संस्काराचा प्लॅटफॉर्म

By admin | Published: May 9, 2016 02:49 AM2016-05-09T02:49:20+5:302016-05-09T02:49:20+5:30

आधी ती मुले शिव्या द्यायची, आता ओव्या गातात. नागपूरच्या प्लॅटफॉर्म शाळेतील मुलांची ही गोष्ट. परवा शासकीय बालसुधारगृहातील ३० मुले कर्मचाऱ्यांना मारहाण करून पळून गेली

Sanskar's platform | संस्काराचा प्लॅटफॉर्म

संस्काराचा प्लॅटफॉर्म

Next

आधी ती मुले शिव्या द्यायची, आता ओव्या गातात. नागपूरच्या प्लॅटफॉर्म शाळेतील मुलांची ही गोष्ट. परवा शासकीय बालसुधारगृहातील ३० मुले कर्मचाऱ्यांना मारहाण करून पळून गेली, त्याक्षणी प्लॅटफॉर्मच्या मुलांची आठवण झाली. मनात एक विचार आला, सरकारची कुठलीही मदत न घेता प्लॅटफॉर्म शाळेत या बिघडलेल्या मुलांना माणूस बनविण्यासाठी ज्या कळकळीतून प्रयत्न केले जातात तसेच शासकीय बालसुधारगृहातील मुलांबाबत असते तर कदाचित ती अशी पळून गेली नसती.
अशा घटना आपल्यासमोर अस्वस्थ करणारे असंख्य प्रश्न उभ्या करतात. अनाथ, घरून पळून गेलेल्या, नकळत गुन्हेगारी प्रवृत्तींना बळी पडलेल्या या मुलांना ही शासकीय बालसुधारगृहे कोंडवाडे का वाटतात? या तुरुंगाच्या भिंतीत त्यांना कोंडून आपण त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करीत असतो. इथे त्यांचे संगोपन होत नाही, त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणूनच बघितले जाते. पांढरपेशा समाज सुरक्षित राहावा यासाठी या बालगुन्हेगारांना बालसुधारगृहात ढकलले जाते. येथील कर्मचाऱ्यांचाही दृष्टिकोन संस्कार रुजविण्यापेक्षा मुलांवर ‘पाळत’ ठेवण्याकडेच अधिक असतो. त्यांना आई-बापाची माया मिळत नाही, त्यांच्या चुका कुणी समजून घेत नाही. म्हणूनच मोकळा श्वास घेण्यासाठी मग ती अशी पळून जातात.
शासकीय बालसुधारगृहात दिसणारी अशीच ४५ मुले नागपूरच्या गांधीबागेतील प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर निवासी शाळेत आहेत. ही मुलेसुद्धा कधीकाळी बालगुन्हेगार. सहा वर्षांपूर्वी बीअरबारमध्ये भांडी विसळणारा बिट्टू आता इंजिनिअरिंगला आहे. लाल मोहम्मद हा बिहारचा. सहा वर्षाचा असताना तो लखनौला पळून गेला. बांगड्याच्या दुकानात कामाला होता. तिथे मालक खूप मारायचा. लाल तिथूनही पळाला. नागपूरच्या रेल्वेस्टेशनवर भटकताना दिसला. शेवटी प्लॅटफॉर्म शाळेत आला. आता लाल मोहम्मद रोज शाळेत जातो. वर्गात तो सर्वांचा मॉनिटर आहे. मुंबईचा सलीम सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून घरून निघाला. मुंबईत भीक मागायचा, दारू प्यायचा. तो इथे पाचवीत आहे. झारखंडच्या अर्जुनने १२ वर्षाचा असताना घर सोडले. दारूच्या नशेत त्याला इथे कुणीतरी आणून दिले. सहा वर्षे इथे राहिला. दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. मागच्या आठवड्यात त्याला नातेवाईक घरी घेऊन गेले. पूर्वी रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या अजयची वही परवा सहज चाळली. वहीच्या मागच्या पानावर, ‘सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल’ ही सानेगुरुजींची प्रार्थना सापडली. जन्मापासूनच जगण्याची झुंज द्यावी लागलेल्या या मुलांच्या आयुष्यात झालेला हा आमूलाग्र बदल. दिवाळीत या मुलांनी भिकाऱ्यांना पोटभर खाऊ घातले. ज्या हातांनी भीक मागितली त्याच हातांनी दान केले. नागपूरला रेल्वे पोलीस अधीक्षक असताना रवींद्र सिंघल या भल्या माणसाला अशा निवासी शाळेची निकड वाटू लागली. विश्व हिंदू परिषद व नागपूर महापालिकेने ही जबाबदारी स्वीकारली. श्रीकांत आगलावे नावाचा बजरंग दलाचा कार्यकर्ता सर्व सोडून पुढे आला. श्रीकांत त्यांचा माय झाला आणि बापही...
या मुलांना या शाळेतून आता पळून जावेसे वाटत नाही. सुरुवातीला काही गेली आणि लगेचच ती घरट्यातही परतली. विचारले तर म्हणाली, ‘हे जीवन सुंदर आहे.’ इथे रोज तुमच्या-आमच्या घरची मुले येतात. कुणी वाढदिवस साजरा करतात तर कुणी दिवाळी. अंतर्बाह्य विस्कटून गेलेली ही मुले त्यांच्यात आपले हरवलेले बालपण शोधतात. रेल्वेत भीक मागणारा मुलगा जवळ आला की आपण त्याला झिडकारून देतो. अशाच मुलांपैकी एखादा प्लॅटफॉर्म शाळेत कॉम्प्युटरवर दिसतो. लाथाडताना आपण त्याला ओळखत नाही, कारण आपल्या दृष्टीने तो गुन्हेगार आणि संस्कारशून्य. तीच मुले या शाळेत ‘इतनी शक्ती हमें दे ना दाता’चे मागणे घालतात तेव्हा स्वत:ची घृणा वाटू लागते. हा जाणिवेचा दोष आहे. रवींद्र सिंघल, श्रीकांत आगलावेंना ती आहे म्हणून ही मुले पुन्हा सावरली. शासकीय बालसुधारगृह चालविणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांकडे ही संवेदना नसल्यामुळेच इथली मुले पळून जातात.
- गजानन जानभोर

Web Title: Sanskar's platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.