सप्त ‘स’कार मंत्र!
By admin | Published: June 15, 2016 04:34 AM2016-06-15T04:34:10+5:302016-06-15T04:34:10+5:30
अमेरिकेच्या दौऱ्यात आणि विशेषत: अमेरिकी काँग्रेसला संबोधीत करताना पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी जे तत्त्वज्ञान (हा शब्द अमेरिकेनेच वापरला आहे) मांडले त्याचे अनुसरण भारतात
अमेरिकेच्या दौऱ्यात आणि विशेषत: अमेरिकी काँग्रेसला संबोधीत करताना पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी जे तत्त्वज्ञान (हा शब्द अमेरिकेनेच वापरला आहे) मांडले त्याचे अनुसरण भारतात आणि विशेषत: त्यांच्याच पक्षाच्या मंत्री, खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांनी करणे अधिक गरजेचे असल्याचे प्रतीत झाल्याने की काय त्यांनी या साऱ्यांसाठी एक सप्ताक्षरी ‘स’कार मंत्र सांगितला आहे. सेवाभाव, संतुलन, संयम, समन्वय, सकारात्मक, समवेदना आणि संवाद यांचा या मंत्रात समावेश आहे. तो जर साऱ्यांनी निष्ठापूर्वक जपला तर मग काही प्रश्नच निर्माण होणार नाही. अर्थात यातील संयमाची आणि सकारात्मकतेची शिकवण त्यांनी याआधीदेखील दिली आहे. पण तिचा काहीही उपयोग झालेला नाही. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे जेणे करुन आणि ज्यांच्यामुळे खुद्द मोदी, त्यांचे सरकार आणि पक्ष अडचणीत आला त्यांची व्यक्तिश: मोदींकडून कधीही कानउघाडणी झालेली नाही. केवळ हवेतील उपदेशात्मक प्रवचनाचा तसाही कधी लाभ होत नसतो. परिणामी लोकाना यात दोन बाबींचा आभास होतो. एक तर खुद्द मोदी आणि त्यांचा पक्ष यांच्यात अंतर किंवा द्वैत निर्माण झालेले असावे. केवळ महाराष्ट्राचा विचार करता देवेन्द्र फडणवीस ही फक्त मोदींची एकट्याची निवड होती. पण या निवडीच्या विरोधात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे संधी मिळेल तेव्हां कडवट सूर आळवीत होते. पण त्यांना मोदींनी किंवा त्यांच्या सांगण्यावरुन पक्षातल्या कोण्या अन्य ज्येष्ठाने योग्य शब्दात समज दिली असे कधीच घडले नाही. जेव्हां खडसे यांना अत्यंत लज्जास्पदरीत्या सत्ता सोडावी लागली तेव्हांही मोदींचे मौन सुटले नाही. देवकांत बरुआ ‘इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा’ असे म्हणाले तेव्हां त्यांच्यावर मन:पूत टीका झाली. पण त्यातील इंडियाच्या ऐवजी काँग्रेस असा शब्द वापरला गेला असता तर कदाचित ते रास्त झाले असते. कारण इंदिरा गांधी यांची पक्षावर जबर पकड होती. तशी पकड मोदीदेखील निर्माण करु शकतात कारण लोकसभा निवडणुकीत केवळ त्यांच्या नावाखाली भाजपातील व शिवसेनेतीलही अनेक दगड तरंगून गेले होते. पण पक्ष एकीकडे व मोदी दुसरीकडे असेच काहीसे आजचे चित्र आहे. यातील दुसरा आभास म्हणजे पक्षातील बोलभांड जे काही बोलत आहेत त्यांना आणि त्यांच्या बोलण्याला मोदींची मूकसंमती आहे. हे दोन्ही आभास असले तरी लोकाना त्यात जर सत्य जाणवले तर त्यांना दोष देता येणार नाही.