संस्कृत भाषेने होऊ शकतो करिअरच्या वाटांचा राजमार्ग खुला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 06:15 AM2019-08-15T06:15:55+5:302019-08-15T06:16:24+5:30
‘भाषा’ हीच मानवाचे भूषण आहे, आणि ती भाषा ‘सुसंस्कृत’, संस्कारित असली पाहिजे असे सांगितले आहे. भाषेचे संस्कार हे सनातन, नियमबद्ध आणि दोषरहित व परिशुद्ध असतात.
- जगदीश इंदलकर
केयूराणि न भूषयन्ति पुरुषं हारा न चन्द्रोज्ज्वला:
न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालड़कृता: मूर्धजा:।
वाण्येका समालंकरोति पुरुषं या संस्कृता धार्यते
क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणम् भूषणम्।।
या श्लोकात ‘भाषा’ हीच मानवाचे भूषण आहे, आणि ती भाषा ‘सुसंस्कृत’, संस्कारित असली पाहिजे असे सांगितले आहे. भाषेचे संस्कार हे सनातन, नियमबद्ध आणि दोषरहित व परिशुद्ध असतात. हे संस्कृतच्या अध्ययनाने जगभर सिद्ध झालेच आहे. वेदकाळापासून आधुनिक काळापर्यंत अनेक कालखंडात विकसित झालेली ही गीर्वाणवाणी आजही लख्ख प्रकाशमान आहे. या वाणीच्या आश्रयाला येणारा प्रत्येक आबालवृद्ध ‘वेचता वेचता किती मी वेचू’ असे म्हणणारा असतो. आजच्या संस्कृत दिनाच्या निमित्ताने प्रत्येक भारतीयाने संस्कृत भाषेकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्यास ‘यत्र यत्र गच्छसि, पश्य तत्र संस्कृतम्!’ हे घोषवाक्य वास्तवात येण्यास फार काळ लागणार नाही.
भारतीय साहित्य आणि परंपरेच्या अनेकानेक अंगोपागांचे सखोल आणि गहन ज्ञान संस्कृतमध्ये समाविष्ट आहे. गणित, दर्शन, कला, तर्क, व्याकरण, न्यायव्यवस्था, काव्य, नाटक, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, धातुविद्या, जीवविज्ञान, प्राणिशास्त्र, पर्यावरण, संरक्षण, चिकित्सा, वास्तुशास्त्र, जलव्यवस्थापन, कृषी, संगीत, नृत्य, योग, मानसशास्त्र, राजनीती, दैवतशास्त्र आणि शिक्षणशास्त्र...! संस्कृती आणि परंपरा संक्रमण करीत हे सर्व ज्ञान प्रत्येक भारतीय ज्ञान शाखेचा पाया बनले आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने डॉ. के. कस्तुरिरंजन यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय शिक्षा धोरण २0१९ च्या मसुदा आराखड्यात बहुभाषीकत्वाचा आग्रही पुरस्कार केला आहे. यासंदर्भात भारतीय समाज, साहित्य, भारताचे ज्ञान, भारतीय विचारसंपदा व ज्ञानव्यवस्था इत्यादी महत्त्वाच्या पैलूंचा शिक्षण व्यवस्थेत समावेश सुचविला आहे. संस्कृतच्या अभ्यासाशिवाय भारतीय ज्ञान वारशापर्यंत पोहोचणे अशक्य आहे. यापुढे जाऊन या शिक्षा धोरणाने संस्कृतच्या साहाय्याने भारतीय ज्ञान संशोधनाच्या विशेषकरून ६४ कलांत (लिबरल आटर््स) महत्त्वपूर्ण योगदान सांगितले आहे. अन्य भारतीय भाषांचा विकास आणि सांस्कृतिक एकता बनविण्यासाठी संस्कृत भाषेची वैज्ञानिक बैठक महत्त्वपूर्ण ठरते. शिक्षणक्रमामध्ये संस्कृतचा उपयोग केवळ ‘भाषा’ म्हणून न करता, विविध विषयांचा ‘ज्ञानस्रोत’ म्हणून निर्देशित आहे. उदा. भास्कराचार्यांची गणितावरील कोडी, तसेच काव्य हे गणिताच्या अभ्यासक्रमात असावे, जेणेकरून
विद्यार्थ्यांची गणिताकडे पाहण्याची अभिरुची वाढेल. तसेच संस्कृत भाषेतूनच संस्कृत शिकविण्याचा पुरस्कार केला आहे.
आज अनेक पालकांच्या मनात प्रश्न असतो संस्कृत का शिकायचे? मुळात या भाषेमध्ये विचारांची परिपक्वता आहे. तसेच मानवी बुद्धीला तर्कशुद्ध व प्रमाणबद्ध विचार, वाणीचा संस्कार, संवेदना, आनंद, शब्दांची नजाकत, संस्कृतीची ओळख, कमीतकमी शब्दांमध्ये आशयघनता निर्माण करण्याची ताकद आहे. ‘स्कोरिंग’ तर आहेच; पण त्याहीपेक्षा मन व बुद्धी यांच्या विकासाचे खरे गमक या भाषेमध्ये आहे. मग ओघानेच प्रश्न येतो संस्कृत घेऊन पुढे काय?
संस्कृत भाषा शिकल्याने ‘करिअरच्या वाटां’चा राजमार्ग खुला होतो. संस्कृत ही विशेष भाषा घेऊन एमपीएससी आणि यूपीएससी झालेले कितीतरी अधिकारी आज प्रशासनात कार्यरत आहेत. सैन्यदलात धर्मशिक्षक, न्यायशास्त्राच्या संदर्भात ‘परिभाषा’ निर्मिती, भाषा संचालनालयात संचालक, उपसंचालक, पुरातत्त्वविद्या विभागातील विविध पदे, शासनाचे दुभाषक, अनुवादक, विविध प्रकाशनांमध्ये मुद्रितशोधक, दूरदर्शन - आकाशवाणीवर उच्चारण मार्गदर्शक, आयुर्वेदादी विविध शास्त्रांमध्ये संशोधक तसेच विविध कंपन्यांच्या संशोधन आणि विकास विभागात संस्कृती संदर्भातील सल्लागार, नृत्य-नाट्य-संगीतादी कलांमध्ये भाषाज्ञ म्हणून करिअर करता येते. स्पीच थेरपीस्ट म्हणून संस्कृत तज्ज्ञांना खूप मागणी आहे. विविध धर्मांच्या संमेलनांमध्ये, आंतरधर्मीय परिषदांमध्ये संस्कृतचे अभ्यासक असतात. पुराणकथा, लोककला, भाषाशास्त्र, लोकजीवन, समाजकारण, अर्थकारण इत्यादी क्षेत्रांमध्ये आज संस्कृततज्ज्ञ आवश्यक आहेत. सध्या विविध विद्यापीठांमध्ये केवळ मानव्य शाखेतच नव्हे, तर अभियांत्रिकी, वाणिज्य, वैद्यक शास्त्रांच्या मुख्य अभ्यासाबरोबर संस्कृतचा पूरक अभ्यासक्रम असावा, असा विचारप्रवाह येतो आहे. त्यासाठी अनेक विद्यापीठांमध्ये संस्कृत प्राध्यापकांची नियुक्ती केली जात आहे.