सरफरोश या एहसान फरामोश?
By admin | Published: November 25, 2015 11:09 PM2015-11-25T23:09:47+5:302015-11-25T23:09:47+5:30
दोष यांचा नाहीच. ज्या देशाचा आज त्यांना उबग आला आहे, जिथे त्यांना असुरक्षित वाटू लागले आहे, मुलाबाळांची चिंता भेडसावू लागली आहे,
दोष यांचा नाहीच. ज्या देशाचा आज त्यांना उबग आला आहे, जिथे त्यांना असुरक्षित वाटू लागले आहे, मुलाबाळांची चिंता भेडसावू लागली आहे, त्या देशाने आणि देशातील जनतेने त्यांच्यावरती आजवर जे मन:पूत व ओतप्रोत प्रेम केले, एकप्रकारे त्यांना जे देय त्यापेक्षाही कितीतरी अधिक देऊन शेफारुन ठेवले, त्या जनतेचाच हा दोष म्हणावा लागेल! एरवी आशा भोसले असो की आमीर खान असो, त्यांनी देश सोडून जाण्याची भाषा केलीच नसती. आशाबाईंचे भांडण त्यांच्या घरासमोरुन जाणाऱ्या उड्डाण पुलाशी होते. या पुलापायी म्हणे त्यांचे खासगीपण हिरावून घेतले जाणार असल्याने त्या दुबईला जायला निघाल्या होत्या. गेल्या नाहीत हे वेगळेच. पण आमीरचे नेमके भांडण कोणाशी, का आणि कशापायी? पण ज्याअर्थी तो देशच सोडून जायला तयार झाला किंवा तसा विचार त्याच्या डोक्यात त्याचीच पत्नी किरण राव हिने भरवला त्याअर्थी त्याचे भांडण साऱ्या देशाशी असावे असे दिसते. त्यामागील कारणांचा उलगडा तर तो करीतच नाही शिवाय आपणहूनच स्वत:स ‘देशनिकाला’ करण्याच्या विचाराचे श्रेय अथवा अपश्रेय तो पत्नीला देऊन मोकळा होतो. गेल्या वर्षी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीतून नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार देशात येणार असे चित्र निर्माण होताक्षणी अमर्त्य सेन, अनंतमूर्ती आदिंनी आणि सरकार स्थापन झाल्यानंतर ज्युलिओ रिबेरो, गिरीश कार्नाड आणि त्यांच्या विचारांशी साधर्म्य असणाऱ्या अनेकांनी भाजपा सरकार व या सरकारचे नियंत्रण करणाऱ्या संघ परिवारातील लोकांच्या उद्दिष्टांविषयी काही प्रश्न आणि चिंता व्यक्त केल्या. परंतु केवळ तिथेच न थांबता काहींनी सरकार या संस्थेच्या वतीने भूतकाळात प्राप्त झालेले पुरस्कार परत करण्याची भूमिकाही घेतली. त्या साऱ्यांचा रोख सरकार आणि सरकारशी संबंधित लोकांच्या विधिनिषेधशून्य व दांडगाईखोर वर्तनावर होता. अर्थात त्यातदेखील अतिरेकच होता. ज्या देशातील जनतेने जेमतेम चारच दशकांपूर्वी अंतर्गत आणीबाणीचा काळाकुट्ट आणि भयावह कालखंड व थेट सरकारकरवी केली गेलेली मुस्कटदाबी बघितली होती, त्याच देशातील जनतेने इतके कासावीस व्हावे याचा अर्थ एकतर त्यांच्या ठायी लोकशाहीविषयीची आस्था नसावी अथवा ते स्वत:च दरम्यानच्या काळात कमकुवत झाले असावेत. आज किमान आपण आपल्या निषेधाचा स्वर उमटवू शकतो व त्याबद्दल आपल्याला कोणी दंडित करीत नाही, इतके तरी त्यांनी समजून घ्यायला हरकत नव्हती. भारतासारख्या खंडप्राय आणि लोकशाहीप्रधान देशात सरकारे येत आणि जात असतात. पण देश मात्र शाश्वत असतो, या वैश्विक सत्यावरच ऐंशीच्या दशकातील लोक श्रद्धा ठेऊन होते. आज याच श्रद्धेचा ज्यांच्या ठायी पूर्ण लोप झाला आहे त्यांचीच तळी उचलून धरताना आमीर खानने त्याच्याही (खरे तर त्याच्या पत्नीच्या) मनातील भीती वा आशंका म्हणे बोलून दाखविली. याचा एक अर्थ त्याला स्वत:चे स्वतंत्र असे काही मतच नसावे. आजची हिन्दी चित्रपटसृष्टी व्यापून टाकणाऱ्या तीन खानांपैकी आमीर हा सर्वाधिक संवेदनशील अभिनेता मानला जातो. पण त्याच्याविषयीचे हे मत अरास्त असल्याचे आता त्यानेच दर्शवून दिले आहे. सामाजिक माध्यमांमधून एकीकडे आमीरचे धिंडवडे काढले जात असतानाच त्याचेच एक सह कलाकार अनुपम खेर यांनी आमीरला उद्देशून काही रास्त प्रश्नही उपस्थित केले आहेत. तितकेच नव्हे तर इतरही अनेक सिने कलावंतांनी आमीरच्या वक्तव्यांबाबत असहमती दर्शविली आहे. हे सारे घटकाभर बाजूला ठेवले तरी ज्या देशाने आमीरला एक कलाकार म्हणून मान्यता, प्रतिष्ठा आणि पैसा मिळवून देताना त्याच्यातील धर्म नव्हे तर केवळ एक कलावंत बघितला, तोच कलाकार काही मोजक्यांच्या झुंडशाहीचा बागुलबुवा उभा करुन देश सोडण्याची भाषा करीत असेल तर त्याला चक्क कृतघ्नपणा म्हणतात. आमीर खान अभिनीत ‘फना’ या चित्रपटावर गुजरातेत बंदी लागू केली गेली होती, तेव्हां नरेन्द्र मोदी त्या राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर आमीर अभिनीतच ‘पीके’ या चित्रपटालाही बराच संघर्ष करावा लागला होता. या चित्रपटाच्या विरोधातील एक जनहित याचिका अजूनही मध्य प्रदेशात प्रलंबितच आहे. या दोन्ही चित्रपटांच्या बाबतीत आमीर याच्या मनात मोदींविषयी किल्मीष असू शकते. पण दोन्ही चित्रपटांंना डोक्यावर घेणारे बव्हंशी अन्नदाते या देशातले होते. त्याची जराही बूज न राखता आमीर किंवा त्याच्या पत्नीला देश सोडून द्यायचा असेल तर जगाच्या पाठीवर आज कोणता देश अत्यंत सुरक्षित राहिला असल्याची त्यांची भावना आहे, तेदेखील उभयतानी मोकळेपणाने सांगून टाकावे. या संदर्भात व्यक्त झालेल्या अनेक प्रतिक्रियांपैकी असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. त्यांच्या मते, अशा पद्धतीने देश सोडून जाण्याची भाषा करणे म्हणजे तमाम स्वातंत्र्य सैनिकांचा घोर अपमान करणेच होय. याचा अर्थ पडद्यावर आणि पैसे घेऊन देशप्रेमाने ओथंबणारा ‘सरफरोश’ एसीपी राठोड रंगविणारा आमीर प्रत्यक्षात मात्र एक एहसान फरामोशच आहे. यात चिंतेची बाब इतकीच की, आमीरवर सारा देश ज्या पद्धतीने तुटून पडला आहे ते बघता, त्यातून दांडगाईखोराना उत्तेजन मिळू नये म्हणजे मिळविली.