‘सरोगसी’ला कायद्याचे कोंदण
By Admin | Published: August 28, 2016 02:40 AM2016-08-28T02:40:24+5:302016-08-28T02:40:24+5:30
वैद्यक, औषधशास्त्रात लागलेल्या नव्या शोधांमुळे मानवी जीवन सुखकर होत आहे. मानवाला व्याधी, वंध्यत्वावर सहज मात करता येणे शक्य झाले आहे. पूर्वीच्या काळी पती अथवा पत्नीमध्ये
- पूजा दामले
वैद्यक, औषधशास्त्रात लागलेल्या नव्या शोधांमुळे मानवी जीवन सुखकर होत आहे. मानवाला व्याधी, वंध्यत्वावर सहज मात करता येणे शक्य झाले आहे. पूर्वीच्या काळी पती अथवा पत्नीमध्ये वंध्यत्व असल्यास दाम्पत्याला अपत्यप्राप्तीचे सुख दुर्मीळच होते. या दाम्पत्यांकडे दत्तक मुलाचा पर्याय उपलब्ध होता. आता सरोगसीच्या माध्यमातून अशा दाम्पत्यांना संततीसुख मिळण्याचा मार्ग
सुकर झाला आहे.
दाम्पत्याला संततीसुखाचा आनंद मिळत असताना काही वेळा सरोगेट मदरचे मात्र शोषण होते. तिच्या स्वातंत्र्याचा, आनंदाचा विचार होत नाही. तर काही वेळा त्या बाळाचेही हाल होतात. नवीन येणाऱ्या सरोगसी विधेयकाला संसदेत मंजुरी मिळाल्याने ‘सरोगसी’मध्ये होणाऱ्या अनैतिक, अनधिकृत गोष्टींना आळा बसेल. त्यामुळे या तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होऊन अनेकांना कायदेशीररीत्या फायदा होऊ शकतो.
करिअर, लाइफ स्टाईल, फिगर, फ्रीडम अशा अनेक गोष्टींचा विचार करून तरुण दाम्पत्य लवकर लग्न केले तरीही मुलासाठी प्लॅनिंग करतात. त्यामुळे अनेकदा वयाच्या बत्तिशीनंतरही मुलासाठी प्लॅनिंग केले जाते. वय वाढल्याने अनेक महिलांना गर्भधारणा होत नाही. औषधोपचारानंतर गर्भधारणा होते. पण काही वेळा वंध्यत्वामुळे गर्भधारणा होणे शक्य नसते अथवा गर्भधारणा झाल्यास गर्भाशयात गर्भाची वाढ होऊ शकत नाही. अशा वेळी संततीप्राप्तीसाठी काही दाम्पत्ये ‘सरोगसी’चा मार्ग स्वीकारतात. सरोगसीचा व्यवसाय गेल्या काही वर्षांत देशात फोफावला आहे. त्यामुळे काही प्रमाणात यातून पळवाटा काढल्या जातात.
खरे म्हणजे सिंगापूर, जर्मनी, स्वित्झर्लंड, स्विडन अशा देशांमध्ये सरोगसीला बंदी आहे. या देशात कायदेशीररीत्या सरोगसीला बंदी असल्यामुळे येथील अनेक दाम्पत्ये भारतात येऊन सरोगसी करायचे. पण, या प्रकरणांमध्ये अनेक समस्या निर्माण होत असल्यामुळे परदेशी नागरिकांना भारतात येऊन सरोगसी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नवीन विधेयकानुसार, जे भारतीय नागरिक पदेशात स्थित झाले आहेत अशा नागरिकांनाही सरोगसीचा पर्याय आता बंद झाला आहे. अनेक नागरिक परदेशात स्थायिक झाले तरी त्यांचे आई-बाबा अन्य नातेवाईक हे देशातच असतात. निवृत्तीनंतर अनेकांना मायदेशी परतायचे असते, पण आता त्यांनाही हा मार्ग बंद झाला आहे.
अमेरिका, लंडन या देशांत सरोगसीला कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे या देशांत ‘सरोगेट मदर’ला पैसे दिले जातात. आतापर्यंत आपल्या देशातही या पद्धतीचा अवलंब केला जात होता. पण, यापुढे पैसे देऊन एखाद्या अनोळखी महिलेकडून सरोगसीद्वारे संततीप्राप्तीचा मार्ग बंद होणार आहे. नातेवाईक असणाऱ्या महिलेलाच सरोगेट मदर म्हणून मान्यता मिळणार आहे. देशात गरिबीचे प्रमाण अधिक असल्यामुळे पैसे मिळतात म्हणून ‘सरोगेट मदर’ होण्याचे प्रमाण अधिक आहे. आर्थिक विवंचनेत असणाऱ्या महिला सरोगेट मदर होण्याचा मार्ग स्वीकारतात. पण या महिलांचे शोषण होते असे एकीकडे म्हटले जात असले तरीही या महिलांचा त्यात
शारीरिक, कौटुंबिक आणि आर्थिक फायदा असतो.
रोजंदारी अथवा अल्पशा पगारात या महिला घर चालवत असतात. त्यामुळे दैनंदिन गरजा पूर्ण करण्याची धडपड सुरू असताना आरोग्याला दुय्यम प्राधान्य दिले जाते. पण, या महिला सरोगसीसाठी पुढे आल्यास त्यांच्या सर्व तपासण्या केल्या जातात. एक वर्षभर त्यांच्या आरोग्याची आणि त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेतली जाते. त्याचबरोबरीने त्यांना दीड ते दोन लाख रुपये मिळतात. यापैकी अनेक महिलांनी हजारो रुपयेही एकत्र पाहिलेले नसतात. त्यामुळे नियमांचे पालन करून सरोगसी केल्यास सरोगेट मदरचा फायदा असतोच.
विधेयक सकारात्मक वाटत असले तरीही त्यात काही उणिवा आहेत. त्यांच्यावर मार्ग काढला पाहिजे असे तज्ज्ञांचे मत आहे. नातेवाईक असलेली महिलाच सरोगेट मदर झाल्यास त्यात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर भावनिक गुंतागुंत वाढू शकते. त्यामुळे विधेयकाचा अजून बारकाईने विचार केला पाहिजे.