचणी नाहीत, असा एकही यशस्वी खेळाडू दिसणार नाही; पण सानियाच्या बाबतीत सांगायचे, तर तिने दररोज वेगवेगळ्या अडचणींचा सामना केला आणि नुकताच आपला २० वर्षांचा व्यावसायिक टेनिसपटूचा प्रवास थांबवला. पुढील महिन्यात सानिया दुबईत आपली अखेरची स्पर्धा खेळेल; परंतु शुक्रवारी तिने ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीतून ग्रँडस्लॅम टेनिसला गुडबाय केले.

ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावून आपल्या स्वप्नवत कारकिर्दीचा सुखद अंत करण्यात सानियाला अपयश आले, त्यामुळेच तिला कोर्टवर अश्रू थोपविता आले नाहीत; पण सानियाच्या कारकिर्दीमुळे भारतातील हजारो मुलींना नवी प्रेरणा मिळाली. आपणही जिंकू शकतो, आपले स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करू शकतो, हा विश्वास मुलींना मिळाला, तो सानियामुळेच. सानिया कशी खेळते, ती किती सामने जिंकली, तिने कोणते विक्रम रचले, यापेक्षाही आपल्यासारख्याच एका सामान्य घरातील मुलगी जागतिक पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करते, ही गोष्टच मुलींना प्रेरणादायी ठरणारी होती. सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, असे क्रीडाविश्वातील स्टार चमकण्याआधीपासून सानियाने जागतिक स्तरावर भारतीय मुलींचे प्रतिनिधित्व केले.

आपण कुठेही कमी नाही, हा विश्वास तिच्यामुळे भारतीयांना मिळाला. एक दिग्गज म्हणून निवृत्त झालेल्या सानियाचा प्रवास दिसतो तितका सोपा नक्कीच नव्हता. तिच्या वाटेला स्ट्रगल तर होताच; पण त्याहून जास्त होता तो विरोध. ज्या समाजात मुलींना बाहेरच्या जगात वावरताना अनेक निर्बंधांचा सामना करावा लागतो, अशा समाजातून सानियाने वाटचाल केली. जागतिक टेनिसमध्ये दुहेरी गटात भारतीय तिरंगा नेहमीच फडकला. त्यातही लिएंडर पेस, रोहन बोपन्ना हे दोघे भारतीय टेनिसचा चेहरा बनलेले. मात्र, २००३ हे वर्ष गाजवले ते सानियाने. तिने ज्युनिअर गटात थेट विम्बल्डनचे महिला दुहेरी जेतेपद पटकावले.

यानंतर अनेक आयटीएफ आणि डब्ल्यूटीएफ स्पर्धांमध्ये छाप पाडल्यानंतर सानियाने २००५ साली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत एकेरीची तिसरी फेरी गाठली. त्याचवर्षी अमेरिकन ओपनमध्ये चौथी फेरी गाठत सानियाने इतिहास घडवला. कोणत्याही ग्रँडस्लॅमची चौथी फेरी गाठणारी सानिया पहिली भारतीय महिला टेनिसपटू ठरली. यानंतर तिने अनेक असे विक्रम केले, ज्यामध्ये तिचा उल्लेख ‘पहिली भारतीय महिला’ अशी झाली. सानिया लवकरच भारतातील घराघरांत पोहोचली आणि ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर प्रत्येकाला आपल्या घरचा सदस्य वाटतो, त्याचप्रमाणे सानिया ही सर्व भारतीयांसाठी ‘आपली सानिया’ बनली; परंतु हे सर्व यश मिळवत असताना सानियाला अनेक वादांनाही तोंड द्यावे लागले. खेळ राहिला बाजूला; पण सानिया कशी वागते, ती कसे कपडे घालते यावरून अनेक वादांना तिला तोंड द्यावे लागले; पण सानिया या सर्वांना आणि सर्व वादांना पुरून उरली.  

ज्या समाजात महिलांना पूर्ण अंग झाकूनच बाहेर वावरण्याची सक्ती असताना, टेनिस कोर्टवर स्कर्ट घालून वावरणारी सानिया अनेकांच्या डोळ्यांत खुपली. यामुळे भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सानियाला डावलून धर्माचा अपमान करणाऱ्या सानियाचा वाद उभा करण्यात आला. सानियाला या गोष्टींचा नक्कीच त्रास झाला; पण ती डगमगली नाही. कुटुंबीयांच्या पाठिंब्याने सानियाने या सर्व वादांना तोंड देत असताना आपल्या खेळावरचे लक्ष्यही ढळू दिले नाही. प्रत्येकाला आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा हक्क असतो. मात्र, जर का तो जोडीदार पाकिस्तानसारख्या देशातील असेल, तर काय काय गोष्टी झेलाव्या लागतात, हे फक्त सानियाच सांगू शकेल.

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न केल्यानंतरही तिच्यावर टीकेचा भडिमार झाला; पण लग्नानंतरही मी भारताचेच प्रतिनिधित्व करणार, मी कायम भारतीय म्हणूनच खेळणार, असे ठामपणे म्हणणारी सानिया या टीकाकारांना कधीच दिसली नाही. सानियाने टीकाकारांची पर्वा न करता आपली वाटचाल पुढे सुरू ठेवली. अन्याय होत असताना आवाज उठवलाच पाहिजे आणि वेळप्रसंगी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहून लक्ष्य गाठले पाहिजे, हा विश्वास सानियाने भारतीयांना दिला. भारतीय टेनिस आणि क्रीडा क्षेत्रातील सानियाचे योगदान कधीही विसरता येणार नाही.

Web Title: sania mirza retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.