अग्रलेख: कार, ब्रह्मदेव अन् हरभरे! संजय राऊतांना ब्रह्मदेव व्हावे वाटले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 08:11 AM2022-06-13T08:11:52+5:302022-06-13T08:12:12+5:30

कोणत्या आलिशान कारमध्ये बसून कोण ब्रह्मदेव हरभरे खात होते, याची कधीच वाच्यता होणार नाही. कारण प्रत्येकजण आलिशान कारने फिरतो, स्वत:ला ब्रह्मदेव समजतो

sanjay raut statement after rajya sabha poll shivsena candidate defeat | अग्रलेख: कार, ब्रह्मदेव अन् हरभरे! संजय राऊतांना ब्रह्मदेव व्हावे वाटले अन्...

अग्रलेख: कार, ब्रह्मदेव अन् हरभरे! संजय राऊतांना ब्रह्मदेव व्हावे वाटले अन्...

Next

कोणत्या आलिशान कारमध्ये बसून कोण ब्रह्मदेव हरभरे खात होते, याची कधीच वाच्यता होणार नाही. कारण प्रत्येकजण आलिशान कारने फिरतो, स्वत:ला ब्रह्मदेव समजतो आणि संधी मिळेल तेथे हरभरे खातो. कार, ब्रह्मदेव आणि हरभऱ्याची चर्चा याच्यासाठी की, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ब्रह्मदेव व्हावे वाटले. राज्यसभा निवडणुकीत सहाजणांनी दिलेला शब्द फिरविला म्हणून त्यांनी त्यांची नावेच घेऊन टाकली. येत्या २० जूनला विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी मतदान आहे, याचेही भान त्यांना राहिले नाही.

पतंगराव कदम नेहमी म्हणायचे की, एका लुगड्यावर बायको म्हातारी होत नाही, तसे हे आहे. हेच आमदार पुन्हा विधानपरिषदेवर पाठवायच्या दहा आमदारांसाठी मतदान करणार आहेत. काही अपक्ष आणि छोट्या पक्षांनी या बोटावरील शाई त्या बोटावर केली हे खरेच आहे. कारण पहिल्या पसंतीची सर्वच राजकीय पक्षांची मते अपेक्षेप्रमाणे पडली. गडबड झाली ती भाजपकडे पहिल्या पसंतीची मते देऊ शकतील, अशी दहाच मते असताना धनंजय महाडिक या तिसऱ्या उमेदवारास २७ मते कशी मिळाली? ती कोठून आली? अन्यथा शिवसेनेचे संजय पवार निवडून आले असते.

आता हा सर्व इतिहास झाला. मात्र, ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्यावरून पुढील राजकारण रंगत जाणार आहे. ते भले लोकहिताचे नसेल, पण घोड्यांचे निश्चित असणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्र्यांची कार चालू आहे, पण सरकार बंद आहे’, अशी टीका केली. पाठीत खंजीर खुपसून सरकार स्थापन केले आहे, ते तरी नीट चालवावे हा त्यांचा सल्ला आहे. पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप महाराष्ट्राच्या राजकारणात १९ जुलै १९७८ रोजी वसंतदादा पाटील यांनी सर्वप्रथम केला होता. तेव्हापासून राजकारण्यांनी सावध होऊन राजकारण करायला हवे होते.

खंजीर खुपसण्याची संधी मिळण्यासाठी त्यांना पाठ कशाला दाखवायची? भाजपच्या काहीच चुका नाहीत तरी शिवसेनेने खंजीर खुपसला, असा आरोप करण्याची परिस्थिती नाही. भाजपनेही अनेकवेळा संधी मिळताच शिवसेनेवर वार केले आहेत. शिवसेनेमुळेच भाजप महाराष्ट्रात मोठा झाला, हे वास्तव आहे. देवेंद्र भुयार या नवख्या आमदाराने ब्रह्मदेवाची आठवण काढली. आम्ही मत कोणाला दिले हे सांगणारे संजय राऊत ब्रह्मदेव आहेत का, असा सवाल केला. करमाळ्याचे संजयमामा शिंदे यांचेही नाव घेतल्याने ‘हरभरे खायला आम्ही बाजारातील घोडे आहोत का’, असा गंमतीदार सवाल मामांनी विचारला आहे. आलिशान कार, ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आणि घोड्यांना हरभरे याची संधी चोवीस वर्षांनंतर राज्यसभेची निवडणूक लागल्याने उपलब्ध झाली.

अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांची संख्या बरी असल्याने त्यांचा भाव वाढला आहे. ही व्यवस्था बदलण्यासाठी सुधारणा करावी, अन्यथा वरिष्ठ सभागृहाची संकल्पनाच रद्द करण्यात यावी. सहा राज्ये वगळता उर्वरित राज्यांत विधानपरिषदेचे सभागृहच नाही. तरीही त्यांचा कारभार उत्तम चालला आहे. फडणवीस यांच्या मनातील खदखद वारंवार बाहेर पडते आहे. आपल्या नेतृत्वाखाली भाजप-सेनेचे सरकार स्थापन न करता उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्री झाले याची सल त्यांच्या मनात आहे. ‘मविआ’मध्ये वितुष्ट आणायचे किंवा मतभिन्नता निर्माण होऊन मविआ फुटेल यासाठी प्रयत्न करायचा, हा अजेंडा फडणवीस राबवीत आहेत. देशाची सत्ता भाजपच्या हातात असल्याने ते बिनधास्त आहेत.

संविधानिक संरक्षण आहे, लागेल तेवढ्या धनाची रास आहे. केंद्रात सत्ता नसती तर राज्यातील सरकारला धारेवर धरायला लोकांच्या प्रश्नांची आठवण झाली असती. मनोरंजक आणि चपखल टिपणी करणाऱ्यांची नावे गाजली. मात्र, खरी प्रतिक्रिया शरद पवार यांनी मार्मिकपणे नोंदवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. देवेंद्र फडणवीस यांनी लोकांशी संपर्क ठेवला आहे. परिणामी, त्यांना मदत मिळाली. हा सूचक इशारा ज्यांना पहिल्या पसंतीची मते कमी मिळाली त्यांच्यासाठी आहे. आघाडीचे सरकार असल्याने ‘संजय राऊत स्टाईल’ने बोलून चालत नाही, इतकी ज्येष्ठता शरद पवार यांच्याकडे आहे. संख्याबळ नसताना दुसरा उमेदवार देण्याचा शिवसेनेचा आग्रह बरोबर नव्हता, हेदेखील त्यांनी सांगितले. कार, ब्रह्मदेव आणि हरभरे.. ही यादी त्यांना फार पूर्वीपासून माहीत आहे. लोकांबरोबर राहण्याचा फायदा कसा होतो, याचे उदाहरण त्यांनी दिले. हीच संधी भाजपने साधली, उद्या निवडणुकीतही साधतील. सावधान राहायला हवे!

Web Title: sanjay raut statement after rajya sabha poll shivsena candidate defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.