शेजारच्या चिंकीचं अमृत महोत्सवी वर्षाचं असंही ज्ञान..!

By अतुल कुलकर्णी | Published: August 14, 2022 08:35 AM2022-08-14T08:35:56+5:302022-08-14T08:36:37+5:30

सगळा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. घराघरात तिरंगा लावला जात आहे. ज्यांना घर नाही ते हातात तिरंगा घेऊन फिरत आहेत. देश एकदम जोरात आहे.

satire : such knowledge of independence day amrut mahotsav 2022 of neighboring Chinki..! | शेजारच्या चिंकीचं अमृत महोत्सवी वर्षाचं असंही ज्ञान..!

शेजारच्या चिंकीचं अमृत महोत्सवी वर्षाचं असंही ज्ञान..!

Next

-  अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

प्रिय बापू, 
नमस्कार. 
सगळा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. घराघरात तिरंगा लावला जात आहे. ज्यांना घर नाही ते हातात तिरंगा घेऊन फिरत आहेत. देश एकदम जोरात आहे. आमच्या शेजारी राहणाऱ्या चिंकीनं विचारलं, सगळे जण झेंडा घेऊन का फिरत आहेत..? कुठे मिरवणुकीला जात आहेत की, मोर्चाला...? झेंडा घेऊन निघालो की, आजच्या पोरांना मिरवणूक किंवा मोर्चाच वाटतो. तिला सांगितलं, देश अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत आहे..! तर ती म्हणाली, हे काय असतं...? तिला नेमकं काय सांगावं, कुठून सुरुवात करावी...? असा प्रश्न पडला. शहीद भगतसिंग यांच्यापासून सुरुवात करावी, की शिवाजी महाराजांपासून... की थेट बापू तुमच्यापासूनच सुरुवात करावी.... उत्तर सापडत नव्हतं. तिला म्हणालो, तू महात्मा गांधींचा पुतळा पाहिलास का? तर ती म्हणाली, एका चौकात मी छोटासा पुतळा पाहिलाय.... तुला आणखी कोणाचे पुतळे माहिती आहेत का..? असे विचारल्यावर ती म्हणाली, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा मी पाहिलाय... किती मोठ्ठा पुतळा आहे... मला तर झोपून बघावा लागला... मान वर केली तरी वरपर्यंत पाहता येत नव्हता...! बापू, तिनं भाबडेपणाने प्रश्न विचारला, बापू मोठे की पटेल मोठे....? तिला काय उत्तर देऊ मी...?
बापू थोडा वेळ तिच्याशी गप्पा मारल्या. आम्हा दोघात जो संवाद घडला, तो जशास तसा तुम्हाला सांगावं असं वाटलं, म्हणून हे पत्र लिहीत आहे.
तुला सरदार वल्लभभाई
पटेल माहिती आहेत का..? 
चिंकी : हो, परेश रावलने त्यांचा रोल भन्नाट केला होता.... 
अगं त्याच्याबद्दल 
नाही... लोहपुरुष सरदार
वल्लभभाई पटेल 
माहिती आहेत का तुला? 
चिंकी : लोहपुरुष... यू मीन आयर्न मॅन... पण तो तर अरनॉल्ड होता ना... तुम्ही असं कन्फ्युज नका करू.... सरदार फिल्म देशाच्या हिस्ट्रीवर बनवली असेल...  त्यातीलच एक वल्लभभाईचं कॅरेक्टर घेतलं असेल... आमिर खानने नाही का मंगल पांडेचा शोध लावला... 
आमिर खानने शोध लावला...? 
चिंकी : आमिर खान डिस्कव्हर्ड मंगल पांडे... नाहीतर त्याच्यावर अशी फिल्म बनली असती का सांगा बरं... आमीर ग्रेट आहे ना...
मला सांग तुला महात्मा गांधींबद्दल 
काय माहिती आहे...?
चिंकी : मुन्नाभाई एमबीबीएस मधले महात्मा गांधी म्हणताय ना तुम्ही... ते सारखे सारखे येऊन मुन्नाभाईला हे कर... ते कर... असं सांगायचे...! मुन्नाभाई म्हणायचा, आपुनको बापू दिखता है...! त्यावर सर्किट देखील म्हणायचा, मेरेको भी दिखता है... तुम्हाला कधी दिसले का बापू सांगा बरं...? तो सिनेमा बघून आल्यानंतर कितीतरी दिवस मी लायब्ररीत जायचे... पण मला लायब्ररीत कधीच बापू दिसले नाहीत... मुन्नाभाईला आणि सर्किटला कसे दिसले कोणास ठाऊक...?
पण तुला कोण जास्त आवडलं...?
चिंकी : मला तर आमिर खानचा मंगल पांडे आवडला... हिस्ट्रीतला मंगल पांडे देखील इतका क्युट नसेल ना...? 
तुला भगतसिंग यांच्याविषयी 
काही माहिती आहे का...?
चिंकी : माहितीये ना मला... सनी देओलने भगतसिंग यांचा रोल केला होता. कसली मस्त हॅट होती त्यांची...
तुला हिस्ट्रीविषयी काही 
माहिती नाही का...? 
चिंकी : तुम्ही पण ना... काहीही प्रश्न विचारता... हिस्ट्री माहिती नसायला काय झालं...? हिस्ट्री म्हणजे जे घडलं त्याच्यावरचा सिनेमा..! आता आपल्याकडे मुंबईत एवढे बॉम्बस्फोट झाले. त्यावर एक सिनेमा मागे आला होता... सेन्सॉरवाल्यांनी अडवून ठेवला होता... हिस्ट्रीच्या बाबतीत अशीच लफडी होतात... पण शेवटी लागला ना, तो सिनेमा... उगाच काहीतरी प्रश्न विचारता बघा तुम्ही... जाते मी आता... मला आमिरचा लालसिंग चढ्ढा बघायचाय... आता हा कोण ते नका विचारू मला... पाहून आले की सांगेन...
बापू हे पत्र वाचा आणि विसरून जा... उगाच आत्मक्लेश करून घेऊ नका...! हा संवाद आजच्या तरुण पिढीचं प्रातिनिधिक रूप आहे, असाही निष्कर्ष काढू नका... बापू , त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पना वेगळ्या आहेत... त्यांना रात्री बेरात्री फिरायला मिळालं पाहिजे.... पाहिजे तेव्हा हवं ते करता आलं पाहिजे... त्यांना ते स्वातंत्र्य जास्त महत्त्वाचं वाटतं...! कळो अथवा न कळो, पण सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त करण्याचा आपला हक्क आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे...! तेव्हा तुम्ही फार त्रास करून घेऊ नका... सरकारी भिंतीवरील तुमचे फोटो आज पुसून स्वच्छ केले जातील... त्याला हार घातले जातील..! आणखी काय हवं बापू...!! 
- तुमचाच, बाबूराव

Web Title: satire : such knowledge of independence day amrut mahotsav 2022 of neighboring Chinki..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.