‘साशा’, ‘उदय’ आणि ‘दक्षा’ गेले; उरले १७ चित्ते!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 09:46 AM2023-05-13T09:46:17+5:302023-05-13T09:47:23+5:30
कुनोचे अभयारण्य चित्त्यांच्या अधिवासासाठी अपुरे पडेल अशी शंका तज्ज्ञांनी व्यक्त केली होतीच. या प्रकल्पाच्या यशाकडे जगाचे लक्ष लागले आहे!
यादव तरटे पाटील, माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ
तब्बल सात दशकांनंतर भारतात चित्त्यांचे आगमन झाले, तेव्हा सगळ्यांनाच उत्सुकता होती दहा-पंधरा वर्षांपासूनचे प्रयत्न फळाला येत असताना ‘आपल्याकडे चित्ता स्थिरावणार का?’ याबद्दल कुतूहल होते. तयारी जोरदार होती; पण या प्रकल्पातील तीन चित्त्यांच्या मृत्यूनंतर आता एकूणच या प्रयत्नांच्या व्यवहार्यतेसंबंधी शंका उपस्थित केली जात आहे. दि. १७ सप्टेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून आठ चित्ते व तद्नंतर दि. १८ फेब्रुवारी रोजी १२ चित्ते भारतात आणले गेले. या २० चित्त्यांपैकी २७ मार्चला ‘साशा’ या मादी चित्त्याचा, २३ एप्रिलला ‘उदय’ या नर चित्त्याचा आणि आता ९ मे रोजी ‘दक्षा’ या मादी चित्त्याचा मृत्यू झाला. या बातम्यांमुळे धोक्याची घंटा खणखणू लागली आहे. चित्त्यांचा मृत्यूदर अधिक असतो, हे हा प्रकल्प राबविताना गृहीत धरण्यात आले आहेच. पहिल्या टप्प्यात ५० टक्के चित्ते जिवंत राहतील, असा अंदाज बांधण्यात आला होता. म्हणजेच २० पैकी १० चित्ते जगतील असा हिशेब असला, तरीही या तीन चित्त्यांच्या मृत्यूकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी चित्त्यांच्या मृत्यूवर संशोधन केले आहे. २०१८ मध्ये झालेल्या संशोधनात २९३ चित्त्यांच्या मृत्यूचा अभ्यास केला गेला. हा अभ्यास सांगतो, की दर सात चित्त्यांमागे एका चित्त्याचा अकाली मृत्यू होतो. चित्त्यांच्या मृत्यूमागे शिकार हे मोठे कारण असून, यामुळे तब्बल ५३.२ टक्के चित्ते मृत पावत असल्याचे दिसून आले आहे. चित्त्यांसाठी जे विविध कॅम्प लावले जातात त्यात ६.५ टक्के चित्त्यांचा मृत्यू झाला, तर आजार किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलविल्यामुळे ७.५ टक्के चित्ते मृत पावले. रेडिओ कॉलर किंवा ट्रॅकिंग डिव्हाइसमुळे ०.७ टक्के चित्त्यांचा मृत्यू झाला. प्रत्येक सात चित्त्यांपैकी एका चित्त्याचा मृत्यू मानवी हाताळणी आणि व्यवस्थापनामुळे झाला असल्याचे दिसून आले आहे.
कुनो अभयारण्य चित्त्यांच्या अधिवासासाठी अपुरे पडेल अशी शंका तज्ज्ञांनी व्यक्त केली होतीच. चित्ता हा मांसाहारी प्राणी. एवढ्या मोठ्या संख्येने त्याचे दुसऱ्या खंडात स्थलांतर करण्याची ही पहिलीच घटना आहे. साशाचा मृत्यू किडनीच्या आजारामुळे झाला, उदयला अन्नातून विषबाधा झाली, तर मीलनप्रसंगी नराने केलेल्या मारहाणीमुळे दक्षा जखमी होऊन मृत पावली. ‘वायू’ व ‘अग्नी’ या दोन नर चित्त्यांना विणीसाठी ‘दक्षा’सोबत खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आले. मात्र, या प्रक्रियेदरम्यान ते हिंसक झाले आणि यात ‘दक्षा’चा मृत्यू झाला. धोका असताना केवळ मीलनासाठी इतकी घाई का, दक्षासाठी केवळ एकाच नराला सोडले जाऊ शकले असते का, मानसिक व शारीरिकदृष्ट्या आणखी काही काळ त्यांना स्थिर होऊ द्यायला हवे होते का? आदी प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
चित्ता प्रकल्पाचे प्रमुख असलेले डॉ. यजुवेंद्र देव झाला यांनी सुरुवातीलाच यातील धोके सांगितले होते. कुनोचे क्षेत्रफळ व अधिवास २० चित्त्यांसाठी पुरेसे नाही, असेही त्यांनी म्हटले होते. कुनोत प्रतिचौरस किलोमीटर २० चितळ आहेत. चित्त्यांसाठी ते पुरेसे नाहीत. चित्त्यांना चिंकारा व इतर प्राण्यांची सवय, तुलनेने चितळ त्यांची भूक शमवू शकत नाही. चित्ते शिकारीसाठी लांबलांब प्रवास करतात.
कुनो अभयारण्याची क्षमता १० ते १२ चित्ते राहू शकतील इतकी होती, तरीही तिथे २० चित्त्यांना स्थलांतरित करण्यात आले. भारतात आणण्यापूर्वी आणि भारतात आणल्यानंतर काही दिवस विलगीकरण कक्षात असताना चित्त्यांना जे मांस खायला दिले गेले, त्यामुळे त्यांच्या शरीरातील सूक्ष्मजीवांच्या संख्येत काही बदल झाले आहेत का, नामिबियातून आणलेले आठ व आफ्रिकेतून आणलेले बारा चित्ते! त्यांना तेथील अधिवास, उपलब्ध असलेले खाद्य व त्यांच्या सवयी भारतात कशा जमवता येतील याचा विचार झाला होता का, अशा काही प्रश्नांची उकल होणे आवश्यक आहे. मध्य प्रदेश सरकार गांधीसागर व नौरादेही वन्यजीव अभयारण्यात चित्त्यांना सोडण्याचा विचार करत असले तरीही चित्त्यांसाठी हे अभयारण्य तयार करण्यास किमान वर्षभराचा कालावधी आणि ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक लागेल. दरम्यानच्या काळात राजस्थानमधील मुकुंद्रा अभयारण्याचा प्रस्तावसुद्धा सरकारपुढे ठेवण्यात आला आहे.
चित्ता पुनर्स्थापन प्रकल्पाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले पाहिजे. कारण संपूर्ण जगभरातला हा पहिलाच मोठा प्रयोग आहे. मानव विकासासाठी अत्यावश्यक औद्योगिकीकरण, झपाट्याने कमी होणारा अधिवासाचा आकार, अधिवासाचे विखंडन, चित्त्यांची व त्यांना लागणाऱ्या खाद्याची वाढलेली शिकार यातून १९४८ मध्ये नैसर्गिक अधिवासातील चित्ता नामशेष झाला. १९७१ मध्ये वाघांचाही क्रमांक लागणार असे चित्र उभे झाले. मात्र, १९७२ मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा व १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प आल्यामुळे आज वाघाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मोकळा श्वास घेता येतो आहे. व्याघ्र संवर्धनाला आलेले यश पाहता चित्त्यांच्या संवर्धन प्रकल्पाला यश येणार का, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.