संस्कृत: ज्ञान, विज्ञानाची शास्त्रशुद्ध भाषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 02:27 AM2017-08-06T02:27:33+5:302017-08-06T02:27:36+5:30
७ आॅगस्ट, श्रावण पौर्णिमेचा म्हणजेच रक्षाबंधनाचा दिवस भारतातच नव्हे, तर जगातही अनेक ठिकाणी ‘संस्कृत दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्त पाच हजार वर्षांची
७ आॅगस्ट, श्रावण पौर्णिमेचा म्हणजेच रक्षाबंधनाचा दिवस भारतातच नव्हे, तर जगातही अनेक ठिकाणी ‘संस्कृत दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्त पाच हजार वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या संस्कृत या अभिजात भाषेविषयी अमरावती येथील दिलीप श्रीधर भट यांनी संकलित केलेल्या माहितीचा संपादित गोषवारा.
अभिजनांची भाषा म्हणून आज जागतिक पातळीवर इंग्रजीला असलेले स्थान दोन-तीन शतकांपूर्वी भारतात संस्कृत भाषेला होते. संस्कृत ही रोजीरोटीची आणि भाकरीची भाषा होणे कठीण आहे, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. तरीही संस्कृत भाषेत ज्ञान-विज्ञानाच्या सर्व शाखांचे प्रचंड भांडार आहे. त्यामुळे भौतिक प्रगतीसाठीही संस्कृत शिक्षणास अनन्यसाधारण महत्त्व दिले जात आहे.
संस्कृत परिपूर्ण भाषा असल्याने, ती संगणकीय आज्ञावली लिहिण्यासाठी अत्यंत योग्य आहे, असे तज्ज्ञ मानतात. गणित व विज्ञान शिकण्यासाठी, तसेच कृत्रिम प्रज्ञेच्या (आर्टिफिशियल इन्टेलिजन्स) विकासासाठी संस्कृत ही अत्यंत उपयुक्त असल्याचे अमेरिकेच्या ‘नासा’ या संस्थेचे म्हणणे आहे. म्हणूनच ‘नासा’ संस्कृतच्या विशेष संशोधनासाठी दरवर्षी ३०० शिष्यवृत्त्या देत असते. संस्कृतमध्ये दोन हजार मूळ धातू आहेत. त्यापासून उपसर्ग व संधी यातून अमर्याद शब्दभांडार तयार होऊ शकते. त्यामुळे संस्कृतमध्ये सहजता, संक्षिप्तता व सुरेलता आहे.
संस्कृतमध्ये अभियांत्रिकी विषयांवरील ९५००, तर दंतवैद्यकावरील ७२ प्राचीन ग्रंथ उपलब्ध आहेत. जगभरातील २५ देशांमधील ४५० हून अधिक विद्यापीठांमध्ये स्वतंत्र संस्कृत विभाग असून, तेथे या विषयात पीएच.डीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. आयआयटीसारख्या संस्थांमध्ये अभिजात भाषा विभागात संस्कृत हा विषय शिकविला जातो. भारतात वाराणसी, दरभंगा, तिरुपती, पुरी, दिल्ली, काळदी, हरिद्वार, रामटेक, जयपूर, अहमदाबाद व जबलपूर या ठिकाणी केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालये आहेत. याखेरीज पाच हजार पाठशाळांमधूनही संस्कृतचे अध्यापन केले जाते. इयत्ता १२ वीपर्यंत संस्कृत हा विषय घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या भारतात तीन कोटी आहे.
मुत्तुर (जि. शिमोगा, कर्नाटक) आणि मोहदा (झिरी धारवाड, मध्य प्रदेश) यासारख्या गावांमध्ये दैनंदिन व्यवहार संस्कृतमध्ये चालतात. असेच प्रयत्न गुजरात व राजस्थानच्याही काही गावांमध्ये सुरू आहेत. ‘संस्कृत भारती’ या संस्थेने संस्कृतग्राम तयार करण्याचा संकल्प केला आहे. आमच्या मुलांची मातृभाषा संस्कृत असेल असा संकल्प भारतातील २,५०० कुटुंबांनी केला आहे. उत्तराखंड राज्यात हिंदीसोबत संस्कृत ही राज्यकारभाराची भाषा आहे. स्वत: संस्कृत पंडित असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संस्कृत ही राष्ट्रभाषा ठरविण्यासाठी सन १९४९ मध्ये संसदेत ठराव मांडला होता, परंतु उच्चवर्णीयांची भाषा म्हणून टीका झाली आणि इतर २२ भारतीय भाषांप्रमाणे संस्कृतलाही राजभाषेचा दर्जा देणारा ठराव मंजूर झाला. संस्कृतमध्ये आजही ६० नियतकालिके प्रसिद्ध होतात व ‘सुधर्म’ हे संस्कृतमधील दैनिक आॅनलाइनही प्रकाशित होते.
भारत सरकारचे संस्कृत आयुक्तालय आहे. ‘आकाशवाणी’वर १९५२ पासून सुरू झालेले साप्ताहिक संस्कृत वार्तापत्र आजही सुरू आहे. डीडी न्यूजवरून संस्कृत शिकविले जाते, तर दर रविवारी लोकप्रिय हिंदी चित्रपटगीते, मूळ दृश्ये तीच ठेवून, संस्कृतमध्ये ऐकविली जातात. भारत सरकारची १७ विविध मंत्रालये, विभाग, आस्थापने व सैन्यदलांची बोधवाक्ये संस्कृतमध्ये आहेत.
कोणतीही भाषा, वापर कमी झाला, म्हणून मरत नसते. दोन हजार वर्षे मृतप्राय झालेली हिब्रु भाषा स्वतंत्र इस्राएल या राष्ट्राची राष्ट्रभाषा करून, यदुदी बांधवांनी हेच सिद्ध केले आहे. भारतीय इतिहास आणि संस्कृती यांच्याशी संस्कृतचे अविभाज्य नाते आहे. त्यामुळे इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासासाठी संस्कृत अपरिहार्य आहे. तामिळ वगळता बहुतांश भारतीय भाषांची संस्कृत ही जननी आहे. त्यामुळे या भाषा जगविणे, वाढविणे यासाठीही संस्कृतचाच आधार घ्यावा लागेल. इंग्रजी शब्दांना सुलभ, सुगम प्रतिशब्द संस्कृतमधून मिळू शकतात. व्यवहारातही संस्कतचा वापर वाढावा, यासाठी क्लिष्टता कमी करून, ती शिकविण्याचा प्रयत्नही अनेक जण करीत आहेत. त्यासाठी सुलभ शब्दकोशही तयार केले जात आहेत. संस्कृत टिकण्यासाठी मुळात ही भाषा टिकायला हवी, याची जाणीव दृढमूल होणे गरजेचे आहे. ‘संस्कृत दिवस’ साजरा करण्यामागची हीच खरी कल्पना आहे.