संतोष थिपे : ऋणमोचनाचा नवा अर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:01 AM2018-05-22T00:01:30+5:302018-05-22T00:01:30+5:30
परवाच्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे १६ वर्षांपूर्वीचा संतोष सापडला आणि ऋणमोचनाचा नवा अर्थदेखील गवसला...
- गजानन जानभोर
चंद्रपूरलगतच्या जंगलातील परवाचा थरार साऱ्यांचेच प्राण कंठाशी आणणारा. झुडपात लपून असलेल्या बिबट्याने एका वनाधिकाºयावर हल्ला केला. या दोघांतील ही झुंज तब्बल पाच मिनिटे सुरू होती. अखेर बिबट्या जेरबंद झाला. वनाधिकाºयाच्या धाडसाचे माध्यमांनी कौतुक केले. समाजमाध्यमांवर ही झुंज व्हायरलही झाली. तो मात्र ही घटना विसरून आपल्या कामाला लागला. आई-बाप असूनही लहानपणापासून अनाथपण भोगणाºयांना अशा झुंजीचे फारसे अप्रूप राहात नाही. संतोष थिपे त्याचे नाव. बारावीचा निकाल लागला त्या दिवशी गडचांदूरच्या माणिकगढ सिमेंट फॅक्टरीत कामावर असलेला हाच तो संतोष.
१६ वर्षांपूर्वीची ही गोष्ट, २००२ ची. निकालाच्या दिवशी शाळेत मुले जमली होती. जल्लोष सुरू होता. या आनंदोत्सवात संतोष कुठेच दिसत नव्हता. तो नागपूर विभागातून गुणवत्ता यादीत झळकल्यामुळे साºयांच्याच नजरा त्याला शोधत होत्या. कुणीतरी सांगितले, तो सिमेंट फॅक्टरीत आहे. शिक्षक, विद्यार्थी तिथे गेले, संतोषला मेरिट आल्याची आनंदादायक वार्ता दिली. अभिनंदनाने तो सुखावला पण पुढे काय? या प्रश्नाने अस्वस्थ झाला. कौटुंबिक वादामुळे संतोषचे बालपण आजोबांकडेच गेले. सातव्या वर्गापासून तो मजुरीवर जायचा. कुणाचे मार्गदर्शन नाही, पाठबळही नाही. मजुरीवरून घरी परतल्यानंतर रात्री रस्त्यालगतच्या दिव्याखाली तो अभ्यास करायचा. तो गुणवत्ता यादीत येईल, असे कुणालाही वाटले नाही. अगदी त्यालासुद्धा नाही. अभावग्रस्त मुले पोटासाठी शिकतात, गुणवत्ता यादीसाठी नाही. संतोषचे शिक्षक त्याला लोकमत, चंद्रपूर कार्यालयात घेऊन आले. लोकमतने मदतीचा हात पुढे केला. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक जगन्नाथन यांनी पोलीस अधिकारी संदीप दिवान व शिरीष सरदेशपांडे यांच्यावर संतोषची जबाबदारी सोपवली. त्याला डीएड करायचे होते. शिक्षक होऊन वृद्ध आजी-आजोबांवरील कुटुंबाचे ओझे स्वत:च्या खांद्यावर पुढे न्यायचे होते. संतोषने डीएडला प्रवेश घेतला खरा पण सर्वांचा आग्रह स्पर्धा परीक्षेचा. ‘तुझ्या आजी-आजोबांची काळजी आम्ही घेऊ, तू केवळ स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित कर’ शाळेतील प्रा. धनंजय काळे, लिपिक शशांक नामेवार यांनी त्याला धीर दिला. दरम्यानच्या काळात पोलीस अधीक्षक जगन्नाथन यांची बदली झाली. पण त्यांच्या जागेवर आलेल्या मधुकर पांडेंनी संतोषचे पालकत्व अबाधित ठेवले. संतोष पहिल्याच प्रयत्नात वनाधिकारी झाला. त्याला पहिली नियुक्ती गोंदियात मिळाली. रामघाट खदान प्रकरण, अवैध शिकारी, उत्खनन, वृक्षतोड याविरुद्ध संतोषने कठोर पावले उचलली. या काळात त्याच्यावर गुंडांनी प्राणघातक हल्ले केले. प्रसंगी राजकीय दबाव, पैशाची आमिषे दाखविण्यात आली. पण तो डगमगला नाही.
अलीकडेच तो वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून पदोन्नतीवर चंद्रपुरात आला. परवा बिबट्याला जेरबंद करायला गेलेल्या वनकर्मचाºयांपैकी एकावर या बिबट्याने झडप घेतली. पण संतोषने त्या कर्मचाºयाला बाजूला करून हा हल्ला स्वत:वर घेतला. बिबट्याशी झुंज देत असताना आपल्या हातात असलेल्या काठीचा उपयोग संतोषने स्वत:च्या संरक्षणाकरिता केला. बिबट्याला कुठलीही इजा त्याला होऊ द्यायची नव्हती. ‘माझे काम वन्यजिवांच्या रक्षणाचे आहे, त्यांना मारायचे नाही’ हातावरील जखमांकडे बघत संतोष सांगत असतो. संतोष अजूनही विनम्र आहे. परिस्थिती बदलली की माणसे बेईमान होतात, ओळख विसरतात. तो मात्र कृतज्ञ आहे. अनाथ मुलांना मदत करून तो सामाजिक ऋण आपल्यापरीने फेडीत असतो. परवाच्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे सोळा वर्षांपूर्वीचा संतोष सापडला आणि ऋणमोचनाचा नवा अर्थदेखील गवसला...